बर्किना फासो : दहशतीचे राज्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2022   
Total Views |

burmino
आफ्रिका खंडातील एक देश बर्किना फासो. ६१ टक्के सुन्नी मुस्लीम, तर १९ टक्के ख्रिश्चन, १५ टक्के मूळच्या निसर्गपूजक जमाती आणि पाच टक्के अन्य, अशी या देशात लोकसंख्येची विभागणी. २०१६ पूर्वीया देशाकडे तसे फारसे कुणाचे लक्षही नव्हते. मात्र, २०१६ सालानंतर अचानक या देशात ‘अल कायदा’, ‘इस्लामिक स्टेट इन द ग्रेटर सहारा’, ‘अन्सारून इस्लाम’, ‘इस्लामिक मघरब’ वगैरे संघटनांनी इथे हैदोस घातला. अर्थात, सुरुवातीला या सगळ्या संघटनांनी स्थानिक मुस्लीम जनतेसमोर आपली भूमिका मांडली की, त्यांना इस्लामचे राज्य आणायचे आहे.
 
 
त्याच कालखंडात इथे अचानक देशातील चर्चवर हल्ले होऊ लागले. देशातील एका बहुसंख्य गटाचे म्हणणे होते की, बर्किना फासो देश फ्रेंचांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. मुस्लीम बहुसंख्य असलेल्या देशावर ख्रिस्ती राज्यकर्त्यांनी राज्य केले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही! देशात प्रमुख भाषाही फ्रेंच. मुस्लीम बहुसंख्य देशात अरबी सोडून फ्रेंच भाषेला महत्त्व का? तसेच देशातले १९ टक्के ख्रिस्ती लोकांचे धर्मबांधव देशात राज्यकर्ते होते. त्यामुळे ते पिढ्यान्पिढ्या सुस्थिर आहेत. देश स्वतंत्र झाल्यावरही संसाधन आणि अनेक संस्थात्मक जागांवर तेच प्रमुख आहेत. देशातील मुस्लिमांचा या ख्रिश्चन लोकांवर राग आहे. त्यामुळेच या देशात मुस्लीम दहशतवादी संघटनांना हातपाय पसरणे सोपे गेले.
 
त्यानंतर देशातील प्रशासन खडबडून जागे झाले. अरबी भाषा आणि संवर्धन, मुस्लीम प्रथा संस्कार वगैरेंबद्दलचे शिक्षण देशात सुरू झाले. या सगळ्यामुळे दहशतवादी संघटनांच्या कारवाया थांबतील असे वाटले. पण, मुळातच या दहशतवादी संघटनांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळेच. कारण, त्यांचे हिंसक हल्ले थांबले नाहीत. या दहशतवाद्यांनी बर्किना फासो आणि आजुबाजूच्या देशातील हजारो शाळा बंद पाडल्या. त्यातल्या दीड लाख मुलांची शाळा सुटली. हजारो लोक दहशतवाद्यांच्या भीतीने विस्थापित झाले. या दहशतवाद्यांनी बहुसंख्य मुस्लीम देशातच हे हल्ले का सुरू ठेवले, याचा जागतिक अभ्यासकांनी मागोवा घेतला. त्यात चित्र समोर आले. या संघटनांना या देशात ‘इस्लामिक राज्य’ वगैरे आणायचा, हा उद्देश तर देखावा आहे. मुख्य कारण आहे ते हे की, २०१८ साली उपग्रहाद्वारे या देशाचे खनिज सर्वेक्षण केले गेले. त्यावेळी देशात २,२०० खाणी आहेत, हे स्पष्ट झाले. तसेच शेकडो सोन्याच्या खाणीही माहिती झाल्या. उपग्रहामुळे या सर्व खाणी ज्ञात झाल्या. त्यामुळे या अतिरेक्यांनी आपला मोर्चा बर्किना फासो देशाकडे वळवला. जिथे जिथे खाणी आहेत, तिथे लोकांवर हल्ले सुरू केले. २०२१ सालचाच आढावा घेतला तर जून महिन्यात सोन्याच्या खाणीजवळ राहणाऱ्या परिसरातील लोकांवर हल्ला केला. १३२ लोक मृत्युमुखी पडले, पण सप्टेंबर महिन्यातही सोन्याच्या खाणीजवळ हल्ला करण्यात आला, तर नोव्हेंबरमध्ये ५६ पोलिसांवर हल्ला केला गेला. नुकत्याच अशाच एका हल्ल्यात ४१ नागरिक मृत्युमुखी पडले. या हल्ल्यात बर्किना फासोच्या एका नामांकित सेवाभावी संस्थेचे प्रमुख मारले गेले. ही संस्था बर्किना फासोच्या सैनिकांसाठी काम करायची.
 
बर्किना फासोचे खननमंत्री ओउमारु इदानी यांनी काही वर्षांपूर्वी कबूल केले की, इस्लामिक अतिरेक्यांनी संरक्षित भागात काही खाणी हस्तगत केल्या आहेत. दहशतवादी स्थानिकांना या खाणीमध्ये काम करण्यास जबरदस्ती करतात. ओउमारु इदानीचे हे म्हणणे खरे असेल, तर मग या देशातील बहुसंख्य मुस्लिमांचे मत काय आहे? देशाचा अधिकृत धर्म ‘इस्लाम’ असतानाही या अतिरेकी संघटना आणखी कोणते इस्लामचे राज्य या देशात आणणार होते? देशात खनिज संपत्तीच्या हजारो खाणी आहेत. मात्र, तरीही देश गरीब आहे. कारण, या खाणींवर दहशतवाद्यांनी जबरदस्तीने कब्जा केला आणि वर स्थानिकांना गुलाम बनवून इथे काम करण्याची सक्ती केली. हे कोणत्या धर्माचे राज्य आहे? या दहशतवादी संघटनांना जे कोणते राज्य आणायचे आहे, त्याचे स्वरूप हेच आहे का? अर्थात, अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी जे काही राज्य आणले, ते सगळ्या जगाने पाहिले. त्यामुळे कट्टर इस्लामचा पुरस्कार करत जगभरात दहशतवाद माजवणाऱ्या या संघटना कधीही कुणाच्या भल्यासाठी काम करणार नाहीत, हेच सत्य आहे. त्यासाठी बर्किनाफासोचे आणखी एक उदाहरण!
@@AUTHORINFO_V1@@