लक्ष्यभेदी ‘रुद्रांक्ष’

    15-Jan-2022   
Total Views |

rudranksh


संघर्ष जितका कठीण तितके यश उज्ज्वल असते, असं स्वामी विवेकानंदांनी म्हटलयं! या तत्वानुसार अभ्यासासोबतच नेमबाजीसारख्या खेळात जीवतोड मेहनत करणार्‍या लक्ष्यभेदी रुद्रांक्ष या युवकाविषयी...


नेमबाजीसारख्या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर जिगरबाज कामगिरी करणारा ठाण्यातील रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील या बारावी इयत्तेतील विद्यार्थ्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. अल्प कालावधीत जिद्द, चिकाटी आणि सातत्य या त्रिसुत्रीच्या जोरावर त्याने घेतलेली लक्ष्यभेदी झेप अभिमानास्पद आहे. उत्तरोत्तर शिक्षणाच्या इयत्ता यशस्वीपणे पादांक्रांत करत नेमबाजीतही त्याने सुवर्णवेध घेतले. नेमबाजीत नाममुद्रा उमटवणारा रुद्रांक्ष हा ठाणे शहरातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी बाळासाहेब पाटील व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांचा चिरंजीव.
लहानपणी रुद्रांक्षला स्केटिंग, बुद्धिबळ व फुटबॉल हे खेळ आवडायचे. या खेळांमध्ये त्याला चांगली गतीदेखील होती. पाटील कुटुंबीय २०११ पासून ठाण्यात स्थायिक झाल्यावर २०१४ मध्ये बाळासाहेब पाटील वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्यावेळी ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ शाळेच्या बेसमेंटमध्ये लष्करातून निवृत्त झालेले मेजर गावंड यांनी सुरु केलेल्या ’द्रोणाचार्य शुटिंग रेंज’ या उपक्रमाच्या उद्घाटन समारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शुटिंग रेंज पाहून त्यांनी तेथील उपस्थितांशी चर्चा करून रुद्रांक्षला नेमबाजीच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्याचे ठरवले. रुद्रांक्षची आई हेमांगिनी पाटील यांनीही ही संकल्पना उचलून धरीत तत्काळ शुटिंग रेंजच्या कोच स्नेहल पापळकर-कदम यांच्याशी संपर्क साधला आणि रुद्रांक्षला द्रोणाचार्य शुटिंग रेंज येथे प्रशिक्षणासाठी पाठवण्याचे ठरले. इथेच रुद्रांक्षच्या नेमबाजीच्या सरावाची बीजे रोवली गेली अन् अल्प कालावधीतच त्याने दहा मीटर ‘एअर रायफल’ प्रकारात लक्ष्यभेद करण्यास सुरुवात केली.
भारतीय नेमबाज अभिनव बिंद्रा याला आपला आदर्श मानणार्‍या रुद्रांक्षने कठोर परिश्रमात कोणतीही कसर सोडली नाही. २०१५ मध्ये जिल्हा स्तरावरील स्पर्धेत रुद्रांक्षने रौप्य पदकाला गवसणी घातली. मुंबई झोनमध्येही पदकावर नाव कोरले. अमरावती येथे राज्यस्तरीय स्पर्धेत रुद्रांक्षने तृतीय स्थान पटकावले, त्याचवर्षी इंदौर (मध्य प्रदेश)मध्ये राष्ट्रीय शालेय स्पर्धेतरौप्यपदक मिळवले. पहिल्याच वर्षी मिळालेल्या यशाने अत्यंत सकारात्मक परिणाम होऊन त्याने कठोर परिश्रम घेण्यास सुरुवात केली. यासाठी त्याला आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारे हाय परफॉर्मन्स कोच अजित पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

