‘जिनिअस इंडिया’चे मोहन पाखरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2021   
Total Views |
 
mohan pakhre_1  

खरेतर २००८ पासूनच मोहन यांचे शैक्षणिक क्षेत्रातील काम सुरू होते. त्यासाठी ‘जिनिअस इंडिया’ नावाची संस्था त्यांनी उभारली. २०१४ साली ‘जिनिअस इंडिया’चे ‘प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’त रुपांतर झाले. अभ्यासाच्या विविध पद्धतींच्या संदर्भात ते प्रशिक्षण घेतात. मुले का विसरतात, परीक्षेला का घाबरतात, याविषयी शास्त्रोक्त अभ्यास करून त्यांनी तंत्र विकसित केले आहे. त्या तंत्रानुसार प्रशिक्षण देणारी कार्यशाळा ते घेतात. मुलांसोबत पालकांनादेखील शिकवले जाते.


‘रयत शिक्षण संस्था’ म्हणजे लाखो विद्यार्थ्यांना घडवणारी एक आदर्शवत संस्था. कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी अक्षरश: जीवाचे रान करून वाढवलेली संस्था. या दाम्पत्यामुळेच ही संस्था महाराष्ट्राच्या खेडोपाडी पोहोचली. त्यांनी वंचित, शोषित, गरीब अशा घटकातील विद्यार्थ्यांना स्वत:च्या कवेत घेऊन शिक्षणाचे पंख दिले. आजही मुले स्वत:च्या पायावर उभी आहेत. यातील काही मुले तर राजकारण, समाजकारण, पोलीस दल, भारतीय सैन्यदल, उद्योगक्षेत्र, शिक्षणक्षेत्र अशा विविध क्षेत्रांत ठसा उमटवत आहेत. ‘ते’देखील अशाच एका गरीब कुटुंबातले. लहानपणीच पितृछत्र हरपलेले. पण, ‘रयत शिक्षण संस्थे’ने त्यांना कवेत घेतले आणि पठ्ठ्याने जागतिक विक्रमालाच गवसणी घातली. विद्यार्थ्यांना, पालकांना घडविणारी संस्था उभारली. ही गोष्ट आहे ‘जिनिअस इंडिया’ या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मोहन पाखरे यांची.

सांगली जिल्ह्यातील विसापूरमधील हरिबा पाखरे एक शेतमजूर होते. शेतीत राबणे, विहीर खोदणे, रस्ता खोदणे, अशी मिळेल ती कामे हरिबा करत. त्यांची पत्नी पुतळाबाई त्यांनी समर्थपणे साथ देत होत्या. हरिबा आणि पुतळाबाईस एकूण चार अपत्ये, तीन मुली आणि एक मुलगा. हा मुलगा म्हणजेच मोहन. मोहन हे पाच-सहा वर्षांचा असताना ती दुर्दैवी घटना घडली. विहिरीच्या खोदकामाचे काम चालू असतानाच हरिबा गेले. पुढे या चार मुलांचा आणि पुतळाबाईंचा सांभाळ मोहन यांच्या मामाने केला. मोहन यांना एकूण पाच मामा. त्यातील दोघे शिक्षक. त्यामुळे शिक्षणाचे संस्कार या मुलांवर झाले. पहिली ते चौथी मोहन विसापूरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले. पुढे दहावीपर्यंत ते रयत शिक्षण संस्थेच्या ‘आर. एस. माने- पाटील विद्यालया’त शिकला. येथे खर्‍या अर्थाने त्यांचा पाया खंबीर झाला.

पुढे अकरावी-बारावी त्यांनी विज्ञान शाखेतून सांगलीच्या प्रसिद्ध ‘विलिंग्डन महाविद्यालया’तून केली. बारावीमध्ये उत्तम गुण मिळाल्याने पुढे इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचे त्यांनी निश्चित केले, मामांची साथ होतीच. सांगलीच्या इंजिनिअरिंगसाठी प्रसिद्ध अशा ‘वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’मध्ये त्याने प्रवेश घेतला. सरकारी वसतिगृहात राहायचा. शिष्यवृत्ती मिळायची, त्याचा थोडाफार हातभार लागायचा. सोबतच ते जादूच्या प्रयोगाचे छोटे-मोठे कार्यक्रम करायचे. मनोज रोकडे यांनी मोहन यांना ती विद्या शिकवली होती. त्यातून थोडे फार अर्थार्जन होत असे. असे करता करता त्यांनी ‘इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन’ या विषयात ‘बीई’ ही अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली.
 
