‘मेहता पब्लिशिंग हाऊस’चे संचालक सुनील मेहता यांचे बुधवार, दि. १२ जानेवारी रोजी पुण्यात उपचारादरम्यान निधन झाले. मेहता यांच्यासोबत काही काळ काम केलेल्या अक्षय वाटवे यांनी सुनील सरांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा...
तुझ्या डोक्यात ज्या काही कल्पना असतील, त्या कागदावर उतरवून मला दे. आपण चर्चा करू आणि तसे उपक्रम राबवू...” आमच्या पहिल्याच भेटीत कामाला सुरुवात करण्याआधी पूर्वनियोजन महत्त्वाचं आहे, असा धडा देणारे सुनील मेहता माझ्याही नकळत माझे मार्गदर्शक मित्र बनले. गोष्टींची पुस्तकं, कथा-कादंबर्या वाचण्यापलीकडे मराठी साहित्य व्यवहाराशी अजिबात संबंध नसलेला मी तेव्हा नुकताच मुंबईहून पुण्यात आलो होतो. नोकरीच्या शोधात असताना ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’मध्ये ‘जनसंपर्क व्यवस्थापक हवा’ (पीआर मॅनेजर) असल्याची जाहिरात वाचून मी मुलाखतीला गेलो. ती त्यांची माझी पहिली भेट. साधारण २०१४ सालची ही घटना. माझा पूर्वानुभव मनोरंजन क्षेत्रातला आणि वृत्तपत्र माध्यमाचा अत्यल्प अनुभव; मात्र या क्षेत्रात काम करायची इच्छा खूप होती. नोकरीचीही तशी तातडीने गरज होती. प्रकाशन व्यवसायात जनसंपर्क व्यवस्थापक असतो याचं मला विशेष कुतूहल वाटलं. मात्र, प्रत्यक्ष मेहतांसोबत काम करायला सुरूवात केल्यानंतर त्यांच्या धडाडीचं, जबरदस्त नियोजन कौशल्याचं, दूरदृष्टीचं, व्यवसायाविषयीच्या व्यापक दृष्टिकोनाचं, सतत नाविन्याची कास धरून तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसायवृद्धी करण्याच्या विचाराचं, अशा अनेक गुणांचं कुतूहल वाटत राहिलं. हळूहळू वाढत गेलं. त्यांच्यासोबत काम करताकरता थोडं तरी शिकून घ्यावं, हीच एक भावना मनात कायम होती आणि कळतनकळत सुनील मेहता सर सतत नव्या कल्पना मांडून त्यावर चर्चा घडवून मला शिकवत होते.
मितभाषी स्वभावाचे सुनील मेहता पटकन चिडतात किंवा चिडून बोलतात, अशी वदंता माझ्या कानावर आली होती. एकदोन प्रसंगी ऑफिसमध्ये मी त्यांना चिडलेलं पाहिलंही. मात्र, थोडं खोलात शिरून जाणून घेतल्यावर माझ्या लक्षात आलं की, त्यांनी कामाबद्दल त्यांच्या अपेक्षा आधीच व्यक्त केलेल्या असतात, तुम्ही त्यांना काही एक कबूल केलं आणि जर ते तसंच्या तसं तुम्ही करू शकला नाहीत, तर मात्र त्यांचा पारा चढायचा! अवास्तव आश्वासनांना त्यांनी कधीच थारा दिला नाही. स्वतःही त्यांनी कधी तशी आश्वासनं दिली नाहीत. पारदर्शक नियोजन आणि चोख व्यवहार असला की, सारं सुरळीत घडायचं असा अनुभव मला नेहमीच आला. अर्थात, आमचे वाद झाले, पण ते चांगल्या कारणासाठी आणि हाती घेतलेल्या उपक्रमाच्या हितासाठीच! साधारण वर्ष-सव्वा वर्षांचा त्यांचा रोजचा सहवास मला लाभला. हा काळ माझ्यासाठी महत्त्वाचा होता. याच काळात प्रकाशन क्षेत्रात ‘डिजिटायझेशन’ची धूम सुरू होती. अर्थात, ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ त्यातही अग्रेसर होतंच. कंपनीचे स्वतःचे संकेतस्थळ होते. ‘ऑनलाईन’ पुस्तक विक्री सुरू होती. स्वतःचे ‘अॅप’ही होते. ई-बुक्स निर्मिती केली जात होती. यातलं थोडं थोडं शिकत असताना एक दिवस आम्ही ‘राष्ट्रीय पुस्तक सप्ताह’ साजरा करायचं ठरवलं. सात दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित करायचे होते. अर्थात, सगळं प्लॅनिंग कागदावर उतरवून त्यात सरांनी सुचवलेले बदल करून, सातही दिवस सर्व कार्यक्रम सुविहित पार पडले. पहिल्यांदाच ‘डिजिटल पब्लिशिंग’ आणि ‘प्रिंट पब्लिशिंग’ याविषयी खुली चर्चा घेण्यात आली. या सगळ्या उपक्रमांच्या आयोजनात मी नवखा असलो तरी कल्पना राबवण्यासाठी मला पूर्ण स्वातंत्र्य त्यांनी दिलं. ज्यातून माझ्यातला आत्मविश्वास वाढला. अनेक गोष्टी शिकता आल्या. ज्याचा आजही मला फायदाच होतो आहे.
