‘कोरोना’ आणखी किती काळ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2022   
Total Views |

WHO
 
 
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंटने जगभरात हाहाकार माजवल्याचे चित्र निर्माण झाले होते. नंतर मात्र कोरोनाच्या ‘डेल्टा’ व्हेरिएंटपेक्षा ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंट कमी घातक असल्याची माहिती समोर आली. तथापि, मृत्युसंख्येवरुन ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंट कमी घातक दिसत असला तरी त्यामुळे बाधित होणाऱ्यांचे प्रमाण कित्येक पटींनी अधिक होते. आता तर ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंटचा उगम झालेल्या दक्षिण आफ्रिकेतील प्रसारही चांगलाच आटोक्यात आल्याचे दिसते. पण, जगातील सर्वच देशांची परिस्थिती तशी नाही, तेथे कोरोना आणि ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच, ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंटनंतर कोरोनाचे आणखी ‘व्हेरिएंट’ येणारच नाहीत, याची कसलीही शाश्वती नाही. जागतिक आरोग्य संघटना अर्थात ‘डब्ल्यूएचओ’चे प्रमुख टेड्रॉस गॅब्रायसिस यांनीदेखील यासंदर्भात इशारा दिला आहे. कोरोना अजून संपलेला नसून ‘ओमिक्रॉन’नंतर आणखी नवे ‘व्हेरिएंट’येऊ शकतात, असे ते म्हणाले आहेत. मात्र, कोरोना संपला की न संपला, ‘ओमिक्रॉन’संपला की न संपला आणि नवे ‘व्हेरिएंट’येणार की न येणार, असे प्रश्न समोर असतानाच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मात्र देशातील कोरोनाविषयक निर्बंध हटवण्याची घोषणा केली आहे.
 
“ब्रिटनमध्ये मास्क परिधान करण्यासारख्या अन्य अनिवार्य कोरोनाविरोधी उपायांना रद्द करण्यात आले आहे. देशात ‘ओमिक्रॉन’व्हेरिएंटच्या लाटेचे सर्वोच्च शिखर येऊन गेल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत सरकार लोकांना घरुन काम करण्याबाबत सांगू शकत नाही,” असे बोरिस जॉन्सन म्हणाले. त्यामुळे ब्रिटनमधील जीवन आता कोरोनाआधीसारखे पूर्ववत होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. पण, ते किती काळ तसे राहील, हा खरा प्रश्न आहे. कारण, कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि नंतरच्या प्रत्येक लाटेनंतर वेगवेगळ्या देशांनी निर्बंध शिथिल वा रद्द केले होते. पण, त्यानंतर परत कोरोनाचे नवे ‘व्हेरिएंट’ आणि लाटा आदळतच राहिल्या. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेन यांनी आपल्या देशाला ‘कोरोनामुक्त’ जाहीर केले होते. तिथले जीवनमान सुरळीत झालेही होते. पण, थोड्याच काळानंतर पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. असाच प्रकार जगभरातील विविध देशांत घडला होता. त्यामुळे बोरिस जॉन्सन यांच्या कोरोनाविरोधी उपाय रद्द करण्याच्या निर्णयाचेही न्यूझीलंडसारखे व्हायला नको, ही सदिच्छा. पण, ब्रिटनमधील शास्त्रज्ञ कोरोना लाटेचे सर्वोच्च शिखर येऊन गेल्याचे म्हणत असले तरी उर्वरित जगात तसे काही दिसत नाही. कारण, गेल्या एका दिवसातच संपूर्ण जगभरात कोरोनाचे ३०.१७ लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर ८ हजार, ३९ जणांना यामुळे जीवही गमवावा लागला आहे. त्यावर ‘डब्ल्यूएचओ’ने इशारा दिला आहे. “काही देशांत कोरोना शिखरावर असल्याने त्याचा वाईट काळ संपत चालल्याचे दिसत आहे. पण, तरीही लसीकरण अत्यावश्यक आहे. कारण, कोरोना जिथे कमी झाला तेथील लोकांना गंभीर आजाराने ग्रासण्याचा आणि मृत्यूचा धोका कैकपटींनी अधिक वाढलेला आहे. म्हणूनच चूक करु नका. ‘ओमिक्रॉन’मुळे रुग्णालयांत दाखल होण्याचे प्रमाण वाढले असून, कितीतरी देशांत समस्या आणखी वाढू शकते,” असे टेड्रॉस गॅब्रायसिस म्हणाले आहेत.
 
दरम्यान, गेल्या एका दिवसांत अमेरिकेमध्ये ५.४६ लाख रुग्णांची तर १ हजार, ७२० कोरोना मृत्यूंची नोंदणी करण्यात आली, तर ब्राझीलमध्ये १.३२ लाख नवे रुग्ण आढळले. आताच्या घडीला संपूर्ण जगात कोरोनाचे ५.८६ कोटी सक्रिय रुग्ण असून त्यापैकी एकट्या अमेरिकेत २.४३ कोटी रुग्ण आहेत, तर जपानमध्येही कोरोना वाढत असून टोकियोसह तेथील जवळपास दहापेक्षा अधिक ठिकाणी शुक्रवारपासून नव्या निर्बंधांची घोषणा करण्यात आली आहे, तर अमेरिकेच्या महामारी आणि संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अॅन्टनी फॉसी यांनी कोरोनाच्या या फैलावावर म्हणणे मांडले आहे की, “ओमिक्रॉन’मुळे कोरोनासाथीचा अंत होईल, असे म्हणणे घाईचे ठरेल. कारण, लसींना चकवा देण्याची क्षमता राखणारे ‘ओमिक्रॉन’सारखे आणखी ‘व्हेरिएंट’ येऊ शकतात,” असे डॉ. फॉसी म्हणाले आहेत. म्हणजेच ब्रिटनसारखे देश कोरोनाविरोधी निर्बंध रद्द करत असले तरी अन्य देशांत कोरोना आहेच, तज्ज्ञही ‘ओमिक्रॉन’ अखेरचा ‘व्हेरिएंट’ असेल असे म्हणताना दिसत नाहीत. त्यावरुन कोरोना आणखी काही काळ तरी जगाच्या सोबत असेल, असे दिसते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@