‘स्वदेशी जागरण मंचा’ची ३० वर्षे

    12-Jan-2022
Total Views |

swadeshi jagrna manch.jpg

‘स्वदेशी जागरण मंचा’ने आपल्या कार्याची ३० वर्षे पूर्ण केली आहेत. दि. २२ नोव्हेंबर, १९९१ या दिवशी मंचाची स्थापना झाली व स्वामी विवेकानंदांच्या जन्म दिवशी (दि. १२ जानेवारी, १९९२) जागरण मंचाने आपल्या स्वदेशी आंदोलनाला सुरुवात केली. कुठल्याही संस्थेच्या जीवनात ३० वर्षे तसा मोठा काळ असतो. त्यानिमित्ताने संस्थेच्या उद्दिष्टांचा, कार्याचा घेतलेला शब्दबद्ध मागोवा...

देशी जागरण मंचा’ने स्वदेशीचा नारा देऊन भारतीय अर्थनीतीच्या पुनर्रचनेची मागणी करणे तसे मोठ्या धैर्याचे काम होते. विशेषत: जेव्हा स्वातंत्र्यानंतर भारतीय नेतृत्वाने पूर्णपणे पाश्चात्य विचाराच्या आधाराने निर्माण झालेल्या सर्व आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक वा राजकीय व्यवस्था स्वीकारल्या होत्या आणि त्याप्रमाणे भारतीय धोरणे आखली होती. ‘स्वदेशी जागरण मंचा’ने हे शिवधनुष्य पेलले. स्वदेशीचा नारा देत भारतीय नीतिच्या पुनर्रचनेची मागणी केली. १९९०च्या दशकात काही धोरणे बदलली हे खरे असले तरी धोरणांचा पाश्चात्य विचार-आधार कायम होता. गेल्या काही वर्षांपासून मंचाचा समविचारी भाजपसारखा पक्ष केंद्रात सत्तेत आहे. त्यामुळे काही धोरणांमध्ये आमूलाग्र बदलही झाला असला तरी अजून काही धोरणांचा वैचारिक आधार बदलण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ३० वर्षांच्या कार्यकाळानंतरही ‘स्वदेशी जागरण मंचा’च्या कामाची प्रामुख्याने गरज आहे, असे म्हणावे लागते.


‘स्वदेशी जागरण मंचा’ची स्थापना

‘स्वदेशी’ ही काही नवीन कल्पना नाही. स्वातंत्र्य आंदोलनात स्वदेशीने महत्त्वाची भूमिका निभावली होती. पण, त्यावेळी इंग्रजांची सत्ता होती व इंग्रज भारताची लूट करत होते. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देश कंगाल होता व देशाला आपल्या पायावर उभे करण्याची गरज होती. सर्व भारतीय उद्योग दुबळे झाले होते. अशा वेळी तेव्हाच्या भारतीय नेतृत्वाने साम्यवादी रशियन मॉडेलनेप्रभावित होऊन सरकारच्या पुढाकाराने, हस्तक्षेपाने सर्व क्षेत्रांत काम करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे धोरणे व योजना आखल्या. हे मॉडेल ३०-४० वर्षे अपयशी ठरतच चालले. सरकारला १९९०च्या दशकात सरकारी पुढाकाराचे धोरण सोडावे लागले. खासगी क्षेत्रांकडे लक्ष देण्याची वेळ आली. हा काळ खासगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाचा काळ म्हणून म्हणविला जातो. त्याचाच प्रभाव वा दबाव म्हणा, भारताने विदेशी भांडवल व विदेशी व्यापार वगैरेसाठी देशाच्या वाटा मोकळ्या करण्यास सुरुवात केली. त्यामुळे स्वदेशीची गरज भासू लागली. त्यातूनच ‘स्वदेशी जागरण मंचा’ची स्थापना झाली. याच काळात जागतिक स्तरावर साम्यवादी विचारावर आधारित व्यवस्था कोलमडत असताना भांडवलशाही व्यवस्थाही सर्व प्रश्न सोडवण्यास अपुरी असल्याची जाणीव झाली होती. या दोन्ही व्यवस्थेला पर्याय शोधला जात होता. ‘स्वदेशी जागरण मंचा’च्या स्थापनेमागेही मुख्य उद्देश ‘भांडवलशाही’ व ‘साम्यवाद’ या दोन्ही व्यवस्थांना एक तिसरा समन्वयात्मक व संतुलित पर्याय देण्याचा होता, जो ‘भारतीय दर्शना’वर आधारित ‘एकात्म मानववादा’तून निघत होता. ‘स्वदेशीचा स्वीकार’ व ‘राष्ट्रहित’ हे या पर्यायी व्यवस्थेचे व्यावहारिक धोरण सूत्र होते.


