प्रेरणादायी ‘इमोझील’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2022   
Total Views |

emozeal book front 2

‘इमोझील’ या कथासंग्रहातील १२ कथांतून कोरोनाच्या टाळेबंदीमध्ये आलेल्या निराशेवर एक आशेचा किरण दिसतो. मानवी भावभावनांचा उत्तम मेळ घालीत कथेतील पात्रे आपलीच व्यथा मांडीत असून, त्यावर सकारात्मक मार्ग काढण्यासाठी ‘इमोझील’मधील प्रत्येक कथेतील संवादक आपल्या मदतीला येतो. कोरोनाच्या काळामध्ये आलेली निराशा, नकारात्मकता झिडकारुन नव्या आशेचा किरण लेखकाने मांडलेल्या ‘इमोझील’मधील प्रत्येक कथेतून डोकावतो आणि प्रत्येक कथा प्रसंग सांगून प्रत्येक प्रश्नावर उत्तर देताना प्रचंड सकारात्मक ऊर्जा देऊन जाते.


कोरोना विषाणूमुळे मागील दोन वर्षांपासून जगभराने भलेमोठे स्थित्यंतर फक्त पाहिलेच नाही, तर त्या त्या स्थित्यंतराचा प्रत्येकाने अनुभवही घेतला. मानवाच्या जडणघडणीमध्ये चढउताराचे अनेक प्रसंग येतात आणि जातात. परंतु, संपूर्ण जगाच्याच वाट्याला मागील दोन वर्षांपासून मोठा संघर्षाचा काळ आला. यातून अनेक देश तरले, तर काही देश अजूनही चाचपडत आहेत. जगाच्या इतिहासात मागील १०० वर्षांपूर्वीसुद्धा अशाच पद्धतीच्या विषाणूंच्या महामारीमुळे मानवी जीवनात संघर्षाची वेळ आली. त्यातून काही देश आर्थिकदृष्ट्या कोलमडले. परंतु, त्या त्या वेळचा माणूस त्यातून परिस्थितीला तोंड देत बाहेर पडलाच! याची अनेक उदाहरणे या कोरोनाकाळात सर्वांनी वाचली आणि अनुभवलीदेखील.


कोरोना विषाणूमुळे जगभरात लागू करण्यात आलेली ‘टाळेबंदी’ संपूर्ण जगाला काही कालावधीसाठी बंदिस्त करुन गेली. यामध्ये काही देशाच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या, तर राज्यांच्या विकासालाही खीळ बसली आणि याचा केंद्रबिंदू असणार्‍या मानवाच्या आयुष्यातसुद्धाया संक्रमणावस्थेमुळे आमूलाग्र बदल झाले. काही माणसं विचलित झाली, गळून पडली, काहींनी जगण्याची उमेद गमावली. कोरोनामुळे निराशेच्या गर्तेत सापडलेल्या माणसांचे समुपदेशन करताना डॉक्टर आणि मानसोपचार तज्ज्ञांनासुद्धा नव्याने माणूस भेटला. अशाचप्रकारे वैद्यकीय सल्लागार डॉ. महेश अभ्यंकर आणि मानसिक सल्लागार आरती भार्ज यांनी या कठीण काळात अनेकांचे समुपदेशन केले आणि त्यातून त्यांना आलेले अनुभव, भेटलेली माणसे यांच्या आधारावर सामान्यांना या काळातून बाहेर काढण्यासाठी प्रेरणादायी कथा लिहिल्या. त्याच कथा ‘इमोझील’ या कथासंग्रहातून त्यांनी वाचकांसमोर प्रस्तुत केल्या आहेत. ‘इमोझील’ - मनोबल उंचावणार्‍या कथा’ या कथासंग्रहात १२ कथांमधून कोरोनाकाळातील मानवी भावभावनांचा संघर्ष, पदरी पडणारे नैराश्य आणि त्यातून मानवानेच स्वयंप्रेरणेतून काढलेले अनेक मार्ग यांची गुंफण ओघवत्या शैलीत मांडली आहे. त्यामुळे या सर्व कथा मनाला भिडतात आणि निराश मनांचे मनोबल उंचावण्यास मदत करतात.


आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघण्यासाठी लेखक मनोगतामध्येच एक बाब नमूद करतात. ती अशी की, “जीवनाचा प्रवाह कोणत्याही आपत्तीपेक्षा खूप शक्तिशाली आहे, यावर आपण विश्वास ठेवला, तरच आयुष्य सुंदर आहे हे आपल्याला जाणवेल. आपण स्वतःच्या समस्यांनी पिचून गेलेलो असतो. प्रत्येक व्यक्ती तिच्या क्षमतेनुसार त्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु, आयुष्य हे विशाल आहे. तो एक अखंड प्रवाह आहे. त्याला विरोध करणं फोल आहे. आपण पोहणं शिकलं पाहिजे. ‘कोविड’ साथीसारखे संकट आपण गेल्या काही दशकांत अनुभवलेले नाही. म्हणून ते परतवलं जाऊ शकत नाही, असे नाही. मनुष्याची चिकाटी अभूतपूर्व आहे. कित्येक साथीचे रोग आले अन् गेले. जगात महायुद्धं झाली. परंतु, जीवन सुरुच राहिलं.

