पवारांचे कोरेगाव- भीमाचे ज्ञान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2022   
Total Views |

bhima-koregaon
 
 
  
 
सरकार कोणत्याही पक्षाचे असो. काका-पुतण्यांची त्यात भूमिका नाही असे होणारच नाही. कधी पगडी आणि फेट्याच्या वादात महाराष्ट्रभर मतभेद तयार करतील, तर कधी न झालेला बॉम्बस्फोट सांगतील. पण जनतेच्या मनात कायमच दुही माजेल, असे काही तरी करतीलच. असो. यंदाही कोरेगाव-भीमा स्मरण आणि वंदन वगैरे झाले. २०१८ सालच्या हिंसक ‘एल्गार’ची जखम ताजीच आहे. ‘एल्गार परिषदे’मध्ये नक्षली सहभाग उघड झाला. यापूर्वी पवार कुटुंबीय किंवा सत्ताधारी इतक्या थाटामाटात कोरेगाव-भीमाच्या स्मारकाला गेले होते का? यावर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, खा. अमोल कोल्हे कोरेगाव-भीमाला गेले होते. अजित पवार आणि विशेषत: छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारून जनतेला ‘उल्लू’ बनवून खासदार झालेल्या अमोल कोल्हे यांनी त्यांच्या माहितीतला कोरेगाव-भीमाचा इतिहास महाराष्ट्राला सांगावा. ५०० विरुद्ध २८ हजार सैन्य लढले? बरं, हे सैन्य पेशव्यांच्या विरोधात, ब्राह्मणशाही विरोधात लढले की, इंग्रजांच्या सैन्यात होते म्हणून कर्तव्यासाठी लढले? तसेच पेशव्यांसोबत लढणार्‍यांमध्ये सगळे सैन्य ब्राह्मण होते की इतरही समाजगट त्यावेळी सैन्यात होते? तसेच पेशव्यांचे सैन्य त्यावेळी आपल्याच महाराष्ट्रातील, आपल्याच समाजातील शोषित-दुर्बल घटकांविरोधात तलावर घेऊन उतरले की, ते इंग्रजांशी लढण्यासाठी उतरले होते? अर्थात, पवार आणि कोल्हे हे सांगणारच नाहीत. मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिमही भारतीय आहे, असे म्हणत जातिअंताचा ध्यास घेणार्‍या आणि इतिहास घडवणार्‍या डॉ. बाबसाहेब आंबेडकरांच्या विचारांना हरताळ फासण्याचा प्रयत्न हे करत आहेत. शेवटी काय? मतांसाठी काहीही. तिथे देश, समाजाच्या एकतेचे मूल्य यांना शून्यच!
 
 
 
बाबासाहेब माफ करा...
 
पेशव्यांच्या काळात मागास समाजघटकांतील व्यक्तींच्या गळ्यात मडके आणि पाठीला झाडू लावण्याची सक्ती होती की नव्हती, याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंत नरसिंह केळकर यांच्यात पत्रव्यवहार झाला होता, हे माहिती आहे का? पत्रव्यवहारात बाबासाहेबसुद्धा म्हणाले की, “गळ्यात मडकी किंवा कंबरेला झाडू बांधावे लागत असे, याबाबत पुरावा नाही. पण हे समाजात वयस्कर लोक सांगतात. दंतकथा आहे आणि त्याचा पुरावा देऊ शकत नाही.” विद्वत्तेचा महासागर असलेल्या परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच जिथे याबाबत पुरावा नाही, असे म्हटले तिथे आज समाजातील काही लोक मोठ्या द्वेषाने हा दंतकथेचा, सांगोवांगीचा इतिहास गोरगरिबांच्या वस्तीतील तरुणांना शोधून का सांगत आहेत? यातून आजच्या मागास समाजाचे काय भले होणार आहे? आज मुंबई उपनगरात विक्रोळीसारख्या ठिकाणी विहारात तथागतांच्या मूर्तीसमोर कोरेगाव-भीमा विजयस्तंभ पूजनाचाही कार्यक्रम काही चारदोन लोकांनी केला. दया-करूणा-शांतीचा संदेश देणारे तथागत, विविध समाजगटात विभागलेल्या लोकांना भारतीयत्वात गुंफणारे संविधान देणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतेला मोठ्या विश्वासाने दिलेल्या धम्मात या कोरेगाव-भीमाचे काय योगदान आहे? की आज समाजाने त्या आदर्श शिंदेच्या गाण्याला पुरावा मानायचे? त्याच्या ‘कोरेगाव-भीमा केले’ या गाण्यात तो म्हणतो, “महार पेशव्यांना म्हणाले की, तुम्ही आम्हाला सन्मान द्या. आम्ही तुमच्यासाठी प्राण देऊ. यावर अहंकाराने पेशव्यांचा बाजीराव चिडतो. तो म्हणतो, आमची जात उच्च आणि तुम्ही अतिशुद्र. आमच्याकडे मानाची आस बाळगता? श्वानासारखीही तुमची बरोबरी नाही. अशी कर्मठ त्या कावळ्याने कावकाव केली आणि मग पेटलेल्या लोकांनी कोरेगाव-भीमा केले कोरेगाव-भीमा!” शिक्षणामुळे तर्कसंगत विचार करायला लागलेल्या तरुणाईने विचार करावा की आदर्श शिंदे म्हणाला ते खरे आहे का? याचा पुरावा त्याच्याकडे आहे का? आदर्श शिंदे याला या गाण्याच्या सत्यार्थाबद्दल प्रश्न काल विचारला गेला नाही, पण म्हणून तो आज विचारायचा नाही, असे नाही. वेळ गेली नाही तो प्रश्न विचारायलाच हवा नाहीतर सत्य जाणून घ्या. त्यासाठी आवाज उठवा, असा महामंत्र देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आम्हाला माफ करणार नाहीत.
९५९४९६९६३८
 
 
@@AUTHORINFO_V1@@