‘स्वदेशी’ कल्पनेचा विस्तार

स्वातंत्र्यापूर्वी स्वदेशीचा विचार केवळ विदेशी वस्तूचा त्याग इथपर्यंत मर्यादित होता. राजकीय स्वातंत्र्याची कल्पनासुद्धा बराच काळ साम्राज्यांतर्गत स्वराज्य अशीच होती. स्वातंत्र्यानंतर खादी उद्योगाला जीवंत ठेवणे व शासनाला लागणार्‍या वस्तूंची खरेदी शक्यतो देशी उद्योगाकडून करणे इथपर्यंत स्वदेशी मर्यादित होती. स्वावलंबनाच्या बाताही झाल्या, नाही असे नाही. पण, त्या अन्नधान्यांच्याबाबतच्या गरजेतून होत्या. तसेच, परदेशी चलन वाचवण्यासाठी म्हणून होत्या. आयातीला पर्याय शोधण्याचा तो एक प्रयत्न होता. त्यामुळे स्वदेशीला व्यापक अर्थ देऊन तिला देशहिताशी जोडणे व स्वदेशी कल्पनेला धोरणात्मक रूप येण्याइतपत सैद्धांतिक करणे आवश्यक होते. मंचाला लाभलेले युगप्रवर्तक दतोपंत ठेंगडींच्या नेतृत्वाने हे काम कुशलतेने केले. दत्तोपंतांनी स्वदेशीला केवळ विदेशी वस्तूशी निगडित न ठेवता, एक चैतन्याचा आविष्कार मानले. जनजागृतीत त्याची उपयुक्तता सांगितली आणि स्वदेशी हे आत्मनिर्भरतेचे साधन असल्याची भूमिका मांडताना स्वदेशीला देशहिताशी जोडले. म्हणूनच त्यांच्या दृष्टीने ‘स्वदेशी जागरण मंच’ एक वैचारिक आंदोलन होते व देशहितासाठी स्वदेशी सर्व नीति-धोरणांचा आधार होती. आज ‘स्वदेशी जागरण मंच’ एक यशस्वी वैचारिक चळवळ उभी करू शकले आहे व स्वदेशीला भारतीय नीति-धोरणांचा आधार देऊ पाहात आहे, हे महत्त्वाचे आहे.

स्वदेशी चळवळ व स्वदेशी विचार

‘स्वदेशी जागरण मंचा’ची चळवळ मुख्यत: जन जागृतीसाठी असते असे म्हणणे जास्त संयुक्तिक होईल. १९९०च्या दशकात भारतीय नेतृत्वाने काही धोरणात्मक बदल स्वीकारले. त्यामुळे विदेशी भांडवल व विदेशी व्यापाराला महत्त्व प्राप्त झाले. त्यातून भारतीय उद्योग विदेशी कंपन्यांच्या ताब्यात जाण्याचा धोका वाढला. विदेशी व्यापार खुला झाल्याने विदेशी वस्तूंची बाजारपेठ स्वदेशी वस्तूवर भारी पडण्याची शक्यता निर्माण झाली. म्हणून या धोरणात्मक बदलाला विरोध करण्यासाठी मंचाने स्वदेशी चळवळ सुरू केली. वैचारिक दृष्ट्या ‘स्वदेशी जागरण मंच’ ‘स्वदेशी व राष्ट्र हित’ या दोन मुख्य दृष्टिकोनातून आपली भूमिका ठरवते असे म्हणता येईल. त्यामुळे विदेशी विचार-प्रभाव, विदेशी भांडवल, विदेशी हस्तक्षेप व विदेशी भागीदारी वगैरे मग कुठल्याही क्षेत्रात असो कमी करणे व स्वदेशीचा सर्वच क्षेत्रात स्वीकार करून स्वदेशी साधन संपत्तीचा विकास आणि उपयोग करत ‘अंत्योदय’ व सर्वच क्षेत्रात आत्मनिर्भरता साधने हे स्वदेशी मंचाची चळवळ व भूमिकेमागील मुख्य विचार सूत्र असते.