त्यातूनच पुढे मला पूर्णवेळ ‘डिजिटल पब्लिशिंग’ क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा त्याचंही मेहता सरांनी स्वागत केलं. पुढे येणार्या खाचखळग्यांची जाणीव करून दिली आणि अर्थातच गरज लागेल तेव्हा बिनदिक्कत हाक मारण्याचा हक्कही दिला! पुढे मी जरी ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’मध्ये नोकरी करत नसलो तरी मेहता सर मात्र माझ्या कामावर लक्ष ठेवून असायचे. अधूनमधून फोनवरून चौकशी, गप्पा व्हायच्या. भेटलो की, बोलणं व्हायचं. त्यांच्याविषयी कायमच एकप्रकारची आदरयुक्त भीती मनात कायम होती. एका टप्प्यावर मी नोकरी करायची नाही असं ठरवून स्वतंत्र काम करू लागलो. तेव्हा आम्ही फोनवर सविस्तर बोललो होतो. त्यांचा खूप आधार वाटला होता. पुण्यात बाजीराव रस्त्यावर, ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’च्या कार्यालयात त्यांच्या कल्पनेतून प्रशस्त आणि देखणं ग्रंथदालन साकारलं आहे. तिथे गेलं की, निवांत बसून पुस्तकं चाळताचाळता वेळ कसा निघून जातो कळतच नाही. या ग्रंथदालनात नियमित स्वरूपात काही साहित्यिक उपक्रम सुरू व्हावेत, ही त्यांची मनापासून इच्छा होती. आज ’होती’ लिहिताना माझा हात कापतो आहे. सुनील मेहता या जगात नाहीत, हे वाक्य लिहिणं माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे.
‘लॉकडाऊन’च्या काळातही जिद्दीनं त्यांनी व्यवसायाची आघाडी सांभाळली. वृद्धी घडवून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. निर्बंध शिथिल झाले, तेव्हा एकदा आम्ही प्रत्यक्ष भेटलो. कारण, पुस्तकांचा प्रचार-प्रसार व्हावा, या हेतूने मेहता सरांच्या काही कल्पना आम्ही मिळून प्रत्यक्ष साकारायचं ठरवत होतो. ती भेट माझ्यासाठीही खूपच उत्साहवर्धक होती, लागलीच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा नाशिकमध्ये साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं, तेव्हा पुन्हा त्यांनी तीन दिवसांत सात विविध साहित्यिक उपक्रम राबविण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. ग्रंथप्रदर्शनात चार स्टॉलचं स्वतंत्र दालन उभं करायचं... त्या रिकाम्या दालनात लेखक-प्रकाशक-वाचक साहित्य व्यवहाराशी जोडलेल्या मंडळींच्या भेटीगाठी घडवून आणायच्या. एकतर कोरोनाने सगळ्याच उद्योगांचं कंबरडं मोडलेलं असताना, पदरमोड करून असा काही साहित्यिक उपक्रम राबवायचा, त्याकरिता आवश्यक ते सगळं करायचं, हे फक्त मेहताच करू शकतात. अगदी आदल्या दिवशी पाऊस पडून, दुसर्या दिवशी पूर्णपणे पावसाचं सावट असतानासुद्धा सुनील मेहता जबरदस्त उत्साहाने वावरत होते. स्टॉल सजवत होते. तिन्ही दिवस अजिबात न थकता सगळ्यांशी संवाद साधत होते. त्या काळातही त्यांचं पथ्यपाणी सुरू होतं. मात्र, त्याचा कुठेही अडसर येऊ न देता डोक्यातल्या एकाच विचाराने त्यांना झपाटलं होतं, ते म्हणजे मराठी वाचकांना उत्तम अनुभव मिळायला हवा. मेहता स्वतः देशविदेशातल्या साहित्यिक उपक्रमांना आवर्जून हजेरी लावायचे. ‘वर्ल्ड बुक फेअर’सारख्या अतिभव्य प्रदर्शनात जाऊन आल्यावर तिथे जे जे पाहिलं, ते सगळं आपल्या मराठी वाचकांना पाहायला, अनुभवायला मिळावं, अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी इतर भाषेतील पुस्तकांचे फक्त अनुवाद प्रकाशित केले नाहीत, तर तिथल्या लेखकांना इथे आणलं. वाचकांसाठी अनेक योजना आखल्या. ठिकठिकाणी प्रदर्शनं भरवली. मराठीतल्या आघाडीच्या लेखकांच्या साहित्य कृती पुनःप्रकाशित केल्या.
