‘अफगाण वुमेन लाईव्हज मॅटर!’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2022   
Total Views |

Afghanistan
 
 
 
“इच्छेप्रमाणे कपडे परिधान करणे, शिक्षण घेणे आणि काम करणे हा आमचा अधिकार आहे. आमचा अधिकार मिळवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आमच्या विरोधातली हिंसा थांबवायलाच हवी. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आम्हाला सहभाग हवाच,” अशा आशयाच्या मागण्या दि. ११ जानेवारी रोजी अफगाणिस्तानातील भिंतीवर लिहिलेल्या दिसल्या. तसेच या मागण्यांना समर्पक अशी चित्रेही काढण्यात आली होती. तालिबानी सत्तेत नसते तर त्यांनी या मागण्या करणार्‍यांचा गळाच चिरला असता. पण, तालिबानी आता अफगाणिस्तानमध्ये सत्तेत आहेत. मात्र, जगातल्या बलाढ्य देशांनी तालिबान्यांच्या सत्तेला समर्थन केलेले नाही. त्यामुळे अफगाणिस्तानचा गाडा हाकताना तालिबान्यांच्या नाकीनऊ आले आहेत. या परिस्थितीमध्ये त्यांना ते किती समाजशील आणि मानवतावादी आहेत, न्यायी आहेत हे जगाला दाखवायचे आहे. त्यामुळे वरवर तरी तालिबानी सरकार तिथल्या जनतेच्या विरोधाला तितकासा क्रूर विरोध करत नाही. त्यामुळेच तालिबान्यांच्या क्रूर राजवटीतील अमानवी आणि असहिष्णू नियमांना विरोध करणार्‍या महिला आता या क्षणी जीवंत आहेत, असे दिसते. उद्या-परवा त्यांचे काय होईल, हे त्यांनाही माहिती नाही.
 
 
 
अफगाणिस्तानमधील बहुसंख्य महिलांनी जीवाच्या भीतीने तालिबान्यांच्या क्रूर नियमावलीपुढे मान तुकवली आहे. हे आव्हानसुद्धा तसे सौम्यच म्हणायला हवे. पण, तालिबान्यांच्या कठोर नियमांना विरोध करण्याचे साहस या काही महिलांनी केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, दिवसा आम्ही रस्त्यावर येऊन विरोध करू शकत नाही. पण, रात्री आमची दु:ख याच रस्त्यावर आणि रस्त्यावरच्या भिंतीवर वेदना बनून अक्षरात उमटतात. ही अक्षरेच आमची शस्त्र आहेत. यातून प्रगट होणार्‍या आमच्या भावना आणि विरोध हेच आमचे अस्त्र आहेत. या महिलांच्या मागण्या तरी अशा काय आहेत? तर बुरखा घालण्याची सक्ती नको, मनाप्रमाणे नोकरी-व्यवसाय करण्याची मुभा आणि शिक्षण घेता यावे याच मागण्या आहेत. पण, तालिबानी इस्लाम आणि इस्लामी शरियाचा हवाला देत, महिलांना या संधी हे हक्क नाकारत आहे. दूरच्या ठिकाणी महिलांना एकटीने प्रवास करण्यास बंदी घातली आहे. इतकेच नव्हे तर प्रवासात संगीत ऐकण्यासही बंदी घातली आहे. तशी तालिबान्यांची महिलांसाठी नियमावली खूप मोठी आहे आणि ती अतिशय मूर्खत्वाची, विकृत आणि क्रूर आहे. पण, तालिबान्यांना विरोध कोण करणार? त्यामुळे सगळेच चिडीचूप! प्रसारमाध्यमांचा पसारा तर अफगाणिस्तानातून कधीच आवरला गेला आहे.
 
 
 
तसेच आपल्या देशात जसे उठसूठ मोर्चे-आंदोलने होतात, तसे तिकडे होण्याची शक्यताच नाही. कारण, विना कारण तर सोडाच, कारणासाठीही अशी आंदोलन, मोर्चे केले तर आंदोलक आणि मोचेर्र्करी तालिबान्यांच्या राज्यात घरी जीवंत परततील की, नाही हाच एक प्रश्न. तर अशा या परिस्थितीमध्ये इथे महिलांनी हिंमत केली आहे. तालिबान्यांना प्रश्न विचारले आहेत, मागण्या केल्या आहेत. त्याचे परिणाम काय होतील, याची पर्वा या महिलांनी केली नाही. महिलांचे म्हणणे आहे की, ”हे आंदोलन थांबणार नाही. देशात घराघरात मुलीबाळी हे आंदोलन करतील. आम्ही हिंसा करणार नाही, पण आमचे मत मांडत राहणार.आमचे विचार व्यक्त करत राहणार!”
 
 
 
अफगाण स्त्रियांचा हा संघर्ष, हा लढा पाहिला की, आपल्या भारतातील शाहीनबागेत बसलेल्या ‘सीएए’ कायद्याला विरोध करणार्‍या त्या भगिनी आठवल्या. कृषी कायदे मागे घेतल्यानंतरही लोकांना आणि सरकारला वेठीस धरणारे ते तथाकथित शेतकरी आंदोलन आठवले. इतकेच नव्हे, तर जिथे कुठे अन्याय होईल, तिथे एल्गार करू असे म्हणत डफली बडवत आझादी मागणारे आठवले. तसेच म्यानमारच्या रोहिंग्या मुस्लिमांसाठी मुंबईत ‘अमर जवान ज्योती स्मृतिस्तंभा’ला लाथ मारून दंगल-धिंगाणा करणार्‍या लोकांना अफगाणिस्तानातील आपल्या धर्मभगिनींची दया येत नाही का? केवळ ‘मुस्लीम ब्रदरहूड’च असतो का? ‘मुस्लीम सिस्टरहूड’ नाही का? जगभरात अगदी जिथे सगळेच समान रंगाचे आहेत, अशा देशातही ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’चे लोण पसरवणारे आठवले. या सगळ्यांनी या अफगाण महिलांच्या जगण्यासाठी, त्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी काही केलेले आठवत नाही. ‘अफगाण वुमेन लाईव्हज मॅटर’ हा अजेंडा कुणीही चालवत नाही. का? त्या माणूस नाहीत का?
 
९५९४९६९६३८
 
 
@@AUTHORINFO_V1@@