‘स्वदेशी जागरण मंचा’ची भूमिका

‘स्वदेशी जागरण मंच’ भारतीय सरकारच्या बहुतेक धोरणावर आपली प्रतिक्रिया देत असतो. त्यात बहुत करून व्यापार-उद्योग व महत्त्वाची आर्थिक धोरणे विशेष असतात. चीनबरोबरच्या व्यापाराबाबत तर मंच आग्रही भूमिका घेत आला आहेच. शिवाय सर्वच आंतरराष्ट्रीय व्यापार कराराबद्दल भारताने स्वहितार्थ सावध भूमिका घेतली पाहिजे, असे मंचाचे म्हणणे असते. ‘जीएम’ तंत्रज्ञानाचाही मंचाने सातत्याने विरोध केला आहे. किरकोळ बाजारात कुणा एकाची एकाधिकारशाही असू नये, म्हणून मंच संघर्ष करतच असतो. ‘अ‍ॅमेझोन’सारख्या कंपन्याच्या स्वार्थी व्यवहाराला चव्हाट्यावर आणण्याचे कामही मंचाने केले असल्याचे दिसते. विदेशी भांडवल व विदेशी कंपन्यांचा भारतात होत असलेल्या शिरकावाला मंच आक्रमण मानत असल्याने त्यांच्या विरोधात सतत भूमिका घेत असतो. एकंदरीतच मंच राष्ट्रवादी विचाराचा आहे व ‘स्वदेशी’तच राष्ट्रीय हित सामावले आहे, असे मानतो व त्याच विचारांचा प्रसार करण्यावर भर देतो, असे म्हणता येते. कुठल्याही संस्था आपल्या उद्देशाबाबत पूर्णपणे यशस्वी झाल्या आहेत, असे म्हणता येत नसले तरी ‘स्वदेशी जागरण मंचा’ने घेतलेल्या भूमिका आणि केलेल्या चळवळीचा परिणाम आज दिसतो आहे, असे म्हणता येते. विदेशी भांडवल व विदेशी कंपन्यांना भारतात सर्वच क्षेत्रांत सहज प्रवेश मिळाला नाही व या मंचाच्या भूमिकेचा परिणाम म्हणता येईल. चिनी वस्तूंच्या मागणीवर होत असलेला परिणाम स्वदेशी चळवळीमुळे आहे हे तर स्पष्ट आहे. ‘जीएम’तंत्रज्ञान भारतात आपला जम बसवू शकले नाही याला मंचाचा विरोध कारणीभूत असल्याचे दिसते आहे. सध्याच्या भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भरते’च्या धोरणाचा पाया मंचाच्या विचारात आहे, हे ही लपलेले नाही. तेव्हा ‘स्वदेशी जागरण मंच’ उपयोगी ठरला आहे, असेच म्हणावे लागेल.

आव्हाने अजून कमी झाली नाहीत!

३० वर्षांनंतरही ‘स्वदेशी जागरण मंचा’समोरील आव्हाने कमी झाली आहेत, असे म्हणता येत नाही. आज समविचारी भाजप पक्ष जरी सत्तेवर असला तरी नीति-धोरणांचा आधार ‘स्वदेशी’ होण्यासाठी खूप प्रयत्न होणे गरजेचे आहे. जागतिक अर्थकारणाचा पाठपुरावा करताना कुठल्याही देशाच्या सरकारला विदेशी चिंतन व विदेशी सल्ला विचारात घ्यावा लागतो. त्यातच आपल्याकडे ‘मेक इन इंडिया’ व ‘स्टार्ट-अप’ योजनांत स्वदेशीचे प्रमाण वाढायला हवे. विदेशी भांडवल व विदेशी व्यापार देशात मोकळेपणाने स्वीकारला जात आहे. सर्वच क्षेत्राचे खासगीकरण व सर्वच सरकारी संपत्तीचे मुद्रीकरण करण्याचे धोरण काही प्रमाणातच देशहिताचे आहे असे म्हणावे लागेल. त्यामुळे ‘स्वदेशी जागरण मंचा’ला सर्वच सरकारी धोरणांचा स्वदेशीच्या दृष्टिकोनातून अभ्यास करावा लागेल. गरज असेल तेथे सर्वच स्तरावर स्वदेशीची व्याख्या समजावून सांगावी लागेल. हे खरे आहे की, मंचाजवळ दत्तोपंतांसारखे नेतृत्व नाही. पण, मंच आता भारताच्या ४५० जिल्ह्यात पोहोचला आहे व ही मंचासाठी अभिमानाची बाब आहे. बरेच भारतीय मंचाशी प्रत्यक्ष जोडलेले नसले तरी विचारांशी जोडलेले आहेत व ही एक मंचाची शक्तीच आहे. सामान्य-जन ही स्वदेशीचे महत्त्व समजू लागला आहे, ही ‘जागरण मंचा’ची ३० वर्षांतील एक मोठी उपलब्धी आहे. आता गरज आहे ती मंचाची नीति-धोरणे बनवण्यात सहभाग वाढवण्याची व स्वदेशीला नीति-धोरणाचा आधार बनवण्याची! येत्या काळात ‘स्वदेशी जागरण मंचा’समोर हेच एक मोठे आव्हान राहील.


- अनिल जवळेकर