अस्तित्वाच्या लढाईचा अंत!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2022   
Total Views |

China


कोरोना या जगाला विळखा घातलेल्या महामारीचा जिथून उगम झाला, त्या चीनने ( China )  क्रूरतेबद्दल जणू काही उत्तर कोरियाशी स्पर्धाच लावली आहे. इतकेच काय उत्तर कोरियामध्ये जे जे काही होते, तिथल्या दहशतीची कल्पना अख्ख्या जगाला आहे.


मात्र, चीन सातत्याने आपल्या कुरापतींवर बुरखा टाकण्याचेच काम करतो. चीनमध्ये मानवाधिकारांची पायमल्ली होते, याबद्दल दुमत नाहीच. पण, ५५ वर्षीय झांग क्विंग यांच्या मृत्यूने ही बाब अधोरेखित झाली. क्विंग यांचा कॅन्सरने मृत्यू झाला. २००९ मध्येच चिनी सरकारच्या जाचाला कंटाळून त्यांनी खरंतर अमेरिकेत आश्रय घेतला होता. सोमवार, दि. १० जानेवारी रोजी त्यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या मृत्यूमुळे बातमीमूल्य वाढण्यासारखे काही नसते, जर त्यांच्या संघर्षाला चीन सरकारने वेळीच प्रतिसाद दिला असता.


त्यांच्या कुटुंबीयांशी झालेली ताटातूट त्यांना जगाच्या पटलावर एक ओळख मिळवून देणारी ठरली. त्यांचा पती मानवाधिकार कार्यकर्ता आणि वकील आहे. साहजिकच चिनी सरकारची पोलखोल फारशी देशात रुचली नाही. यांग माओडांग यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविला म्हणून वेगळ्याच एका भ्रष्टाचार प्रकरणात त्यांना गोवण्यात आले आणि तुरुंगात डांबून टाकले.

माओडांग यांनी कितीही सनदशीर मार्गाने तुरुंगातून सुटण्याचा प्रयत्न जरी केला तरीही त्यांना पुन्हा एकदा तुरुंगात टाकले जाई. या जाचाला कंटाळून त्यांची पत्नी २००९ मध्ये अमेरिकेत निघून गेली. २००९ ते २०२२ अशी तब्बल १३ वर्षे त्या महिलेने आपल्या पतीसोबत कायमचे राहता यावे, त्याची तुरुंगातून मुक्तता करुन एक नवे आयुष्य सुरू करता यावे, म्हणून चिनी सरकारपुढे वारंवार आर्जव केले.


१३ वर्षे जगातील एका बड्या सरकारविरोधात ही लढाई निश्चितच सोपी नव्हती आणि चीनमध्ये राहून ही गोष्ट शक्यही झाली नसती. अमेरिकेत राहून त्यांनी हा खटाटोप सुरू ठेवला होता. मात्र, हुकूमशाही आणि एकाधिकारशाही चिनी सरकारला त्याचा काडीमात्रही फरक पडला नाही. एक महिला आपल्या पतीच्या सान्निध्यात राहू इच्छित होती. अशातच तिला कर्करोगानेही गाठले होते.

दुर्धर आजाराशी आणि चिनी सरकारशी तिची लढाई सुरूच होती. पतीला मुक्तता मिळावी यासाठी तिने राष्ट्रपती शी जिनपिंग यांनाही विनंती केली होती. वारंवार पत्रव्यवहार करून दयेची भीकही मागितली. पण, उपयोग शून्यच! तिची मदत करण्याऐवजी पतीला वेगवेगळ्या भ्रष्टाचारांच्या आरोपाखाली तुरुंगात डांबण्यात आले. चीनमध्ये मानवाधिकारांसाठी काम करणार्‍यांची काय अवस्था होते, याचे उदाहरण जगापुढे आले. त्यासाठी माओडांग हे योग्य व्यक्ती होते. त्यांनी चिनी सरकारच्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदली होती.


त्यामुळे त्यांनाच एका गावात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपांवरुन तुरुंगात कोंडले गेले. एकटे माओडांगच नव्हे, तर चीनचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्या सर्वच विरोधकांना उखडून टाकण्याच्या विशेष मोहिमेवरच आहेत. म्हणूनच आजन्म राष्ट्राध्यक्षपदी कायम राहण्याची तरतूद जिनपिंग यांनी करुन घेतली आहे. त्याचसोबत अशा कारवायांतून ते वेळोवेळी आपली क्रूरताही दाखवून देतात. इतकेच काय तर जिनपिंग यांनी स्वपक्षातील नेत्यांनाही सोडले नाही तिथे विरोधकांची काय गय? त्यांच्याविरोधात ‘ब्र’ काढण्याचीही कुणी हिंमत करु नये, असा दबदबा चीनमध्ये आहे. ही क्रूरता कितपत असते तेही पाहू.



माओडांग यांनी आपल्या पत्नीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिही चिनी सरकारने धुडकावून लावली. त्यांची पत्नी काही दिवसांचीच सोबती आहे, हे कळल्यावर सरकारला तसे विनंतीपत्रही लिहिले. मात्र, चीनने ही मागणीही फेटाळून लावली. इतका मोठा देश एका मानवाधिकार कार्यकर्ता आणि वकिलाला का घाबरला होता? त्यांचा इतका जाच करण्याचे कारण काय?, तर माओडांग हे एक लेखकही आहेत.



आपल्या ‘गुओ फिस्कियोनग’ या टोपणनावाने ते लिहितात. दक्षिण चीनमध्ये असलेल्या एका गावात कम्युनिस्ट पक्षांच्या नेत्यांविरोधात स्थानिकांची त्यांनी मदत केली होती. गावकर्‍यांची जमीन इथल्या कम्युनिस्ट नेत्यांनी परस्पर विकून टाकली होती. या गावकर्‍यांचा आवाज बनल्याची आजन्म शिक्षा माओडांग यांना मिळाली. ते आजही चीनच्या कैदेत खितपत पडले आहेत. त्यांना कुठे डांबून ठेवले? त्यांची सुटका कधी होणार? त्यांना न्याय मिळणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज कुणीही देऊ शकत नाही. जगण्यासाठी आधार असलेल्या पत्नीची साथ १३ वर्षांच्या संघर्षांनंतर सुटली... उरला तो फक्त कारावास!









@@AUTHORINFO_V1@@