यंदाच्या साहित्य संमेलनात ते आवर्जून नव्या लेखकांना भेटत होते. त्यांच्या कल्पना समजून घेत होते. त्यांना पुस्तक प्रकाशनाविषयी मार्गदर्शन करत होते. प्रचंड उर्जेने भारलेला त्यांचा हा वावर पाहून अवघ्या एका महिन्यात नियतीने असा काही क्रूर डाव आखला असेल, हे जरी एखाद्या ज्योतिषाने वर्तवलं असतं तरी सगळ्यांनी त्याला मूर्खात काढून हाकलून दिलं असतं. संमेलनाच्या शेवटच्या दिवशी थोडं निवांत बसलेले असताना त्यांनी लगेचच पुढच्या नियोजनाविषयी बोलायला सुरुवात केली होती. अर्थात, इतक्या वर्षांच्या त्यांच्या सहवासामुळे मी आपसूक बोलून गेलो, “पुण्यात पोहोचलो की, माझ्या डोक्यातल्या कल्पना नीट कागदावर मांडून तुम्हाला मेल करतो. मग आपण चर्चा करू.” पण, आज सुनील मेहता आपल्यात नाहीत... आजही माझ्या लॅपटॉपमध्ये ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’चा फोल्डर आणि त्यात सुनील सरांच्या नावाने केलेल्या ‘प्लॅनिंग’ची फाईल आहे. कदाचित आम्ही पुढेमागे त्यातले काही उपक्रम राबवूसुद्धा. पण, सुनील सरांसोबत आता चर्चा होणार नाही. त्यातल्या नेमक्या उणीवा दाखवून त्या सुधारण्यासाठी ते मार्गदर्शन करणार नाहीत. चुका पदरात घेत, हसतहसत पाठ थोपटून यशाचं कौतुक करणार नाहीत... आपल्या मस्तीत जगणारा, जणू आभाळ कोसळलं तरी ते उरावर पेलून धरण्याची जिद्ध बाळगणारा, मराठी प्रकाशनविश्वात क्रांतिकारी उपक्रम राबविणारा, मराठी प्रकाशन संस्थेच्या कार्यालयाला कॉर्पोरेट ऑफिसचा निव्वळ लूकच नव्हे, तर ती वृत्तीसुद्धा मिळवून देणारा आमचा ‘टीम लीडर’ आज आमच्यात नाही, हे मानायला मन अजून तयार होत नाही.
माझं जसं व्यक्तिगत नुकसान झालं आहे, तसं ते अनेकांचं झालं आहे. वेगवेगळ्या भाषांमधल्या दर्जेदार साहित्यकृती शोधून त्या मराठी वाचकांपर्यंत मोठ्या संख्येनं आणि भरधाव वेगानं आणण्याचं काम आता मंदावेल हे नक्की! मात्र, हेही तितकंच खरं की, त्यांनी आजवर केलेलं काम सगळ्यांसमोर आदर्श म्हणून असणार आहे. तेवढंच दर्जेदार काम करत राहणं ही त्यांना खरी आदरांजली ठरेल...
- अक्षय वाटवे
९७६६९९१४२१