नवी दिल्ली : अभिनेता जावेद अख्तर हे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतानाच्या ट्विटचे साम्य हे चक्क पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्याशी आढळले आहे. दोघांनीही पंतप्रधान मोदींवर टीका करताना एकाच स्वर ओढल्याचे दिसून आले. दोघांनीही धर्म संसदेचा मुद्दा उपस्थित केला असून त्यांच्या ट्विटमध्ये अनेक साम्य आहेत. आधी इम्रान खान यांनी ट्विट केले आणि मग जावेद अख्तर यांनी.
पाकिस्तान पंतप्रधान इमरान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना ट्विटमध्ये म्हंटले की, "मोदी सरकारच्या विचारसरणीत हिंदुत्ववादी गटांकडून भारतातील सर्व धार्मिक अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात आहे. अल्पसंख्याकांची विशेषत: भारतातील २०० दशलक्ष मुस्लिम समुदायाची हत्या करण्यासाठी डिसेंबरमध्ये अतिरेकी हिंदुत्व अधिवेशनाच्या आवाहनावर मोदी सरकारचे मौन. भाजप सरकार या आवाहनाला समर्थन देते का? असा प्रश्न उपस्थित होतो. आंतरराष्ट्रीय समुदायाने याकडे लक्ष देऊन कारवाई करावी."
तर याच्याशीच साधर्म्य साधणारे ट्विट अभिनेता जावेद अख्तरने केले. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आणि अनेकांकडून स्वत:वर असलेल्या अस्पष्ट आणि काल्पनिक धोक्याबद्दल चर्चा केली. एलएमजी (लाइट मशीन गन)ने सुसज्ज अंगरक्षकांनी घेरलेल्या बुलेटप्रूफ वाहनात ते बसले होते. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० कोटी भारतीयांच्या नरसंहाराच्या धमकीवर एक शब्दही काढला नाही. मोदीजी का?" असे म्हंटले आहे. यावर भाजप प्रवक्ते गौरव गोयल यांनी टीका करत म्हंटले की, "तुम्ही फक्त क्रम बघा. इम्रान खान आणि जावेद अख्तर या दोघांचा एकच स्वर आहे."