बेडकांच्या गोष्टी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2022   
Total Views |

Sharad Pawar Sanjay Raut
 
 
एकदा डबक्यातल्या बेडकाला कुणीही विचारले नाही की, समुद्र मोठा की डबके? तरीसुद्धा बेडूक म्हणतो, “समुद्र काही मोठाबिठा नसतो.” त्यात बेडकाची तरी काय चूक? कारण, त्याचा संबंध डबक्याशीच! त्यामुळे तो म्हणतो की, “समुद्र झाला म्हणून काही तो मोठा नसतो.” पुढची गोष्ट सांगता तो म्हणाला, “आज संजय राऊत पण म्हणाले, पंतप्रधान झाले म्हणून काही कोणी मोठं होत नाही.” त्याला म्हटलं, “अरे बेडकाच्या गोष्टीत हे काय मधे आणलेस?” तर तो म्हणाला, “तुम्हाला मूर्ख बेडकाची गोष्ट माहिती आहे का? इतर बेडूक आपल्याशी स्पर्धा करतात म्हणून त्यांचा काटा काढण्यासाठी बेडूकराजा सापाशीहातमिळवणी करतो. सापाला घेऊन बेडूकराजा त्याच्या विहिरीत येतो. म्हणतो, “तू फक्त माझ्या शत्रू बेडकांना खायचे.” काही दिवसांनी बेडूकराजाचे शत्रू संपतात. मग साप बेडूकराजाच्या मित्र बेडकांकडे मोर्चा वळवतो. बेडूकराजा वैतागतो. सापाला सांगतो, “तू आमच्या विहिरीतून जा.” पण, साप त्या बेडूकराजालाच खाण्याचा प्रयत्न करतो. बेडूकराजा सैरावैरा पळत स्वत:च्याच विहिरीतून बाहेर पडतो. काय मिळाले त्या बेडूकराजाला? संजय राऊतांनी आणि त्यांच्या साहेबांनी या बेडकाच्या गोष्टी वाचल्यात का? ‘मला माहिती नाही’ म्हंटल्यावर तो म्हणाला, “थांबा थांबा... बेडकाची ती गोष्ट माहिती आहे का? ती बेडूक आणि बैलाची.” बैलाला बघून बेडकाला खूप इर्ष्या होते. त्याला वाटते आपणही आपले शरीर फुगवले तर आपण बैलापेक्षाही मोठे दिसू. पण, तसे होत नाही ना? उत्तर प्रदेश निवडणुका आहेत ना? तिथे भाजप म्हणजे योगी आदित्यनाथच जिंकणार! पण, आपल्या इकडचे प्रांतस्तरावरचे स्थानिक पक्ष पण तिकडे लढत आहेत. आम्ही गोव्यात निवडणुका लढवू, आम्ही उत्तर प्रदेशात निवडणुका लढवू म्हणत आहेत. निदान त्या गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचे म्हणणे एकदा तरी विचारात घ्यायचे ना? की यांचा गोव्यात सरपंच नसताना संजय राऊत गोव्यात येतात तरी कशाला? तो बेडकाच्या गोष्टी सांगतच राहिला. मला मात्र अजून कळाले नाही की, तो बेडकाची गोष्ट सांगता सांगता मधेच संजय राऊतांच्या गोष्टी का सांगत होता? तुम्हाला काही कळले का?
 
 
साधा खासदार राहू?
 
‘उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तन होणार,’ असे मी म्हणालो खरे गड्या. पण, तो हिंदी सिनेमातला सलमान खान म्हणतो ‘जो मैं बोलता हू, वो मैं करता हू!’ आता या येड्याला कुणी सांगावं की, ‘मैं जो बोलता हू वो, मीच काय कुणीच करत नाही,’ तर असा मी! हं मी पु.ल देशपांडेच्या पुस्तकातल्या ‘असामी’बद्दल बोलतोय. नाही तर लगेच त्या आसामच्या हिमंता बिस्वाचे पण लक्ष माझ्याकडे जायचे. मी कोण? मी पॉवरबाज! मला माझ्या साडेतीन जिल्ह्यांत काही गटांतील काही लोकांमधील काही लोक मला ‘जाणता राजा’ म्हणतात. जाऊ दे! काही खरे नाही. देशात एकता आणि सहिष्णूता टिकवायची असेल, तर सांप्रदायिक विचार वाढणे योग्य नाही. मी त्या योगींबद्दल बोलतोय.काय म्हणता, पक्षातल्या भोगी लोकांबद्दल बोलू? मुंडे, देशमुखबद्दल बोलू? नाही नाही, मी गांधीवादी आहे. गांधीजींच्या माकडाप्रमाणे मी कुणाबद्दल वाईट बोलत नाही. काय म्हणता, आमचे पुतणेसाहेब गाणी म्हणतात... वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा? असू दे, असू दे मी आधीच म्हणालो, “मला माझ्या साडेतीन जिल्ह्यांत काही गटांतील काही लोकांमधील काही लोक मला ‘जाणता राजा’ म्हणतात.” कळले? थोडे विषयांतर झाले. तर काय म्हणत होतो की, उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तन होणार! कसे म्हणजे, आम्ही तिथे सपाशी युती केली आहे. अहो, सापाशी नाही, सपाशी... समाजवादी पक्षाशी... आता तुम्ही ‘साप’ म्हणाला म्हणून सांगतो, आम्हाला वाघ, मांजर आणि कोल्हेबिल्हे असे सगळे प्राणी हाताळता येतात. कळले? ‘पंजा’ही आमच्या ‘काट्या’वरच चालतो. आता उत्तर प्रदेशमध्ये मी दौरा करणार आहे. आता काही पावसाचा ‘सिझन’ नाही. पण, उत्तर प्रदेशमध्ये पाऊस पडायला हवा. तिथेही पावसात भिजून भाषण करायचे म्हणतो. काय म्हणता, महाराष्ट्रातले लोक जसे फसले तसे तिथले लोक फसणार नाहीत? तिथे पगडी-फेट्याची गोष्ट शोधीन म्हणतो! काय म्हणता, उत्तर प्रदेशवाले भगव्या रंगाचा गमछा वापरतात आणि ‘ब्राह्मण विरूद्ध ठाकूर विरूद्ध यादव विरूद्ध पिछडी जाती’ लढवण्याचे ‘पॅटर्न’ आधीच सपा आणि बहन मायावतीने घेतले आहे? मग मी काय करू? साधा खासदारच राहू का?
 
९५९४९६९६३८
 
@@AUTHORINFO_V1@@