२०१९-२०२० मध्ये ‘खेलो इंडिया’ १७ वर्षांखालील कनिष्ठ गटात सुवर्णपदक, आंतरराष्ट्रीय ऑनलाईन चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक, इजिप्तमध्ये पिरॅमिड आंतरराष्ट्रीय ऑनलाईन चॅम्पियनशीपमध्ये कांस्यपदक, २०२१ मध्ये ज्युनिअर वर्ल्ड शुटिंग चॅम्पियनशीपमध्ये पेरू, दक्षिण अमेरिकेत रौप्यपदक, भोपाळ येथे नॅशनल शुटिंग चॅम्पियनशीपमध्ये सिनियर, ज्युनियर आणि युथ कॅटेगिरीत रौप्यपदक पटकावून या स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट केली. न्यू पनवेल येथे ‘आर. आर. लक्ष्य कप’ स्पर्धेतइंडियाज ‘टॉप-२०’ इंटरनॅशनल इव्हेंटमध्ये सुवर्णपदकासह एक लाखांचे पारितोषिकही त्याने पटकावले.सध्या रुद्रांक्ष बारावी इयत्तेत शिकत असून, भविष्यात २०२४च्या ऑलिम्पिकमध्ये धडक मारून भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय त्याने उराशी बाळगले आहे. त्यासाठी दररोज पाच ते सहा तास नेमबाजीचा सराव करून तितकाच वेळ तो अभ्यासालाही देतो. त्यामुळे दहावीत त्याने ९२ टक्के गुण मिळवले.


 
‘कोविड’ काळात ठाण्याचे जिल्हाधिकारी यांच्या विशेष परवानगीने त्याला सराव करायला मिळाल्याने नेमबाजीत सातत्य राखता आल्याचे तो सांगतो. केंद्र सरकारच्या ‘टॉप्स’ (टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम) मध्ये रुद्रांक्षची निवड झाली असून, त्याअन्वये वर्षाला आठ लाखांपर्यंत खर्च व महिन्याला १५ हजार (क्रीडाविषयक वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी) केंद्र सरकार देते. ‘ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट’ या प्रकाश पदुकोण यांच्या फाऊंडेशनमार्फत त्याची निवड होऊन वर्षाला दहा लाख खर्च व मासिक २५ हजार देण्यात येत असल्याचे त्याने सांगितले. नेमबाजीतील यशामुळे एअरफोर्स, लष्कर, रेल्वे आदींसह विविध खासगी कंपन्यांनीही रूदांक्षला आपले प्रतिनिधित्व करण्याचे प्रस्ताव दिले आहेत. परंतु, तूर्तास हे सर्व प्रस्ताव गुंडाळून त्याने देशासाठी खेळण्याचे ध्येय मनी बाळगले आहे.

आई-वडील दोघेही शासकीय सेवेत कर्तव्य बजावत असले, तरी त्यांनी आपल्या संगोपनात कुठलीही कसर ठेवलेली नाही.त्याच्याच पावलावर पाऊल टाकीत धाकटा भाऊ देवांश हा देखील नेमबाजीच्या प्रेमात पडल्याचे रुद्रांक्ष सांगतो. खेळात अनेक चांगले-वाईट अनुभव येत असतात. एकदा कोपरीतील शाळेच्या बेसमेंटमध्ये सराव करीत असताना रात्र कधी झाली कळलेच नाही. बाहेर मुसळधार पावसाचे थैमान सुरु होते. बघता बघता शाळेचा परिसर पाण्याने वेढला गेला. रात्री उशिरापर्यंत बेसमेंटमध्येच अडकून पडल्याने बाहेर कसे पडायचे याची विवंचना त्याला पडली होती. अखेर, पालकांनी पोलिसांना कळवून त्याची तेथून सुखरूप सुटका केल्याचा थरारक अनुभव तो सांगतो.
“क्रीडा क्षेत्राला कधीच कमी समजू नका. होतकरू विद्यार्थ्यांनी तर अभ्यासाबरोबरच खेळालाही महत्त्व द्यायला हवे,” असा संदेशही तो विद्यार्थ्यांना देतो. अशा या लक्षवेधी रुद्रांक्षला नेमबाजीत लक्ष्यभेद करण्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!



- दीपक शेलार

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दीपक शेलार

वायसीएमओयू मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका, तसेच पदवी. 'मुंबई तरुण भारत' या प्रथितयश मराठी दैनिकात ठाणे ब्युरो चिफपदी कार्यरत. ३० वर्षांपासून वृत्तपत्रविक्रेता, गेले एक तप विविध राज्यस्तरीय, तसेच स्थानिक वृत्तपत्रे व वाहिन्यांसाठी वृत्तांकन. गड-किल्ले भ्रमंती आणि मराठी नाटक, साहित्यात रुची, नवे शिकण्याचा हव्यास.