दाढीकुरवाळू शिवसेना!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2022
Total Views |

hingoli
 
 
 
शिवसेना आता मुंबईत थेट उर्दू भाषा शिक्षण केंद्रासाठी पुढाकार घेत असल्याचे, हिंगोलीतील निवडणुकीत मौलानाला विजयी करण्यासाठी चक्क ‘नारा-ए-तकबीर, अल्ला-हू-अकबर’च्या घोषणा देत असल्याचे पाहायला मिळते. अर्थात, मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपायी शिवसेनेची पुरती ‘जनाबसेना’ झाली असून, त्या पक्षाला अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आता फक्त मुस्लीम लांगूलचालनाचाच आधार उरल्याचे स्पष्ट होते.
 
 
 
हिंदुत्ववादी प्रतिमा गुंडाळून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तासंगत केलेल्या शिवसेनेची अवस्था अतिशय केविलवाणी झाल्याचे चालू घडामोडींवरुन दिसून येते. एकेकाळी मराठी भाषा आणि हिंदुत्वासाठी लढणारी शिवसेना आता मुंबईत थेट उर्दू भाषा शिक्षण केंद्रासाठी पुढाकार घेत असल्याचे, हिंगोलीतील निवडणुकीत मौलानाला विजयी करण्यासाठी चक्क ‘नारा-ए-तकबीर, अल्ला-हू-अकबर’च्या घोषणा देत असल्याचे पाहायला मिळते. अर्थात, मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपायी शिवसेनेची पुरती ‘जनाबसेना’ झाली असून, त्या पक्षाला अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आता फक्त मुस्लीम लांगूलचालनाचाच आधार उरल्याचे स्पष्ट होते. येत्या साधारण महिना-दीड महिन्यांत आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महागरपालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष मतदाराला आपल्या पाठीशी उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत. पण, शिवसेनेला फक्त मतेच मिळवायची नाहीत, तर मुंबई महानगरपालिकेची सत्तादेखील स्वतःकडेच कायम ठेवायची आहे. तथापि, वर्षानुवर्षे मुंबई महानगरपालिकेत राजवट असूनही शिवसेनेने आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोणतेही काम या शहरात केलेले नाही. उलट रस्ते, आरोग्य, शिक्षण, नालेसफाईसारखे साधे साधे प्रश्नही शिवसेनेला नीटपणे सोडवता आलेले नाहीत. त्यातच २०१९ साली हिंदुत्वाशी फारकत घेऊन शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जात हिरवा चोळणा पांघरला. ते करुनही, मुख्यमंत्रिपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येऊनही, शिवसेनेला मुंबई वा महाराष्ट्रात भरीवच नव्हे, तर नाव घेण्यासारखेही कार्य करता आलेले नाही. म्हणजेच मुंबई असो वा महाराष्ट्रात शिवसेनेच्या खुर्चीखाली कर्तृत्वाचा अंधारच अंधार आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीला सामोरे गेल्यास जिंकणार कसे, हा प्रश्न शिवसेनेला सतावतो आहे. इतकी वर्षे मराठी माणूस, मराठी भाषा, हिंदुत्वाच्या भावनिक आवाहनाने काम न करुनही सत्ता मिळवणार्‍या शिवसेनेला आता मात्र आपल्या याच मुद्द्यांत जीव शिल्लक नसल्याचे वाटत आहे. किंबहुना, आपल्या हातून वरील सर्वच मुद्दे निसटल्याची चांगलीच जाणीव शिवसेनेला झाली आहे. म्हणूनच कसेही करुन सत्ता राखण्यासाठी शिवसेना आता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षाही अधिक सेक्युलर झाली असून उर्दू भाषा शिक्षण केंद्र वा ‘नारा-ए-तकबीर, अल्ला-हू-अकबर’च्या घोषणा त्या पक्षाच्या याच दाढीकुरवाळू राजकारणाचा दाखला म्हटला पाहिजे!
 
 
 
