माणसाला लावलं डुकराचं हृदय! : अमेरिकेत ऐतिहासिक शस्त्रक्रिया

    11-Jan-2022
Total Views |

Heart-Transplant
 
वॉशिंग्टन डी.सी. : अमेरिकन डॉक्टरांनी गेल्या शुक्रवारी एक ऐतिहासिक शस्त्रक्रिया पार पाडली. ५७ वर्षीय पुरुषाच्या शरीरात जेनेटिकली मॉडिफाईड डुकराचे हृदय प्रत्यारोपित करण्यात आले. मेरीलँड मेडिकल युनिव्हर्सिटीच्या डॉक्टरांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. ७ तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती सुधारत आहे. मात्र, ही कारवाई पूर्णपणे यशस्वी झाली की नाही याबाबत काहीही सांगणे घाई करण्यासारखे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मेरीलँड येथील रहिवासी डेव्हिड बेनेट यांना अनेक दिवसांपासून हृदयविकाराचा सामना करावा लागत होता. समस्या वाढत गेल्याने शेवटचा पर्याय म्हणून डुकराचे हृदय प्रत्यारोपण करण्याची योजना आखण्यात आली.
 
 
'डुकराच्या हृदयाचा वापर अनेक दशकांपासून मानवांसाठी यशस्वीपणे केला जात आहे. या शस्त्रक्रियेनंतर आम्हाला दररोज नवीन माहिती मिळत असून आम्ही खूप आनंदी आहोत. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यास विज्ञानाच्या क्षेत्रात हा एक मोठा चमत्कार ठरेल. प्राण्यांच्या अवयवांचे मानवी शरीरात प्रत्यारोपण करण्याच्या शोधातले हे एक मोठे पाऊल ठरणार आहे. डेव्हिड बेनेट सध्या हार्ट-लंग बायपास मशीनवर असल्याने पुढील काही आठवडे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.' असे शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ.बार्टले ग्रिफिथ यांनी सांगितले.
 
 
 
डुकराचंच हृदय का?
डुकराचे हृदय मानवी शरीरात प्रत्यारोपणासाठी योग्य असल्याचे अवयव प्रत्यारोपण अहवालातून सूचित झाले. परंतु डुक्कर पेशींमध्ये अल्फा-गॅल शूगर ही पेशी असते. मानवी शरीरासाठी ही पेशी घातक असते. याने रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी प्रथम डुकरात अनुवांशिक बदल केले जाते. जगभरातील अनेक बायोटेक कंपन्या मानवी शरीरातील प्रत्यारोपणासाठी डुकराचे अवयव विकसित करत आहेत.