साधारण १९८१-८२चा सुमार. उस्मानाबाद येथील एक निर्माते महामुनी हे पुण्यात आले होते. ते पुण्यातली नाटकं त्यांच्या भागात मराठवाड्यात सादर करीत असत. पुणे येथील काही कलाकार व तेथील काही कलाकार असे प्रयोग करीत असत. शेखर भागवत नावाचा माझा मित्र आहे.त्याचे ते मित्र.
त्यावेळी मी माझ्या ‘अक्षय’ संस्थेचे ‘वरचा मजला रिकामा’ हे अत्यंत गाजलेले नाटक बसवत होतो.ते दोघेही तालमीत आले. त्यांना तालीम आवडली.नाटकही आवडलं. विनोदी नाटक होते. त्यांनी तिकडे प्रयोग करण्याची इच्छा व्यक्त केली.आमच्याशी रीतसर बोलणे केले. मी, माझी बहीण सुनिता, विद्या भागवत व मी असे पुण्याचे आणि महामुनी व इतर दोघे उस्मानाबादचे असे कलाकार होते. मी दिग्दर्शक होतो. गणेशोत्सवात हे प्रयोग करायचे हे ठरले. गणेशोत्सवाच्या आधी चार-पाच दिवस उस्मानाबादला गेलो. रेस्टहाऊसमध्ये तालमी सुरू केल्या आणि नाटक व्यवस्थित बसविले.सलग दहा प्रयोगांचा दौरा मस्त झाला. तिकडचे कलाकार उत्तम होते. टीमवर्क उत्कृष्ट झाले. त्यामध्येे एका प्रयोगाला उस्मानाबादचे कलेक्टर डांगे साहेब आले होते. त्यांना प्रयोग खूप आवडला. खूप हसत होते. प्रयोग संपल्यावर मेकअप रुममध्ये भेटायला आले. महामुनीना त्यांनी सांगितले की, “खूप छान नाटक आहे. तुळजापूरला नवरात्रात हे नाटक तुम्ही करा.
मी आमंत्रण देतो.” आम्ही सर्व खूश झालो.लगेच पुढील महिन्यात नवरात्र असल्याने दिलेल्या तारखेला आम्ही तुळजापूर येथे आलो. तेथे बस स्टॅण्ड समोर सिनेमा थिएटरचे बांधकाम चालले होते. आतील काम राहिले होते. स्टेज तयार केले होते. गर्दी खूप होती. पावसाचा अंदाज नसल्याने या थिएटरमध्ये प्रयोग ठेवला होता. नाहीतर जवळच्या महाविद्यालयाच्या मैदानावर ठरले होते.थिएटरमधे गडबड गोंधळ वाढला ह़ोता. ‘प्रयोग सुरु करा म्हणजे लोक शांत बसतील,’ असे सांगितले.अनाऊन्समेंट केली, ‘शांत बसा... शांत बसा.’ पण, कोणी ऐकतच नव्हते. नाटक सुरू झाले. खचाखच लोक असल्याने गडबड होत होती. बाहेर प्रेक्षक उभे होते. कसाबसा पहिला अंक झाला. मध्यंतर झाले. आयोजकांकडून सूचना आली की, पुढचे दोन अंक मैदानावर करा.
तेव्हा जवळ जवळ ११ वाजले होते. ‘सर्व सेट, सामान उचलून न्यायचं अवघड आहे,’ असं म्हणालो. तेव्हा ते म्हणाले, “आम्ही मदत करतो, म्हणजे वेळ कमी लागेल.” काही माणसे पुढे स्टेजच्या तयारीला गेली. त्या धावपळीत आमची एक-दोन माणसे पडली व लागलं. या तयारीमध्ये रात्रीचा १ वाजला. प्रेक्षक मैदानावर बसले होते. गडबड गोंधळ काही नव्हता. आयोजक म्हणाले, “आता पहिल्यापासून सुरू करा म्हणजे लोकांना समजेल.” आम्ही काही बोलू शकत नव्हतो. पहिल्यापासूननाटक सुरू झाले आणि उसळले.... वाक्या-वाक्याला टाळ्या आणि मध्यंतर न घेता केले. नाटक संपल्यावर रसिकांनी खूप खूप कौतुक केले. नाटक संपायला पहाटे ५ वाजले. सर्व कलाकार खूप दमले होते. सर्वांचे कौतुक केले. सकाळी ६ वा. आमची जेवणाची सोय मंदिराजवळील हॉटेलमध्ये केली होती. तेथे जेवायला बसलो. खिडकीतून डोकावले तेव्हा लोक आंघोळ करून दर्शनासाठी चालले होते.
आम्ही आदल्या दिवशीचे जेवत होत़ो. ल़ोकांचा दिवस संपतो तेव्हा कलाकारांचा दिवस सुरू होतो. तुळजापूर देवीच्या दरबारात कला सादर केली हा नशिबाचा भाग आहे. हे आमचं भाग्य आहे. सर्व अडचणी आल्या तरीही त्यावर मात करुन सुंदर प्रयोग झाला. भवानी मातेची कृपा.