शिवसेना मुंबईच्या भायखळा परिसरातील आग्रीपाडा परिसरात ‘आयटीआय’साठी आरक्षित भुखंडावर उर्दू भाषा शिक्षण केंद्र उभारण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केला आहे. मंगळवारी त्यांनी स्वतः भायखळ्यातील संबंधित परिसराचा दौरा करुन शिवसेनेच्या प्रस्तावित उर्दू भाषा शिक्षण केंद्राला जोरदार विरोध दर्शवला. राजकीय हेतूसाठी आणि अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणासाठी स्थानिक नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांना हाताशी धरुन आग्रीपाड्यात उर्दू भाषा शिक्षण केंद्राची उभारणी करण्याचा घाट घातल्याचे मंगलप्रभात लोढा यांचे म्हणणे आहे. महत्त्वाचे म्हणजे, मंगलप्रभात लोढा यांच्या विधानाला संदर्भ आहे तो ‘मालवणी पॅटर्न’चा. मुंबईतील मालवणी परिसरात काश्मीर खोरे वा एकेकाळच्या उत्तर प्रदेशातील कैरानासारखी स्थिती निर्माण केली जात असल्याचे मंगलप्रभात लोढा म्हणाले होते. इथे राहणार्‍या हिंदूंना मुस्लीम कट्टरपंथीयांकडून धमक्या, दमबाजी, अवैध बांधकामे, ‘फ्लॅट जिहाद’सारखा त्रास सोसावा लागत आहे. येथील मतदारयाद्यांतील हिंदू मतदारांची संख्या कमी होत आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीवेळच्या मतदारसंख्येतील १५ हजार हिंदू मतदार कमी झाल्याचे व १२ हजार मुस्लीम मतदार वाढल्याचे चालू पंचवार्षिक निवडणुकीवेळी आढळले होते. अर्थात, हिंदूंच्या मतदारसंख्येतील घट व मुस्लिमांच्या मतदारसंख्येतील वाढ आपोआप झालेली नसून सुनियोजितपणे बांगलादेशी, रोहिंग्यांना आणून वसवल्याचा तो परिणाम आहे, असे धक्कादायक खुलासे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केले होते. त्याच धर्तीवर भायखळ्यातही उर्दू भाषा शिक्षण केंद्राच्या माध्यमातून ‘मालवणी पॅटर्न’ राबवण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचे लक्षात येते. तसेच, मुस्लिमांसाठी, मुस्लीम मोहल्ल्यांसाठी जागा खाली करुन भायखळ्यातील हिंदूंना खुद्द शिवसेनेनेच ‘चालते व्हा’चा इशारा दिल्याचे यावरुन म्हणता येईल.
 
 
 
मुंबईतील भायखळ्यात हिंदूंच्या पलायनाच्या आणि मुस्लिमांना वसवण्याच्या ‘मालवणी पॅटर्न’साठी पुढाकार घेणार्‍या शिवसेनेच्या हिंगोली जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी तर एका मौलानाला कुठल्याशा निवडणुकीत विजयी करण्यासाठी ‘नारा-ए-तकबीर, अल्ला-हू-अकबर’च्या घोषणा दिल्याची ध्वनिचित्रफितही समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. म्हणजेच पूर्वीची शिवसेना मुळापासून बदलली असून आताची शिवसेना मुस्लीम लांगूलचालनासाठी कोणत्याही थराला जायला तयार असल्याचे यातून दिसून येते. त्याला कारण घटलेल्या मतदारांचे आहे. शिवसेनेने आपली हिंदुत्ववादी प्रतिमा बाजूला सारत महाराष्ट्राच्या सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी संधान बांधले. पण, यामुळे दशकानुदशकांपासून शिवसेनेशी हिंदुत्वाच्या, राष्ट्रवादाच्या विचाराने जोडला गेलेला कार्यकर्ता, मतदार, हितचिंतक सारेच दुरावले. दोन वर्षांत शिवसेनेलाही त्याची जाणीव झाली आहे. परिणामी, घटलेला हिंदू मतदार तर आता परत मिळू शकणार नाही, तेव्हा ती मतांची बेगमी कुठून करायची, हा शिवसेनेसमोरचा प्रश्न होता आणि आहे. त्यातूनच मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचा, ख्रिश्चनांच्या लांगूलचालनाचा मुद्दा पुढे आला. मराठी शाळांची संख्या कमी होत असताना, त्यांची दुरवस्था होत असताना शिवसेनेला त्याकडे लक्ष देण्याऐवजी उर्दू भाषा शिक्षण केंद्र स्थापनेची गरज वाटू लागली. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देणार्‍या शिवसेनेला ‘नारा-ए-तकबीर, अल्ला-हू-अकबर’ची घोषणा प्रिय वाटू लागली. याचदरम्यान शिवसेनेच्या मुंबईतील नगरसेविका हेमांगी वरळीकर यांनी प्रभादेवी मंदिरासमोर ख्रिश्चनांना खूश करण्यासाठी अनधिकृत ख्रिस्ती स्मृतिस्तंभ उभारण्याचा प्रताप केला होता. तथापि, आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह स्थानिकांनी ख्रिस्ती स्मृतिस्तंभाला विरोध करत शिवसेनेचा डाव उलटवला होता. पण, यामुळे शिवसेना ताळ्यावर येईल, असेही नाही. कारण, सत्तेची मस्ती शिवसेनेच्या डोक्यात गेली असून, सत्ता टिकवण्यासाठी अशाचप्रकारे अल्पसंख्याकांचे लांगूलचालन केले पाहिजे, अशी शिवसेनेची व त्या पक्षाच्या नेतृत्वाची भूमिका झालेली आहे. पण, मुंबईचा मतदार मात्र शिवसेनेच्या या भूमिकेविरोधात आहे, ख्रिस्ती स्मृतिस्तंभ, उर्दू भाषा शिक्षण केंद्राला होत असलेल्या विरोधातून त्याची प्रचितीही येते. तसेच तुष्टीकरणवादी शिवसेनेचा विरोध मतदानाच्या माध्यमातून अधिक जोरदारपणे व्यक्त करण्यासाठीही हा मतदार तयार आहे आणि त्याचा प्रत्यय आगामी निवडणुकीतून येईलच. तेव्हा मात्र शिवसेनेला आपले अस्तित्व वाचवणेही जिकिरीचे ठरेल, याची खात्री वाटते.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@