मुंबई : राज्यातील प्रत्येक दुकानांवर मराठी पाट्याच असाव्यात, असा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे. हे संपूर्ण श्रेय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि महाराष्ट्र सैनिकांनी केलेल्या आंदोलनाचे आहे, असे म्हणत कुणीही यातून राजकारण करण्याचा आचरटपणा करू नये, असे कडक शब्दांत सुनावले आहे. तसेच मराठी पाट्यांच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा आंदोलन करू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
"ह्या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये, परंतु २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणन महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. काल महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळानं दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला तेंव्हा त्याचं श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच.", असेही ते म्हणाले.
याबद्दल प्रतिक्रीया देत असताना त्यांनी राज्य सरकारचे या निर्णयाबद्दल अभिनंदनही केले. मात्र, कानउघडणीही केली आहे. आता कच खाऊ नका, ह्याची अंमलबजावणी नीट करा, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ते म्हणाले, "आणखी एक भानगड सरकारनं करून ठेवली आहे की मराठी भाषेशिवायही इतर भाषा नामफलकांवर चालतील म्हणून. ह्याची काय गरज आहे? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार आणि ह्याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका!"
दुकानांच्या पाट्या इतर भाषांमध्ये ठेवण्याच्या पळवाटा बंद!
दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ हा अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आले होते. अशा प्रकारच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या व त्यावर उपाययोजना करण्याची मागणीही होत होती.
मंत्रिमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तीचे विनयमन) अधिनियम, २०१७ यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या दुकानांप्रमाणेच छोट्या दुकानावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील. बहुसंख्य दुकाने व व्यापारी पेढ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात, हे लक्षात घेता यापुढे रस्त्यालगतच्या सर्वच दुकांनावरील पाट्या मराठीत लागलेल्या दिसतील.
मराठीत-देवनागरी लिपीतील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशीही दुरुस्ती मंजूर करण्यात आली. राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी यासाठी मंत्रालयात संबंधितांची बैठक घेतली व कायदा सुधारण्याचा निर्णय घेतला.