भाजपचे मनीष दळवी बनले सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी नावे निश्चित

    13-Jan-2022
Total Views |

rane



कणकवली :  सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ अपेक्षेप्रमाणे भाजपचे मनीष दळवी यांच्या गळ्यात पडली आहे. तर उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर हे विजयी झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने विजय प्राप्त केला आहे.


या निवडणुकीत १९ पैकी ११ सदस्य हे भाजपचे निवडून आले आहेत. तर आठ संचालक पदांवर महाविकास आघाडीच्या संचालकांना विजय मिळवता आला होता. आज गुरुवारी या बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपचे मनिष दळवी यांनी अध्यक्षपदासाठी तर अतुल काळसेकर यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले होते.

तर महाविकास आघाडीच्या वतीने अध्यक्षपदासाठी व्हिक्टर डांटस तर उपाध्यक्षपदासाठी सुशांत नाईक यांनी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत भाजपचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी ११ विरुद्ध ७ अशा मतांनी विजय मिळवला. महाविकास आघाडीच्या सदस्या सौ. अनिता राणे या निवडणूक प्रक्रियेत अनुपस्थित राहिल्या होत्या.

जिल्हा बँकेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रणित पॅनलची सत्ता आहे. या बँकेच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत १९ जागासाठी एकूण ३९ उमेदवार रिंगणात उतरले होते. लक्षवेधी ठरलेल्या जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या सिध्दिविनायक सहकार पॅनेलने ११ जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळविले होते. तर शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सहकार वैभव पॅनलला केवळ ८ जागांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतिश सावंत व भाजप पॅनलचे प्रमुख राजन तेली यांचा या निवडणुकीत पराभव झाला.