मंदिरं शरणं गच्छामि...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2022   
Total Views |

temple.jpg
आपल्या भारतीय संस्कृतीची, संपन्न वारशाच्या सुवर्ण साक्षीदारांपैकी एक म्हणजे आपली मंदिरे. भारताच्या प्रत्येक राज्यांत संस्कृतीचे समृद्धत्व, ऐतिहासिकत्व सांगत आजही ही मंदिरे भक्कमपणे उभी आहेत. नुकतेच आंध्र प्रदेश आणि तेलंगणमधील काही मंदिरांना भेटी देण्याचा योग आला. त्यानिमित्ताने आजच्या पहिल्या भागात हैदराबादमधील मंदिरांची ओळख करुन घेऊया...

भारतीय संस्कृती ही विश्वातील अत्यंत प्राचीन संस्कृती म्हणून सर्वश्रुत आहे. मुख्यत: संस्कृतीचा अर्थ ‘सर्वसमावेशक कृती’ असा होतो. धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी ‘संस्कृती’ हा शब्द वापरला जातो. तसेच ‘सम्यक् कृती’ म्हणजेही ‘संस्कृती’ असे समजले जाते.भारतीय संस्कृती ही देशाच्या इतिहासामुळे, विलक्षण भूगोलामुळे आणि जनतेतील वैविध्यामुळे आकारास आली आणि वर्धिष्णू होत गेली. शेजारच्या देशांतील चालीरीती, परंपरा व कल्पना सामावून घेत, वैदिक काळापासून झालेली स्थित्यंतरे, बदल पचवूनदेखील स्वतःचे परंपरागत प्राचीनत्व भारतीय संस्कृतीने टिकवून ठेवले आहे. भारतीय संस्कृतीने तिच्या इतिहासाने, अद्वितीय भौगोलिक रचनेने, वैविध्यपूर्ण लोकजीवनाने आपल्या पुरातन परंपरा जपून आकार घेतला आहे.आपल्या भारतीय संस्कृतीच्या सुवर्ण साक्षीदारांपैकी एक आहेत आपली मंदिरे. प्रत्येक राज्यामध्ये संस्कृतीचे समृद्धत्व, ऐतिहासिकत्व ही मंदिरे सांगतात. मागील काही दिवसांमध्ये मला आंध्र प्रदेश आणि तेलंगणमधील काही मंदिरांना भेटी देण्याचा योग आला. यामध्ये केवळ हैदराबाद आणि आसपासच्या परिसरातील श्री जगन्नाथ मंदिर, बिर्ला मंदिर, रत्नालयम व्यंकटेश्वरस्वामी मंदिर, गंगा-सरस्वती मंदिर, हरे कृष्णा सुवर्णमंदिर, चित्रगुप्त मंदिर ही मंदिरे आम्ही बघितली. या सर्व मंदिरांना स्वत:ची वैशिष्ट्यपूर्ण अशी स्थापत्यशैली तसेच ऐतिहासिक महत्त्वही आहे.
ज्ञान सरस्वती मंदिर
गोदावरी नदीच्या काठी बसरा येथे देवी ज्ञान सरस्वतीचे मंदिर आहे. भारतामधील प्रसिद्ध दोन सरस्वती मंदिरांपैकी हे एक. हे मंदिर ज्या बसरा गावात आहे, त्या गावाला महाभारतकालीन इतिहास आहे. महाभारतानुसार महर्षी व्यास आणि त्यांचे शिष्य आणि ऋषी विश्वामित्र यांनी कुरुक्षेत्रावर झालेल्या युद्धाच्या श्रमपरिहार्थ थंड आणि प्रसन्न वातावरणात राहण्याचे ठरवले. शांत निवास शोधत ते या प्रांतात आले होते, अशी आख्यायिका आहे.ज्ञान सरस्वती मंदिरामध्ये अनेक भक्त श्रद्धेने मुलांचे औपचारिक शालेय शिक्षण सुरू करण्यापूर्वी ‘अक्षरा अभ्यासम’ समारंभासाठी येतात. मुले अभ्यासाची सुरुवात येथे करून सरस्वतीला अभ्याससाहित्य अर्पण करतात, यामुळे पुढील शिक्षण उत्तम, यशस्वी होते, असे समजले जाते. या मंदिरात पूजा पहाटे ४ वाजता सरस्वती देवीला अभिषेक करून सुरू होते. पूजेनंतर देवीला अलंकृत करतात. पवित्र आणि मंगलमय वातावरणात पहाटे ६ वाजता आरती होते आणि प्रसाद दिला जातो.या मंदिरामध्ये महाकाली देवीचीही एक पुरातन मूर्ती आहे. तसेच गर्भगृहात सरस्वती आणि लक्ष्मीची मूर्ती आहे. सहसा पूर्वीपासून लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र राहत नाही, असे म्हणतात. परंतु, या मंदिरात लक्ष्मी, सरस्वती आणि महाकाली या तिन्ही देवता आहेत.
चित्रगुप्त मंदिर
जुन्या हैदराबादमध्ये चित्रगुप्त स्वामींचे मंदिर आहे. चित्रगुप्त हा भगवान यमदेवाचा साहाय्यक असून तो मानवाच्या पाप-पुण्याचा हिशोब ठेवतो, असा समज आहे. दक्षिण भारतातील कायस्थ समाजातील राजांनी अठराव्या शतकामध्ये साधरण २०० वर्षांपूर्वी चित्रगुप्त स्वामींचे मंदिर बांधले. कायस्थ राजांचे कुलदैवत चित्रगुप्त होते. या राजांनी चित्रगुप्तांची मूर्ती दक्षिणी आणि इरावती या देवतांसह स्थापित केली. चित्रगुप्तांना १२ मुलगे होते. या चित्रगुप्ताच्या दरबाराच्या प्रतिमा आपल्याला इथे पाहायला मिळतात. राहू-केतू ग्रहांच्या दोषांपासून निवारण करण्यासाठी भाविक या मंदिरामध्ये येतात. दर बुधवारी चित्रगुप्ताला अभिषेक केला जातो. महाराष्ट्र प्रांतात तसेच उत्तर भारतात चित्रगुप्ताची मंदिरे मध्य प्रदेश सोडल्यास आढळत नाहीत. परंतु, हैदराबाद येथे असणारे हे प्राचीन चित्रगुप्ताचे मंदिर विशेष पुण्यदायक आहे.
श्री जगन्नाथ मंदिर

