खारेगाव ठाण्याचे वैद्यकीय सेवादूत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2022   
Total Views |

MANSA 2
तळागाळातील व्यक्तींना किमान आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्यात शिक्षणाप्रती जागृती वाढावी यासाठी कार्य करणारे डॉ. शैलेंद्र शुक्ला. त्यांच्या सेवाकार्याचा घेतलेला मागोवा...


त्याची पत्नी आणि वडील कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आले. तो त्यांना घेऊन डॉ. शैलेंद्रच्या दवाखान्यात गेला. २०२१ सालची सुरुवातहोती ती. कोरोनाचा उद्रेक त्यावेळी वाढला होता. डॉ. शैलेंद्र यांनी त्यांच्यावर औषधोपचार केला. सूचना आणि नियमावली दिली. ते दोघेही बरे झाले. शैलेंद्र यांच्या लक्षात आले होते की, या दोघांना ज्याने दवाखान्यात आणले, तोही आजारीच वाटत होता. डॉ. शैलेंद्र यांनी त्या व्यक्तीलाही त्याची कोविड चाचणी करून घ्यायला सांगितले. पण, त्यानंतर तो तरूण काही आला नाही. काही दिवसांनी त्या तरूणाची पत्नी त्याला दवाखान्यात घेऊन आली. त्या रूग्णाचा ‘कोरोना स्कोअर’ २५ पैकी २० होता. ठाण्यातल्या कळवा-खारेगावमध्ये त्यावेळी रूग्णालयात रूग्णांना जागा मिळणे कठीण होते. अवघा ३२ वर्षांचा तो युवक... वेळेत उपचार मिळाले नसते, तर काहीही अघटित होऊ शकत होते. त्या इमारतीत त्याच दिवशी कोरोनाने मृत्यूही झाला होता. शैलेंद्र यांनी ठरवले की, आपण या वैद्यकीय पेशात आहोत. आपण देव नाही, पण रूग्ण आपल्याला देवाचा दर्जा देतात. त्यांचा विश्वास मोडू द्यायचा नाही. त्यामुळे स्वत:चे क्लिनीक सुरू ठेवून शैलेंद्र यांनी सगळ्यांशी संपर्क साधला. शेवटी एका महिन्याच्या उपचारानंतर अगदी ‘प्लाझ्मा दान’ मिळाल्यानंतर हा तरूण घरी आला. शैलेंद्र म्हणतात, “माझ्या आयुष्यातला हा क्षण सर्वार्थाने श्रीमंत आणि अमूल्य आहे.”


 
अर्थात, कोरोना काळात जीवाची बाजी लावून सेवाकार्य करणारे अनेक डॉक्टर्स आहेत. या सगळ्यांच्या सेवाकार्याचे प्रतिनिधित्व करतात डॉ. शैलेंद्र शुक्ला. शैलेंद्र मूळचे अलाहाबादचे. पण, ठाण्याच्या खारेगाव या पारंपरिक आग्री समाजाच्या गावाशी त्यांचे भावबंद जुळलेले. त्यामुळेच २०२० साली कोरोनाचा कहर सुरू झाल्यावर बहुतेक जणांनी आपले दवाखाने आणि इतरही उद्योगधंदे बंद केलेले. पण, डॉ. शैलेंद्र शुक्ला यांनी आपला दवाखाना सुरू ठेवलेला. परिसरातील लोकांमध्ये कोरोनामुळे उडालेला हाहाकार त्यांना अस्वस्थ करून गेला. त्यांनी ठरवलेे की, आपण दवाखाना बंद करायचा नाही. तसेच कोरोना काळात वैद्यकीय सेवेत कार्यरत असणार्‍या अनेक स्वयंसेवी संस्थांशी त्यांनी संपर्क केला. या संस्थांच्या मदतीने परिसरातील गरजू रूग्णांवर कोरोना संदर्भात उपचार करणे सुलभ झाले.याच काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना योद्ध्यांसाठी जनतेला थाळी वाजवण्याचे आवाहन केले. त्यावेळी खारेगावातील लोक डॉ. शैलेंद्र यांना सांगू लागली की,‘पंतप्रधानांनी कोरोना योद्धांसाठी थाळी वाजवायला सांगितली, आम्ही तुमच्यासाठी थाळी वाजवणार.’ डॉ.शैलेश म्हणतात,“गावकर्‍यांचे हे म्हणणे माझ्यासाठी प्रेरणादायी होते. मी वेगळे असे त्यांच्यासाठी काही केले नव्हते. केवळ माझ्या वैद्यकीय पेशाशी प्रामाणिक राहिलो होतो.”
 