मानवजातीनं आपत्तीजनक परिस्थितीमध्ये लादलेल्या आव्हानांचा सामना करण्याची नवीन क्षमता दरवेळी स्वतःमध्ये निर्माण केली.” असे सांगून लेखक पुस्तकाच्या आरंभीच त्यांनी पाहिलेल्या अशा माणसांच्या अनुभवांचे सार सांगतात. ते ज्याप्रमाणे म्हणतात की, “मानवाने नवीन क्षमता दरवेळी स्वतःमध्ये निर्माण केली” त्याचप्रमाणे त्यांनी रेखाटलेल्या पात्रांचा प्रवाससुद्धा आपणांस जाणवतो. या १२ कथांमधील सर्व पात्रं जरी वेेगळी असली, त्यांची पार्श्वभूमी जरी वेगळी असली, तरी त्यांच्या आयुष्यावर कोरोना विषाणूमुळे झालेला परिणाम, त्यांना त्याच काळात ‘स्व’ची झालेली ओळख यामुळे त्या सगळ्याच घटना आपल्या सभोवती घडणार्‍या वाटतात आणि हेच या पुस्तकाचे, लेखकाचे यश म्हणावे लागेल. तसेच या कथा येत्या काळामध्ये निराशेच्या गर्तेत सापडलेल्या प्रत्येकाचे मनोबल उंचावण्यास प्रेरणा देतील, यात तीळमात्रही शंका नाही.


 
लेखक स्वतः डॉक्टर असल्याने पुस्तकातील मुख्य पात्रांना आलेली निराशा दूर करण्यासाठी कथेमध्ये असणारे समुपदेशन करणारे पात्र सुद्धा तितकेच खरे वाटते आणि ती प्रक्रिया जरी त्या त्या कथेमधील प्रसंग दाखविण्यासाठी लिहिली असली तरी अशा परिस्थितीमध्ये काय करावे, याचे सुद्धा मार्गदर्शन करते. पुस्तकामध्ये जी माणसं रेखाटली गेली ती माणसं प्रतिक्रिया देत आहेत. भावनाविवश होताना सध्याच्या काळात आपल्या अवतीभवतीच्यांचे एकप्रकारे प्रतिनिधीत्वसुद्धा ते करतात. हे करताना, त्यांचा त्यांना अखेर परिवर्तनाचा क्षण सापडल्यानंतर जगण्याकडे बघण्याचा त्यांचा बदललेला दृष्टिकोनच या पुस्तकाचे सार आहे.
‘रेशीमगाठी’ या कथेमधील मंदार आणि मीना यांचे बाहेरुन ‘परफेक्ट’ दिसणारे कुटुंब एका अवस्थेमध्ये एकमेकांपासून दूर जाते. नातेसंबंधांच्यावर भाष्य करताना त्यांच्यामधील कोरोनाच्या काळात आलेलं एकटेपण लेखकाने मांडल्यामुळे नातेसंबंधांमध्ये वरवरचे पाहाण्यापेक्षा ते किती खोलवर रुजले आहे, असा नात्यांकडे पाहाण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळतो. त्याचबरोबर डॉ. वैद्य आणि डॉ. स्नेहा, जॉन आणि गीता, सोम्या आणि अनिरुद्ध, राहुल आणि मयुरी, अविनाश आणि आशाताई यांसारख्या पात्रांतून कोरोनाच्या काळातील घटना आणि त्यातून आलेले अनुभव प्रकर्षाने समोर येतात.

ही प्रत्येक पात्रं एका टप्प्यावर निराशेच्या गर्तेत जातात खरी. परंतु, त्यांना योग्य व्यक्तीचा संवाद मिळाल्यानंतर किंवा त्यांना योग्य समुपदेशनानंतर ती त्याच आयुष्याकडे सकारात्मकरित्या बघू शकतात. कथासंग्रहाच्या प्रत्येक कथेमध्ये अनिरुद्ध नावाचे पात्रं त्या त्या कुटुंबाच्या जवळ जाऊन त्या कुटुंबाची परिस्थिती जवळून पाहाते आणि त्यांच्या समस्यांवर मार्गही काढण्याचा प्रयत्न करते. तिर्‍हाईत म्हणून कथासंग्रह वाचताना आपण अनिरुद्धच्या भूमिकेतून सारं काही अवतीभवतीचं बघतो आहोत, असाच भास होतो. कथासंग्रहाच्या प्रत्येक कथेतून भेटणारी ही पात्रे आयुष्याकडे बघण्याची वेगळी दिशा देऊन जातात.पुस्तकामध्ये महादेव महाडिक यांनी रेखाटलेल्या रेखाचित्रांमुळे प्रत्येक कथेला पूर्णत्व मिळाले असून, राजू देशपांडे यांनी मुखपृष्ठावरचितारलेले मानवी भावभावनांचे ‘इमोझील’ पुस्तक वाचल्यानंतर समर्पकरित्या समोर येत आहे. ‘रोहन प्रकाशना’ने प्रकाशित केलेला हा संग्रह सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाने वाचावा असाच असून, तो प्रत्येकाच्या संग्रही असणे गरजेचे आहे.

पुस्तकाचे नाव ः इमोझील - मनोबल उंचावणार्‍या कथा
लेखक ः डॉ. महेश अभ्यंकर, आरती भार्ज
प्रकाशक ः रोहन प्रकाशन
मूल्य ः रु. २५०-







 
@@AUTHORINFO_V1@@