गर्भवती महिला वनरक्षकाला मारणाऱ्या माजी सरपंचाला अटक; वनधिकाऱ्यांनी दिला धीर

    20-Jan-2022
Total Views |
forest



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
साताऱ्यातील पळसावडे गावात गर्भवती महिला वनरक्षक सिंधू सानप या कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर हल्ला घडल्याची घटना बुधवारी घडली होती. माजी सरपंचांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी गुरुवारी या माजी सरपंचाला पोलिसांनी अटक केली. दरम्यान वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पडसावडे गावाला भेट देऊन त्याठिकाणी रोजगार निर्मितीसाठी वनविभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्याचे नियोजन केले आहे.


पळसावडे गावचे माजी सरपंच आणि वन समितीचे अध्यक्ष रामचंद्र जानकर यांनी वनरक्षक सिंधू सानप यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली. मला न विचारता वनमजूर दुसरीकडे का नेले ? असा सवाल विचारता चिडून त्यांनी सानप यांना लाथाबुक्क्यांनी मारले. तीन महिन्यांच्या गर्भवती असलेल्या सानप यांनी यावेळी प्रतिकार केला. मदतीसाठी आलेले पती सुर्याजी ठोंबरे यांच्यावरही जानकर यांच्या कुटुंबाकडून हल्ला करण्यात आला. वनरक्षक सानप या शासकीय कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याने सातारा वन विभागाकडून पोलीस ठाण्यात एफआरआय दाखल करण्यात आली होती.

तक्रारीची दखल घेऊन आणि प्रकरणाचे गांभिर्य जाणून पोलिसांनी गुरुवारी आरोपी रामचंद्र जानकरला अटक केली. कोल्हापूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही क्लेमेंट बेन यांनी वनरक्षक सिंधू सानप यांच्या राहत्या घरी भेट देऊन त्यांची विचारपूस करून धीर दिला. तसेच पळसावडे गावाला भेट दिली. सातारा शहरापासून सुमारे २० किमी अंतरावर असणाऱ्या या गावात ९५ लोकांची वस्ती आहे. गावातील बहुतांश लोक रोजगारासाठी बाहेरगावी राहतात.गावातील लोक मुख्यत्वे शेतीवर अवलंबून असून उत्पन्नाचे कोणतेही माध्यम उपलब्ध नाही.या सर्व बाबींचा विचार करून पळसावडे गाव स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने मधुमक्षिका पालन,बांबू नर्सरी,रोजगार हमी योजनेची कामे,वन पर्यटन,टेंट होऊस, दूध प्रक्रिया उद्योग,महिला सक्षमीकरण करणे बाबत सर्व ते प्रयत्न करणार असल्याचे बेन यांनी यावेळी सांगितले. हे गाव सातारा वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ.निवृत्ती चव्हाण यांना दत्तक घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या असून लवकरच गावाचे रूपांतर आदर्श ग्राममध्ये करणार असल्याचे ते म्हणाले.