 
या वैद्यकीय सेवेसोबतच डॉ. शैलेंद्र यांनी सहयोगी डॉक्टरांना सोबत घेऊन ‘आधार फाऊंडेशन’ स्थापन केले. या संस्थेद्वारे त्यांनी समविचारी डॉक्टरांचे एकत्रिकरण केले. डॉक्टरांची ही टिम वनवासी पाडे तसेच ठाणे आणि मुंबईतील सेवा वस्तीमध्ये विनाशुल्क आरोग्य शिबीर आयोजित करते. ठाणे आणि मुंबईमध्ये द्रुतगती मार्गावर सिग्नल आहेत. या सिग्नलवर काही कुटुंब अतिशय दयनीय अवस्थेत जगतात. डॉक्टर शैलेंद्र सहकारी डॉक्टरांच्या मदतीने या कुटुंबासाठी सेवाभावी उपक्रम राबवितात. आरोग्यसेवा आणि त्यायोगे समाजसेवा करावी, हेच डॉ. शैलेंद्र यांचे ध्येय. असा हा सुसंस्कृततेचा वारसा त्यांना त्यांच्या आईबाबांकडूनच मिळाला.



डॉ. शैलेंद्र मूळचे अलाहाबादचे. त्यांचे वडील सुरेशचंद्र हे शिक्षक, तर आई प्रभावतीदेवी या गृहिणी. सुरेशचंद्र हे समाजशील. घरात येणार्‍या सगळ्यांशीच मुलांनी नम्रतेने वागले पाहिजे, हा त्यांचा दंडक. त्यामुळे घरात किंवा गावात साफसफाई करणार्‍या व्यक्तीलाही प्रणाम करणे, अंगणात कुणीही आले आणि ती वेळ चहाची किंवा जेवणाची असेल, तर उपाशीपोटी त्या व्यक्तीला पाठवायचेच नाही, हा शुक्ला दाम्पत्याचा शिरस्ता. हे सगळे संस्कार शैलेंद्र यांच्यावर होत गेले. पुढे कामानिमित्त सुरेशचंद्र यांना अलाहाबादला एकटे राहावे लागले. पत्नी आणि मुले गावी अशोकनगरातच राहिली. मात्र, शिकण्यासाठी शैलेंद्र अलाहाबादला वडिलांसोबत राहू लागले. इयत्ता पाचवीत असल्यापासूनचतो वडिलांसोबत घर आवरणे, जेवण तयार करणे वगैरे शिकू लागला. शैलेंद्र यांनी लहानपणीच मनोमन डॉक्टर व्हायचे असे निश्चितही केले होते. यथावकाश त्यांनी ‘बीएएमएस’साठीप्रवेशही घेतला. ते वैद्यकीय महाविद्यालय होते महाराष्ट्रातील संगमनेरमध्ये.


 
‘बीएएमएस’ आयुर्वेदिक विषयाचे शिक्षण घेताना सुरुवातीला शैलेंद्र यांची पुरती दमछाक झाली. मराठी भाषा आणि स्थानिक भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेणे त्यांना थोडे कठीणच गेले. पहिल्या वर्षी परीक्षेत त्यांना अपयश आले. शिक्षण सोडून पुन्हा घरी जावे, असे त्यांना वाटू लागले. पण, त्यांचे वडील, मित्र आणि महाविद्यालयातील गुरूजनांनी त्यांना समाजावले की, अपयशाने सगळे संपत नसते. जगात काहीही कठीण नसते. पुन्हा प्रयत्न कर. या काळात स्वामी विवेकांनदांच्या विचारांमुळेही त्यांच्या निराश झालेल्या मनाला उभारी मिळाली. त्यामुळे त्यांनी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली. आपण जे शिकतो, त्याचे प्रात्यक्षिक अनुभवता यावे म्हणून दिवसा शिक्षण आणि रात्री संगमनेरमधीलच एका रुग्णालयात ते नोकरी करू लागले. या अनुभवाचा त्यांना पुढे फार फायदा झाला. पुढे त्यांनी ठाण्यामध्ये खारेगाव येथे दवाखानाही सुरू केला. आज कित्येक वर्षं तिथे ते आरोग्यसेवा करत आहेत. या परिसरात नशामुक्ती, शिक्षणासंदर्भात जागृती असे अनेक उपक्रम ते राबवितात. भविष्यातही तळागाळातील लोकांसाठी आरोग्यसेवा राविणे, त्यांच्यात शैक्षणिक जागृती निर्माण करणे, त्यांचे राहणीमान किमान उंचावणे यासाठी काम करायचे आहे, असे डॉ. शैलेंद्र यांचे म्हणणे आहे. डॉ. शैलेंद्र शुक्ला यांचा हा सेवा प्रवास समाजासाठी नक्कीच मार्गदर्शक आहे.






 
@@AUTHORINFO_V1@@