अनाथाश्रम आणि मुली...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2022   
Total Views |

Orphanage and girls 
 
 
 
महिला-मुलींसंदर्भात कायद्यांतील बदलांची चर्चा करताना, मुलींच्या एका गटाचा विचार आणखीन व्यापक नियोजन आणि कायद्याच्या चौकटीत करावा लागेल. हा गट आहे अनाथाश्रमात वास्तव्यास असणार्‍या मुलींचा. दुर्दैवाने आईवडिलांच्या ममतेला पारख्या झालेल्या या निष्पाप मुली. अनाथाश्रमात आसरा मिळाल्यामुळे त्यांच्या अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता होते. तसेच त्यांच्या किमान शिक्षणाची सोयही होते. बाहेरच्या जगात मुलगा आणि मुलगी यांच्या संगोपनात मुलींसाठी थोडी काळजी, थोडी सुरक्षा उपाययोजना अधिक घेतली जाते. तसेच मुलगी आहे, तर तिला भविष्यात काय समस्या उद्भवू शकतील, याचा विचार करून नियोजनही केले जाते. पण, अनाथाश्रमात राहणार्‍या मुलींचे काय? आश्रमातले सगळे नियोजन कायद्यानुसार! त्या मुलीला १८वे वर्ष लागले की, ती आश्रमात राहू शकत नाही. मुलांच्या बाबतीतही हाच नियम. पण, १८ वर्षांचा मुलगा आणि १८ वर्षांची मुलगी अचानक निवाराहीन झाले तर? तर ते त्रासदायक कुणासाठी असेल? की अनाथाश्रमातील मुलगी १८ वर्षांची झाली की, लगेचच तिचा विवाह उरकून तिला घरं शोधून द्यायचे? वयाच्या १८व्या वर्षापर्यंत मुलगी जास्तीत जास्त बारावीपर्यंत शिकलेली असते. असेही नाही की, तिचे शिक्षण पूर्ण झालेले असते आणि तिला नोकरी वगैरे लागलेली असते. या अशा परिस्थितीमध्ये या मुलींसाठी कायदा काय तर, तिचे वयवर्ष १८ पूर्ण झाले की, ती एक दिवसही कायदेशीररित्या आश्रमात राहू शकत नाही. १८ वर्षानंतर आश्रमाबाहेर जावे लागणार्‍या या मुलींचे पुढे काय होते? यांना कोणत्या समस्याना तोंड द्यावे लागत असेल, हे प्रश्न केवळ अस्वस्थ करणारे आहेत. दुर्दैव हेच की, समाजात आजही या अनाथ मुलांचा विचार केवळ कायदेशीररित्या केला जातो. या मुलामुलींचा माणुसकीच्या दृष्टीने विचारही व्हायला हवा. मान्य आहे की, मुलगी काय, मुलगा काय, केव्हा ना केव्हा त्यांना अनाथाश्रमातून बाहेर पडायचे आहेच. पण,निदान मुलींच्या बाबतीत तरी आश्रमातून बाहेर पडण्याच्या वयाचा विचार नव्याने होणे गरजेचे आहे. तिला आई-बाप नसले म्हणून काय झाले आहे तर ती तुमच्या माझ्या घरच्या लेकीबाळींसारखी मुलगीच ना हो शेवटी?
 
 
समरसता यांना काय कळणार?
 
गरिबांच्या घरी तेही जातपात पाहून, (म्हणजे गरीब आणि जातीच्या उतरंडीत मागास समाज) असेल, तर त्यांच्या घरी जायचे, त्यांच्यासोबतपंक्तीला बसून जेवायचे हा एक मोठा ‘इव्हेंट’च झाला आहे. निवडणुका असल्या की, राजकीय उमेदवार हा ‘इव्हेंट’ मोठ्या थाटामाटात आणि जाहिरातबाजी करून करतातच करतात. गांधी परिवाराने तर या ‘इव्हेंट’चे जणू ‘पेटंट’च घेतलेले दिसते. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी गरिबाच्या झोपडीत भाकरी-भाजी खाताना दिसतात. गरिबाच्या घरी असे जेवल्यानंतर मग हेच बहीणभाऊ मोदींच्या राज्यात कशी जनता गरीब आहे, हे सांगायला मोकळे! मात्र, या देशात ६० वर्षं त्यांच्याच पक्षाची आणि त्यातही त्यांच्याच कुटुंबाची सत्ता होती आणि या ६० वर्षांत ‘गरिबी हटावं’ हा त्यांचाच नारा होता, हे मात्र ते सपशेल विसरलेले दिसतात.जणू काही गरिबी आता आता २०१४ सालापासून मोदी-भाजप राज्यातच आली... असो. तर हे सगळे सांगण्याचे कारण असे सदा सर्वकाळ गरिबांच्या घरी जाऊन रोटी खाण्याचे ‘इव्हेंट’ करणारे सध्या योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल बोलत आहेत. तर योगी एका गरिबाच्या घरी जेवले. हे विरोधी पक्षाला भावले नाही. योगी ढोंग करत आहेत, स्टंट करत आहेत, असे जेवून काय होणार वगैरे वगैरे त्यांची नेहमीची भाषा. पण, असे बोलणारे मात्र विसरतात की,आपण गरिबाच्या घरी जेवलो म्हणजे अगदी जगावेगळे मौल्यवान कार्य केले असे योगी कुठेही म्हणाले नाहीत. ‘एक संन्यासी’ ही त्यांची आंतरिक ओळख आहे आणि ती ओळख ते कधीच विसरत नाहीत. असो. नुकतेच काशिविश्वेश्वर धाम सोहळा सगळ्या जगाने पाहिला. त्या सोहळ्यांनतर मंदिर बनवणार्‍या कारांगीरसोबत पंक्तीला बसून सहभोजन ग्रहण करणारे पंतप्रधान मोदीही सगळ्यांनी पाहिले. याच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वासोबत काम करणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत. इथे ढोंग, स्वार्थ आणि विषमतेला थारा नाही. तर इथे फक्त एकच विचार आहे तो म्हणजे ‘समरस भावसे सब समाज को साथ लिये चलना...’ पण छे!! गांधी आणि त्यांच्या सोबतच्या राजकीय पक्षांना अजून समताच उमगली नाही, तर समरसतेचे काय बोलावे?
 
 
९५९४९६९६३८
 
@@AUTHORINFO_V1@@