गोष्ट एका गोड ‘माई आजी’ची...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2022   
Total Views |

Rekha Kamat.jpg


६० वर्षांहून अधिक काळ मराठी क्षेत्रात कार्यरत अभिनेत्री रेखा कामत यांचे नुकतेच निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा हा लेख...


अभिनयाला आपले सर्वस्व मानत गेल्या ६० वर्षांपासून सुरु असलेला रेखा कामत म्हणजेच आजच्या तरुणाईच्या लाडक्या ‘माई आजी’चा प्रवास दि. ११ जानेवारी रोजी कायमचा थांबला. रेखा कामत यांचे वयाच्या ८९व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी आयुष्याची तब्बल ६० वर्षं अभिनय क्षेत्रासाठी तर दिलीच, शिवाय ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट’ जमान्यापासून ते सध्याच्या रंगीत टीव्हीपर्यंतचा त्यांचा हा प्रवास या क्षेत्रात करिअर करु इच्छिणार्‍या तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. लहानपणी मेळाव्यात काम करण्यापासूनचा रेखा कामत यांचा हा प्रवास पुढे मालिका, चित्रपट तसेच जाहिरातींमधूनही प्रेक्षकांनी अनुभवला. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनप्रवासाचा घेतलेला हा धावता आढावा...


 
स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे १९३२ साली जन्मलेल्या रेखा कामत यांचे बालपण दादरच्या मिरांडा चाळीत गेले. सुप्रसिद्ध ‘प्लाझा’ चित्रपटगृहाशेजारीच असलेल्या या चाळीतील गणेशोत्सवातील कार्यक्रमांमध्ये छोट्याछोट्या नाटिकांपासून त्यांच्या अभिनयाची सुरुवात झाली. त्यांचे इयत्ता चौथीपर्यंतचे शिक्षण हे भवानी शंकर रोडवरील कुंभारवाडा परिसरातील शाळेत झाले. यादरम्यान सुरु असलेल्या त्यांच्या नाटिकांमुळे रंगभूमीवर काम करण्याची संधी रेखा यांना अगदी लहानपणीच मिळाली. पुढे पाचव्या इयत्तेनंतर दादरमधील ‘इंडियन एज्युकेशन सोसायटी’च्या मुलींच्या शाळेत शिकत असताना रेखा यांनी नृत्याचे आणि गायनाचे धडे गिरवले. हे धडे गिरवताना त्यांनी मेळाव्यातून काम करण्याची संधी कधीही सोडली नाही. १५व्या वर्षी त्यांना सचिन शंकर यांच्या ‘रामलीला’ या प्रसिद्ध नृत्यनाटिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यांची अभिनयातील गुणवत्ता पाहता कुटुंबानेदेखील त्यांना चांगली साथ दिली. त्यांचे माहेरचे नाव म्हणजे कुमुद सुखटणकर, तर त्यांची छोटी बहीण कुसुम यादेखील त्यांच्यासोबत नृत्याचे प्रशिक्षण घेत होत्या.



 
एकदा योगायोगाने त्यावेळच्या प्रसिद्ध अभिनेत्री हंसा वाडकर यांची नजर त्यांच्या नृत्यकौशल्यावर पडली. त्यांनी यावेळी कुमुद आणि कुसुम यांचे नाव राजाभाऊ परांजपे, सुधीर फडके आणि ग. दि. माडगुळकर या त्रिमूर्तीला सुचवले. तसेच, ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटासाठी त्यांची निवड करण्यात आली. चित्रपट क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी गदिमांनी या दोघींना रेखा-चित्रा अशी नावे दिली. याचदरम्यान त्यांची चित्रपटाचे सहसंवाद लेखक ग. रा. कामत यांच्याशी ओळख झाली आणि वयाच्या १९व्या वर्षी त्यांनी त्यांच्याशीच लग्नगाठ बांधली. पुढे त्यांना ’कुबेराचं धन’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि त्यांचा यशस्वी अभिनेत्रीचा प्रवास सुरु झाला. पुढे ’गृहदेवता’, ’गंगेत घोडे न्हाले’, ’मी तुळस तुझ्या अंगणी’, ’माझी जमीन’, ’अगंबाई अरेच्चा’ हे चित्रपट चांगलेच गाजले. त्यानंतर मुंबईत स्थायिक झाल्यावर त्यांनी संगीत नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. ’सौभद्र’, ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘संशयकल्लोळ’ आदी संगीत नाटकांतून, तसेच ‘दिल्या घरी तू सुखी राहा’, ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘लग्नाची बेडी’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘कालचक्र’ इत्यादी नाटकांमधून त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या.



’दिवा जळू दे सारी रात’ या नाटकाने रेखा कामत यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. नाट्यक्षेत्रामध्ये काम करताना त्यांनी व्यावसायिक तसेच प्रायोगिक नाटकांचा अचूक समतोल साधला. त्यानंतर त्यांनी छोट्या पडद्यावरही काम करण्यास सुरुवात केली. त्यांची पहिली मालिका म्हणजे प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित ‘प्रपंच.’ या मालिकेत साकारलेली ’अक्का’ची भूमिका त्यावेळी सर्वांच्या पसंतीस पडली. शहरासोबतच खेड्यापाड्यातही त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळू लागली होती. ’माणूस’, ’याला जीवन ऐसे नाव’, ’सांजसावल्या’ या त्यांच्या अलीकडच्या काळातील प्रसिद्ध मालिका. यादरम्यान त्यांनी जाहिरात क्षेत्रातही काम करण्यास सुरुवात केली. यावेळी वयाची साठी ओलांडल्यानंतरही त्यांची अभिनयातील उत्सुकता आणि आत्मविश्वास हा तरुणाईला लाजवणारा असाच होता. ’एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेतील त्यांची ’माई आजी’ची भूमिका महाराष्ट्रभर प्रचंड गाजली. विशेष म्हणजे, तरुणांमध्येदेखील या भूमिकेची दखल घेतली गेली. यादरम्यान २००५ मध्ये त्यांना अभिनयाच्या प्रदीर्घ कारकिर्दीसाठी ’जनकवी पी. सावळाराम पुरस्कार’, २००७ मध्ये महाराष्ट्र सरकारकडून ’जीवनगौरव पुरस्कार’, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या ’नवरत्न पुरस्कार २०१२’ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. पण, गेल्या ६० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी साकारलेल्या भूमिका या छोट्यांपासून अगदी ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या पसंतीस पडल्या. वयाच्या ८९व्या वर्षी सर्वांच्या लाडक्या ’माई आजी’ने ‘एक्झिट’ घेतली. मात्र, सर्वांच्या मनात घर करून राहातील अशा गोड भूमिका देऊन गेल्या.




@@AUTHORINFO_V1@@