बंजारा टेकड्यांवर श्री जगन्नाथाचे मंदिर आहे. जगन्नाथाचे मंदिर पाहावे ते ओडिशा येथेच! परंतु, जर तेलंगणमध्ये आला असाल, तर हे जगन्नाथाचे मंदिर ओडिशा येथील मंदिराच्या भव्यतेचा अनुभव देणारे आहे. हैदराबाद येथील उडिया समाजाने या मंदिराची निर्मिती २००९ मध्ये केली. ओडिशा येथील मंदिराची जशीच्या तशी प्रतिकृती त्यांनी येथे उभारली आहे. या मंदिराचे सर्वोच्च वैशिष्ट्य म्हणजे याचा कळस. ७० फूट उंच या मंदिराचा कळस असून या मंदिराचे बांधकाम लाकडी स्वरूपात आहे. याचे संपूर्ण स्थापत्त्य हे उडिया स्थापत्त्यशास्त्रकारांनी केलेले असून यासाठीचे सर्व साहित्यही ओडिशामधून आणलेले आहे. भगवान जगन्नाथांच्या अस्तित्वाचा भास होईल, अशी अनामिक शक्तीने हे मंदिर भारलेले आहे. या मंदिरामध्ये श्री लक्ष्मी, गणेश, हनुमान आणि नवग्रह यांचीही मंदिरे आहेत, तसेच भगवान जगन्नाथांची भावंडे श्री बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचीही मंदिरे आहेत.रत्नालयम व्यंकटेश्वरस्वामी मंदिररत्नालयम व्यंकटेश्वरस्वामी मंदिर हे भगवान व्यंकटेश्वर आणि त्यांच्या पत्नी, देवी पद्मावती आणि देवी अलिवेलू मंगम्मा यांचे निवासस्थान आहे. या मंदिराची निर्मिती अलीकडेच २००१-२००३ या कालावधीत झालेली आहे. हे मंदिर जणू भारतातील प्रमुख देवतांना समर्पित केल्याचे भासते. ‘ग्रुप ऑफ गॉड्स’ असेही या मंदिराविषयी म्हटले जाते. श्री गणेश, श्री हनुमान आणि वासवीकन्यका परमेश्वरी देवीचीही मंदिरे इथे आहेत. या मंदिरामध्ये दैनंदिन पूजाविधी, साप्ताहिक पूजाविधी तसेच प्रभू व्यंकटेश्वराचे सर्व उत्सव भक्तिभावाने साजरे केले जातात. मंदिराचे नावच ‘रत्नालयम’ असल्याप्रमाणे नावाप्रमाणेच इथे सर्व साजशृंगार, वैभव अनुभवता येते.

