वर्ल्ड ट्रेड सेंटर’मध्ये, दि. १८ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत, ‘इंडिया अॅक्झिम बँक’ प्रायोजित भारतीय पारंपरिक हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. देशभरातील विविध राज्यांतील कौशल्य कलाकारांनी, पारंपरिक हस्तकला व्यावसायिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
मिझोराममधून १२-१३ जणांची टीम या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी मुंबईत येत आहे, असे दिलीप परांजपे यांनी सांगितले. उपासना मॅडमसोबत या सर्वांची स्थानिक व्यवस्था करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली. मिझोरामच्या केंद्रीय विद्यापीठातील हातमाग विभागातील विद्यार्थी आहेत, असे कळले. विमानतळाहून त्यांचे स्वागत करण्यापासून ते मुंबईतील काही पर्यटनस्थळे आणि शैक्षणिक संस्थांच्या उपक्रमांना भेटी देऊन तेथील विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत संवाद साधण्याच्या कार्यक्रमाचे नियोजन आखले. दोन दिवस एन. एम. महाविद्यालय आणि एसएनडीटी विद्यापीठात मिझोरामच्या विद्यार्थ्यांना स्थानिक शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा कौशल्य आणि अभ्यासक्रमाची देवाणघेवाण झाली. ‘वर्सोवा वेलफेअर सोसायटी’च्या शाळेत मुलींचे स्वागत करण्यात आले. मुंबईचे माजी उपमहापौर अरुणजी देव यांनी आणि मुख्याध्यापकांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. दोन्ही बाजूच्या शिक्षक विद्यार्थ्यांनी आपुलकीने मिझोराम आणि ईशान्य भारतातील पारंपरिक उद्योग, कौशल्य समजून घेण्याचा प्रयत्न केला.
प्रदर्शनाच्या दिवसाची सरबराई सुरू झाली. प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनाचा फेरफटका मारताना राज्यपालांची पावलं मिझोरामच्या स्टॉलसमोर थबकणं स्वाभाविक होते. गोर्यापान, बारीक डोळ्याच्या सुंदर विद्यार्थिनींची वडीलकीच्या नात्याने विचारपूस करून त्यांना राजभवनावर अल्पोपहाराचे निमंत्रण राज्यपालांद्वारे आपसूक मिळाले.महाराष्ट्राच्या राज्यपालांनी ईशान्य भारतातील विषयांची विशेष आठवण ठेवून, विद्यार्थ्यांना राजभवनावर येण्याचे दिलेले निमंत्रण हे सीमावर्ती प्रदेशाच्या गांभीर्यपूर्ण विषयांचे सतत असलेल्या स्मरणाचे द्योतक आहे.आलेले सर्व विद्यार्थी प्रथमच मुंबई शहराला भेट देत होते. मुंबई शहराची चकाचांद या मुलांना फक्त सिनेमापुरतीच मर्यादित होती. सर्वप्रथम राजभवनात प्रवेश केल्यावर राज्यपालांनी आपल्या सहकार्यांना दिलेल्या सूचनांप्रमाणे मिझोरामच्या आणि सोबत तामिळनाडूच्या दोन विद्यार्थ्यांचेदेखील आदरातिथ्य झाले. अल्पोपहारासोबत मोकळ्या गप्पा करताना सर्वांनी आपापला परिचय करून दिला. काही जणींनी मिझो भाषेत ‘चिबई’ म्हणजे ‘नमस्कार’ म्हणून महामहिम राज्यपालांना अभिवादन केले. मिझो जनजातींचे पारंपरिक उपरणं महामहिम राज्यपालांच्या गळ्यात घालून सन्मान केला. मूलतः जराशा लाजाळू असणार्या मुली परिचय देताना बावरत होत्या. स्वतः राज्यपाल त्यांच्यातला नवीन ठिकाणच्या स्वाभाविक भीतीचा न्यूनगंड घालविण्यासाठी मध्येच एखादा विनोद करून हास्यमय वातावरण करीत होते. त्यातली सर्वांत वयाने लहान असणारी बेबी आपला परिचय देत होती, तेव्हा तिला कोश्यारीजींनी वडिलांच्या मायेने जवळ बोलावले. म्हणाले, “तू येथेच राजभवनात माझी मुलगी म्हणून राहा आणि तुझं पुढील शिक्षण येथूनच कर.” बेबी लाजली, पण इतर सर्वांनी राज्यपालांच्या भूमिकेचं स्वागत केलं. सर्व मुलींची वडीलकीच्या नात्याने व्यक्तिगत विचारपूस करून भविष्यातील प्रवासाला शुभेच्छा देत होते. एका आपुलकीच्या मायेने राजभवनातलं वातावरण भारावून गेलं होतं.
ईशान्य भारतातील विशेषतः ग्रामीण भागातील परंपरागत कौशल्याला चालना देण्यासाठी, तेथील आर्थिक आलेख उंचावण्यासाठी, आम्ही नुकतीच स्थापन केलेल्या, कंपनी कायदा ८ अन्वये ‘छएथरूी भारत फेडरेशन’ या संस्थेची माहिती दिली. कोरोना काळात मेघालयातील सर्वाधिक कर्क्युमीन असलेल्या हळदीला, नागालँडमधील सर्वाधिक तिखट मिरची भूत झोलकिया, अगर तेल, काळा तांदूळ, बांबूची उत्पादन, हातमागावरील विशेष मुगा, इरी या रेशमी कपड्याचे उत्पादन, तेथील जनजातींच्या शाली, पिशव्या अशा अनेक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचा उपक्रमाचे राज्यपालांनी खूप कौतुक केलं. ‘छएथरूी भारत फेडरेशन’च्या कार्यप्रणालीच्या पुस्तिकेवर ‘खूप खूप शुभेच्छा...!’ असा संदेश लिहून स्वाक्षरी केली. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी अशाप्रकारे आमचे मनोबल वाढवल्याने आम्ही खूपच प्रेरित झालो.
राजभवनातील ब्रिटिशांच्या काळातील भूमिगत असलेल्या वास्तूची माहिती देण्याच्या सूचना राज्यपालांनी आपल्या सहकार्यांना केल्या. ब्रिटिशकालीन त्या वास्तूची माहिती आणि अद्ययावत केलेला रखरखाव पाहून मिझो मुली अचंबित झाल्या. नंतर तेथील बगीचा, कारंजा, राष्ट्रध्वजाचा स्तंभ अशी सुंदर दृश्य जवळून पाहताना त्या आठवणी सर्वजण मोबाईल मधल्या कॅमेर्यात साठवून ठेवत होत्या. सर्व मुलींचे तर भानच हरपले होते. शेवटी सर्वांना शुभेच्छा देत पुढच्या कार्यक्रमाकडे प्रस्थान करणे अनिवार्य होतं.राजभवन आणि विशेषतः राज्यपाल श्रीमान भगतसिंग कोश्यारीजींनी ईशान्य भारतातील आपल्या मुलींना केलेले मार्गदर्शन आणि दिलेले आशीर्वाद ही आयुष्यात कधीही न विसरली जाणारी अनमोल भेट घेऊन, महाराष्ट्राच्या राजभवनातून मिझोरामच्या (मिझो म्हणजे पवित्र आणि राम म्हणजे भूमी) पवित्र भूमी कडे आपुलकीच्या स्नेहाचा संदेश घेऊन सर्व मुली हर्षोल्हासात न्हाऊन रवाना झाल्या.
दयानंद सावंत