रस्त्यावरील मुलांसाठी ‘दादाची शाळा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2022   
Total Views |
street-school



पुण्यातील 21 वर्षीय तरुणाने रस्त्यावरील मुलांसाठी रस्त्यावरच शाळा सुरू केली. ‘दादाची शाळा’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या अशा या शाळांमधील विद्यार्थ्यांचा ‘दादा’ ठरलेल्या अभिजित पोखर्णीकरविषयी...




पुण्यातील कोंढवा खुर्द येथील अभिजित आनंद पोखर्णीकर या 21 वर्षीय तरूणाने दीड वर्षांपूर्वी रस्त्यावरील मुलांसाठी सारसबागेजवळ रस्त्यावरच शाळा सुरू केली. कालांतराने या शाळेला ‘दादाची शाळा’ म्हणून ओळख मिळाली. एक शाळा आणि 12 मुलांपासून सुरू झालेला हा प्रवास आता तब्बल 12 शाळा आणि 500 मुलांपर्यंत येऊन पोहोचला आहे.



ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्यासोबत चार-पाच वर्षं काम करण्याची संधी अभिजितला मिळाली. ‘लोकांचं दुःख समजून घे, तुला आनंद शोधायची गरज पडणार नाही,’ अशी शिकवण त्याला सिंधुताईंकडून मिळाली. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना अनेक सामाजिक संस्थांशी अभिचितचा संबंध आला. ‘युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशन’मध्ये अभिजीतला ‘एसडीजी’ या विषयात ‘इंटर्नशिप’ करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणात 2030पर्यंत काय बदल घडवता येतील, यावर त्याने सखोल संशोधन केले.




त्यानंतर अनेक शिक्षण पद्धतीदेखील अभिजितने समजून घेतल्या. रस्त्यावरील लोकांकडे बघणारं कुणी नाही आणि ज्या काही संस्था आहेत, त्या त्यांच्या जेवणासाठी, राहाण्याच्या सोयींसाठी काम करतात. मात्र, त्यांना स्वावलंबी बनविणारी संस्था सध्याच्या काळात दुर्मीळच. रस्त्यावरील मुलांनी भीक मागू नये, त्यांनी शिक्षित व्हावे, त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलावा, या हेतूने अभिजितने पुण्यातील सारसबागेत पोतराज समाजातील 12 मुलांना घेऊन पहिली रस्त्यावरील शाळा सुरू केली.


प्रचंड विरोधानंतरही अभिजित मात्र डगमगला नाही. शाळेत आणण्यासाठी या मुलांना चक्क खाऊदेखील द्यावा लागत होता. या यशस्वी प्रयोगानंतर ‘दादाच्या शाळां’ची संख्या 12 वर गेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, मुंबईतील बोरिवली येथे संजय गांधी नॅशनल पार्क परिसर, उत्तर प्रदेशातील कानपूरमधील अशोका नगर, पुण्यातील टिळेकर नगर, सारसबाग, विश्रांतवाडी, मार्केट यार्ड, आकुर्डी, शिवाजी नगर, तिरंगुटमध्ये कासार आंबोळी व सुतारवाडी या ठिकाणी आणि रस्त्याबरोबरच आता वस्तीपातळीवरही ‘दादाची शाळा’ भरते.



सध्या 120 जण या उपक्रमात स्वयंसेवक म्हणून कार्यरत असून, जवळपास 500 हून अधिक मुले या शाळांमध्ये शिक्षणाचे धडे घेत आहेत. दरम्यान, ‘इंटर्नशिप’मधून मिळणारे मानधन अभिजित आणि सहकारी या उपक्रमासाठी खर्च करतात. तसेच अनेक दानशूर या उपक्रमासाठी शालेय वस्तूंचीही मदत देऊ करतात. दर गुरूवारी अभिजित सर्व स्वयंसेवकांची बैठक घेतो. यात मुलांना शिकवण्याची पद्धत, नवे उपक्रम, नियोजन यांविषयी चर्चा करून योग्य त्या सूचना दिल्या जातात.
शाळेतील मुलांना त्यांच्या ज्ञानप्राप्तीच्या क्षमतेनुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्तरावरील शिक्षण दिले जाते. गणित, मराठी, इंग्रजी, विज्ञान यांसारख्या विषयांचे सामान्य तथा प्राथमिक ज्ञान मुलांना दिले जाते. दररोज जवळपास तीन ते साडेतीन तास शाळा भरवली जाते. विशेष म्हणजे, अभिजितला या उपक्रमामध्ये शुभम माने, स्नेहल भोसले, वैभव काचले, अंजली शिंदे या सहकार्‍यांचेही प्रचंड सहकार्य मिळते. दादाच्या शाळेत स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी अभिजित युवकांना वेळोवेळी आवाहनदेखील करत असतो.



अभिजित सांगतो की, “सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनप्रवासामुळे मी प्रभावित झालो. मोठी लोकं रस्त्यावरील मुलांकडे वाईट नजरेने बघतात. ती मुलं व्यसनी आहेत, चुकीच्या वळणाची आहेत, असे समजले जाते. मात्र, ती मुलंदेखील माणसं आहेत. त्यांना किमान जगण्यासाठी आवश्यक असलेलं शिक्षण देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. आपण आपल्या समाजाला काही देणे लागतो. मला जे शिक्षण येतं तेच मी त्यांना देतो. जेणेकरून, त्या मुलांची गरिबी आणि अशिक्षितपणा शिक्षणाच्या मार्गाने दूर व्हावा. 21व्या शतकात शिक्षण ही एक दुधारी तलवार असून त्यामुळेच आपण आपला बचाव करू शकतो,” असे अभिजित सांगतो. कौतुकाची बाब म्हणजे, आधी ‘दादाच्या शाळे’तील 30 टक्के मुले सरकारी शाळेत जात होती. मात्र, आता ते प्रमाण तब्बल 60 टक्क्यांवर गेले आहे.



विशेष म्हणजे, आतापर्यंत 76 मुलांना सरकारी शाळेत प्रवेश मिळवून देण्यातही अभिजित यशस्वी ठरला आहे. अनेक मुलांकडे महत्त्वाची कागदपत्रे नसतात. मात्र, त्यांना शाळेत दाखल केल्यानंतर त्यांना शाळेच्या दाखल्यावरून अनेक कागदपत्रे तयार करता येऊ शकतात. त्यामुळे शाळेतील प्रवेश महत्त्वपूर्ण आहे. “मी शिकवलं तरी ते त्यांना जगताना उपयोगी पडेल. मात्र, पुढील जीवनासाठी या मुलांना शालेय प्रमाणपत्र महत्त्वाचे आहे,” असे अभिजित सांगतो. सुखवस्तू कुटुंंबात जन्म घेऊनही अभिजितने रस्त्यावरील आणि वंचित मुलांसाठी ‘दादाची शाळा’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. एका शाखेपासून सुरू झालेला हा प्रवास तब्बल 12 शाळांपर्यंत येऊन ठेपला आहे. अभिजित पोखर्णीकरच्या या प्रामाणिक प्रयत्नांना दै. ‘मुंबई तरूण भारत’कडून मनःपूर्वकशुभेच्छा...



7058589767
@@AUTHORINFO_V1@@