क्रिकेटचा नवा ‘कोहिनूर’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2022   
Total Views |
harnoor
 
 
 
१९ वर्षांखालील आशियाई क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा करणार्‍या हरनूर सिंग याच्या जीवनप्रवासावर टाकलेला हा कटाक्ष...
 
 
 
सध्या भारतीय क्रिकेटला जागतिक क्रिकेट विश्वात एक अढळ स्थान प्राप्त झालेले दिसते. त्यातच जगभरातील अनेक क्रिकेट शिकणारे तरुण विद्यमान खेळाडूंचा, त्यांच्या खेळांचा आदर्श घेतात. १३० कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या भारतात क्रिकेट हा एक सोहळा म्हणून साजरा केला जातो. यामागे अनेक खेळाडूंचे योगदानही आहेच. देशातील युवा पिढीही तेवढीच दमदार होत असून, अनेक युवा खेळाडूंनी भारतीय संघाचा दावेदार होण्याची दावेदारी दाखवली आहे. अगदी पूर्वीच्या काळात सी. के. नायडू, लाल अमरनाथ, विजय हजारे, विनू मंकड, सुनील गावस्कर, कपिल देव यांनी अनेक दशके परिश्रम करत भारतीय संघाचे क्रिकेट वर्तुळात नाव केले, तर गांगुली, द्रविड, सेहवाग तसेच क्रिकेटचा देव मानल्या जाणार्‍या सचिन तेंडुलकरने भारतीय संघ हा क्रिकेटमधील सर्वोच्च संघ असल्याचे सिद्ध केले. यामुळेच कदाचित शहरापासून ते गावाखेड्यात क्रिकेटचे लोण पसरले आणि अनेक तरुणांनी लहानपणापासूनच क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. काहींनी तर या खेळाशी निगडित कुठलीही पार्श्वभूमी नसतानाही अथक परिश्रमाने आपले नाव कमावले, तर काहींच्या पिढ्यान्पिढ्या या खेळासाठी अर्पण केल्या आहेत. यातीलच एक नाव म्हणजे हरनूर सिंग, ज्याचा सध्या सध्या सुरु असलेल्या १९ वर्षांखालील आशियाई क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करत आशियाई चषक जिंकून देण्यात मोठा वाटा होता. अशा या क्रिकेटचा वारसा लाभलेल्या हरनूर सिंगच्या जीवनप्रवासाचा घेतलेला हा आढावा...
 
 
 
 
हरनूर सिंगचा जन्म पंजाबमधील जालंधरमध्ये दि. ३० जानेवारी, २००३ रोजी झाला. काहींना क्रिकेटचे धडे हे अकादमीत किंवा काहींना आपल्या आजुबाजूच्या परिसरात मिळतात. मात्र, हरनूर सिंगला क्रिकेटचे धडे हे आईच्या गर्भातच मिळाले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण, तो ज्या कुटुंबात जन्माला आला, त्या कुटुंबातील अनेक सदस्य हे क्रिकेट खेळाडू होते. या कुटुंबात आजोबा-नातू ते काका-पुतण्यांपर्यंत सर्वांनी रणजी स्पर्धांसह अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. अशा परिस्थितीत हरनूर सिंग हा एक चांगला क्रिकेटपटू ठरेल, यात शंकाच नाही. मात्र, असे असले तरीही त्याला साहजिकच खूप मेहनत घ्यावी लागली. मुलगा जन्माला येताच तो डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावा, अशी घरच्यांची इच्छा असते. मात्र, या कुटुंबाची हरनूरबद्दल स्वप्ने काही वेगळीच होती. हरनूरचे आजोबा राजिंदर सिंग हे ‘पंजाब क्रिकेट असोसिएशन’चे संयुक्त सचिव, क्रिकेट निवड समितीचे सदस्यही आणि पंजाब क्रिकेटचे प्रशिक्षकदेखील राहिले आहेत. वयाच्या आठव्या वर्षापासून हरनूरने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. यावेळी एका प्रशिक्षकाच्या भूमिकेत त्याचे आजोबा त्याला घरीच क्रिकेटच्या ‘ड्रील्स’ आणि इतर मूलभूत गोष्टी शिकवत होते. हरनूरचे वडील हे रणजी खेळाडू राहिले आहेत, तर त्याचे काका हरमिंदर सिंग पन्नू ‘बीसीसीआय’मध्ये ‘लेव्हल-दोन’चे प्रशिक्षक आहेत. हरनूरने वयाच्या दहाव्या वर्षी ‘चंदिगढ क्लब’कडून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने स्वबळावर स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत हे स्थान पटकावले. क्लबमधून खेळताना त्याने अनेक स्पर्धांमध्ये आपल्या विशिष्ट शैलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
 
 
 
 
चंदिगढच्या गोस्वामी गणेश दत्त सनातन धर्म महाविद्यालयात पहिल्या वर्षीच शिकणार्‍या हरनूर सिंगने पुढे होणार्‍या स्पर्धांमध्ये लक्षवेधी कामगिरी करत १९ वर्षांखालील संघाचे तिकीट मिळवले. त्याने यावेळी ‘विनू मांकड चषक’मध्ये एका शतकासह १९३ धावा केल्या. तसेच पुढे त्याने ‘युटीसीए डोमेस्टिक, चंडिगढ’ स्पर्धेत ‘सुखना झोन’चे नेतृत्व करत असताना धमाकेदार फलंदाजी केली. त्याने संपूर्ण स्पर्धेत ४१९ धावा करून निवड समितीचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले. यानंतर त्याला भारताकडून १९ वर्षांखालील संघात देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आली. या स्पर्धेतत्याने कमाल कामगिरी करत पाच सामन्यांमध्ये १७५च्या ‘स्ट्राईक रेट’ने २५१ धावा केल्या. ‘युएई’ विरुद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यात त्याने सलामीला येत १२० धावांची धमाकेदार खेळी केली. यानंतर पाकिस्तान विरुद्ध झालेल्या दुसर्‍या सामन्यात सुरुवातीची फळी पटापट बाद होत असताना देखील ४६ धावांची एक संयमी खेळी केली, तर अफगाणिस्तान विरुद्ध ६५ धावांचे योगदान देत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या स्पर्धेतील त्याच्या खेळीमुळे आता तो चांगलाच प्रकाशझोतात आला आहे. आशियाई चषक भारताच्या नावावर करण्यात त्याचाही खारीचा वाटा आहे. त्यामुळे भविष्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना हरनूर सिंग दिसू शकतो, असे भाकीत अनेकांनी वर्तविले आहे. येत्या काळात हरनूर सिंगची कामगिरी उत्तम होवो, यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा...
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@