पदवी मिळाल्यानंतर तीन वर्षे त्यांनी काही खासगी कंपन्यांमध्ये नोकर्‍या केल्या. मात्र, स्थिरस्थावरता आली नव्हती. अशातच कुणीतरी त्यांना बँकेची जाहिरात दाखवली. ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ची जाहिरात समजून त्यांनी त्या संबंधित जागेसाठी अर्ज केला. मोहन यांची सदर जागेसाठी निवड झाली. पण ती बँक होती ‘स्टेट बँक ऑफ त्रावणकोर.’ बँकेने त्यांना केरळमधल्या तिरुवनंतपुरममध्ये नियुक्ती दिली. मोहन दोन वर्षे त्या ठिकाणी राहिले. केरळचे निसर्गसौंदर्य त्यांना भावले. कामामधील त्याची प्रगती पाहून अल्पावधीत बँकेने त्याची बेलापूर येथे नियुक्ती केली. ‘आरटीजीएस’ आणि ‘एनईएफटी’ या विभागात त्यांनी सहा वर्षे काम केले. बँकेने त्यांना दोन वर्षांसाठी कोल्लम आणि तिरुवनंतपुरम या जिल्ह्यांचा प्रमुख म्हणून नियुक्त केले. दोन वर्षे काम केल्यानंतर मोहन यांनी गलेलठ्ठ पगार असणार्‍या बँकेच्या नोकरीचा राजीनामा दिला. कारण, त्यांना आता शैक्षणिक क्षेत्र खुणावत होते. याच क्षेत्रात त्यांना भरीव असे काहीतरी करायचे होते. मात्र, ते सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंतच्या नोकरीच्या चक्रव्यूहात अडकले होते. त्यातून त्यांना बाहेर पडायचे होते.


खरेतर २००८ पासूनच मोहन यांचे शैक्षणिक क्षेत्रातील काम सुरू होते. त्यासाठी ‘जिनिअस इंडिया’ नावाची संस्था त्यांनी उभारली. २०१४ साली ‘जिनिअस इंडिया’चे ‘प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’त रुपांतर झाले. अभ्यासाच्या विविध पद्धतींच्या संदर्भात ते प्रशिक्षण घेतात. मुले का विसरतात, परीक्षेला का घाबरतात, याविषयी शास्त्रोक्त अभ्यास करून त्यांनी तंत्र विकसित केले आहे. त्या तंत्रानुसार प्रशिक्षण देणारी कार्यशाळा ते घेतात. मुलांसोबत पालकांनादेखील शिकवले जाते.


 बहुतांश वेळा पालकांना पालकत्व उमजत नाही, त्यासंबंधीच्या कार्यशाळेचे आयोजन संस्था करते. २००७ साली ते भावनिक कोंडमारा या संबंधित समुपदेशन करायचे. त्यावेळेस त्यांच्याकडे पदवी नव्हती. निव्वळ आवड आणि निरीक्षण या बळावर अचूक विश्लेषण ते करत. मात्र, त्यांनी २००७-२००९ मध्ये ‘सायकोथेरपी आणि काऊन्सलिंग’ या विषयात ‘एमएस्सी’ पदवी प्राप्त केली. त्यानंतर विवाहपूर्व आणि वैवाहिक भावनिक जीवनासंदर्भातदेखील समुपदेशन करू लागले.
 
मोहन पाखरे हे स्वत: गणितज्ञ आहेत. गणितातील ‘पास्कल ट्रायंगल’ या विषयाचा त्यांचा प्रगाढ अभ्यास आहे. यासंबंधी त्यांनी मानवी रचनेतून त्रिकोण बनविणारे ते पहिले भारतीय असून जगात दुसर्‍या क्रमांकाची व्यक्ती आहे. ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’, ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’, ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया’, इंग्लंडमधील ‘रेकॉर्ड होल्डर्स रिपब्लिक’, ‘असिस्ट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’सारख्या संस्थांमध्ये त्यांच्या विक्रमांची नोंद घेण्यात आली आहे.
 
आतापर्यंत ‘जिनिअस इंडिया’ने २० देशांतील हजारो मुलांना प्रशिक्षित केले आहे. साडेपाच हजार मुलांना स्पर्धा परीक्षेचे आणि गणिताची भीती घालवण्यासाठी मार्गदर्शन दिले आहे. लक्षात न ठेवता अभ्यास कसा करावा, यासंबंधी त्यांनी एक तीन दिवसीय कार्यशाळा कोरोनाकाळात दूरस्थ पद्धतीने घेतली होती. त्याचा लाभ ६०० मुलांना झाला. शिक्षण पद्धत ही पारंपरिक न राहता तिचे ‘रिइंजिनिअरिंग’ करण्याची गरज आहे आणि भविष्यातदेखील ते करू, असे मोहन पाखरे म्हणतात. कौशल्याधारित अभ्यासक्रम तयार करून मुलांना प्रशिक्षित करण्याचा त्यांचा मानस आहे.

कोरोनाकाळात दूरस्थ पद्धतीने घरीच शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षण न देता वेगळ्याप्रकारे शिक्षण देण्याची आता गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी जगभर निरनिराळे प्रयोग होत आहेत. मोहन पाखरेदेखील असाच काहीसा प्रयोग करत आहेत. त्यांना हे यश मिळो आणि ‘जिनिअस इंडिया’ खर्‍या अर्थाने घडो!

 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@