हे मंदिर पूर्णत: वास्तुशास्त्राच्या आधारे बांधलेले आहे. श्री व्यंकटेश्वराला प्रिय असणारे शंख-चक्र-नमम(गंध-तिलक) त्यांची रचना एका कारंजाच्या रूपात करण्यात आली आहे, तसेच त्याला खगोलीय स्वरूप देण्यात आले आहे. एका तलावाच्या मध्यभागी भगवान विष्णू आपल्या पत्नींसह आदिशेषावर विसावलेले दैवी दृश्य असून हे मंदिराचे सौंदर्य आणि वैभव वाढवते. हे देवस्थान अत्यंत जागृत आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारे म्हणून ओळखले जाते.

बिर्ला मंदिर

बिर्ला मंदिर हे हैदराबाद शहराजवळील एक महत्त्वाचे आणि प्रसिद्ध मंदिर आहे. एकोणिसाव्या शतकात या मंदिराचे बांधकाम करण्यात आले. नौबथ टेकडीवर साधारण दहा वर्षे या मंदिराचे बांधकाम सुरू होते. १३ एकर जागेमध्ये २८० फूट उंचीवर या मंदिराची निर्मिती केलेली आहे. १९७६ साली ‘रामकृष्ण मिशन’च्या स्वामी रंगनाथनंद स्वामी यांनी या मंदिराचे लोकार्पण केले. हे मंदिर ‘बिर्ला फाऊंडेशन’ने बांधले असल्याने ते ‘बिर्ला मंदिर’ म्हणून ओळखले जाते.या मंदिराची वास्तुकला द्रविड, राजस्थानी आणि उत्कल वास्तुकला यांचे मिश्ररूप आहे. दोन हजार टन शुद्ध पांढर्‍या संगमरवरी दगडावर या मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. या मंदिराची मुख्य देवता श्री प्रभू व्यंकटेशस्वामी आहेत. त्यांची ११ फूट उंचीची ग्रॅनाईटची मूर्ती असून त्यांच्यावर एक कोरीव काम केलेली कमळरूपी छत्री आहे. मंदिराच्या आवारात एक ४२ फूट उंचीचा पितळी ध्वजस्तंभ आहे. या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात पारंपरिक घंटा नाहीत. स्वामी रंगनाथनंदजी यांनी हे मंदिर ध्यानधारणेसाठी अनुकूल असावे, शांतताभंग होऊ नये यासाठी घंटा असू नये, असे सांगितले होते.हे मंदिरही ‘ग्रुप ऑफ गॉड्स’मध्ये येते. स्वामी व्यंकटेश, पद्मावती देवी यांची मुख्य मंदिरे आहेतच. तसेच भगवान शिव-शक्ती-श्री गणपती-हनुमान-ब्रह्मदेव-सरस्वती आणि लक्ष्मी यांची स्वतंत्र मंदिरे आहेत. हे मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले आहे.
हरे कृष्ण सुवर्ण मंदिर

हरे कृष्ण सुवर्ण मंदिर एका हिरव्यागर्द अशा टेकडीवर आहे. सुमारे ७०० वर्षांपूर्वी भगवान स्वयंभू श्री लक्ष्मी-नरसिंह स्वामी म्हणून प्रकट झाले. भगवान स्वयंभू श्री लक्ष्मी-नरसिंह स्वामींसोबत, भगवान शंकरदेखील त्याच ठिकाणी स्वयंभू श्री पंचजन्येश्वर स्वामी म्हणून प्रकट झाले, असा इतिहास आहे. हरे कृष्ण सुवर्ण मंदिर हे तेलंगणमधील पहिले सुवर्ण मंदिर आहे आणि या जागृत अशा मंदिरात ५० फुटाचा सुवर्ण ध्वजास्तंभ, ४६०० चौरस फूट महामंडप आणि पाच सुवर्ण पायर्‍या असलेले राजगोपुरम आहेत. या ठिकाणी भगवंत स्वत: प्रकट झाल्याच्या खुणा असून याचे वैशिष्ट्य म्हणजे भगवान आणि त्यांच्या पत्नी श्री लक्ष्मीदेवी स्वयंप्रकट उभ्या असलेल्या स्थितीत आहेत. ही मूर्ती भगवान नरसिंहदेव आनंदमय दिव्यस्वरूप आणि लक्ष्मी देवीचाअभय हस्त पाठीशी आहे, हे दर्शवते.ध्वजस्तंभाच्या पुढे हरिनाम जप मंडप आहे. भगवान कृष्णाच्या दर्शनाकरिता जाताना मनात अन्य कोणतेही विचार न येता, केवळ कृष्णनामाचा पवित्र जप करावा, हे यातून सूचित होते. जप मंडपामध्ये १०८ पायर्‍या आहेत आणि या प्रत्येक पायरीवर भक्त उभे राहून ‘हरे कृष्ण’ महामंत्राचा जप करतात.एक-दीड दिवसामध्ये हैदराबादमधील या पाच मंदिरांचे दर्शन घेणे शक्य आहे. काही मंदिरे जसे देवी शारदेची प्रात:पूजा अनुभवावी... तिला वंदन करून चित्रगुप्ताकडे आपले दोषनिवारण करावे. नंतर श्री जगन्नाथाची भव्यदिव्यता अनुभवावी. रत्नालयम तसेच बिर्ला मंदिरात ‘ओम नमो व्यंकटेशा...’च्या ध्यानधारणा करून दिवसाच्या समाप्तीला कृष्णासमोर नतमस्तक होता येते. हरे कृष्ण मंदिराची सायंशोभा अवर्णनीय आहे. येथील रम्य परिसरामधून निघावासंही वाटत नाही. परंतु, तेलंगण आणि आंध्र प्रदेशमधील अन्य उत्तम मंदिरे बघायची असतील, तर आता आपल्याला निघायला हवं! (क्रमश:)

 
“मंदिरांना भेट देण्याआधी...

 हैदराबाद येथे जाण्यास विमान, रेल्वे या सुविधा उपलब्ध आहेतच. तसेच रस्ते मार्गानेही हैदराबादला जाता येते. मंदिरांना भेट देण्याआधी तेथील वेळा, दर्शनाचे नियम यांची माहिती घेणे आवश्यक आहे. काही मंदिरांच्या ठिकाणी जाण्यास बससुविधाही आहे, अन्यथा तिथे जाण्यास खासगी वाहन करून जाणे सोयीचे ठरते.”




वसुमती करंदीकर



@@AUTHORINFO_V1@@