बेळगावातील मराठी माणसाने शिवसेनेला का नाकारले?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

belgum_1  H x W



विकासकामांना महत्त्व दिल्यानेच मराठी भाषकांकडून भाजपची निवड; बेळगावमधील भाजपच्या विजयाचे गमक


मुंबई, दि. ७
: बेळगाव महानगरपालिकेत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. भाजपच्या तब्बल ३५ नगरसेवकांच्या पाठीशी बेळगावातील जनतेने कौल दिला. या ३५ नगरसेवकांपैकी १६ नगरसेवक हे मराठी भाषक आहेत. भारतीय जनता पक्षाने मागील सात-आठ वर्षांत केलेल्या कामाची पावती जनतेने त्यांना दिली आहे. भाजपचे सर्वच पदाधिकारी, आमदार, खासदार हे सातत्याने या भागात विकासाची कामे करत आहेत. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यातही या सर्वांची भूमिका महत्त्वाची होती, असे मत बेळगावातील भाजप पदाधिकार्‍यांनी महापालिकेतील विजयानंतर व्यक्त केले.


मराठी भाषक असो वा इतर कुणी, हा सर्व विचार बाजूला ठेवून राष्ट्रीय विचारसरणीचा विचार करणारे, तरुण आणि विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करणार्‍यांच्या पाठीशी आता येथील जनता उभी आहे. म्हणूनच येथील नागरिकांनी आता भारतीय जनता पक्षाला मतदान केले आहे. आज आपल्या आजूबाजूच्या सर्व भाषाही आपण आत्मसात केल्या पाहिजेत. येथील मराठी घरांत कन्नड सून आलेली आहे, तर कन्नड घरांत मराठी मुलगी आहे, ही सांस्कृतिक आदान-प्रदान येथील जनतेने मान्य केली आहे. मात्र, काही राजकीय पुढार्‍यांनी कन्नड-मराठी हे मतभेद राजकीय फायद्यासाठी सुरू करून दिले आहेत. कर्नाटकातील मराठी भाषकांना अल्पसंख्याक म्हणून जरी सुविधा दिल्या, तरी बेळगावातील मराठी माणूस खूश आहे. आजही सर्वाधिक मराठी भाषक निवडून आले, ते भाजपचे उमेदवार आहेत. “यापूर्वी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून इथली मराठी जनता ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’च्या उमेदवारांना निवडून देत होती. मात्र, आता विकासाच्या आणि राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावरून येथील मराठी जनतेने भाजपला कौल दिला आहे,” असे ज्येष्ठ पत्रकार आणि ‘वीरवाणी’चे संपादक लक्ष्मण पवार यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना सांगितले.


पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर निवडणूक


‘महाराष्ट्र एकीकरण समिती’त पडलेली फूट हे त्यांच्या पराभवाचे सर्वात मोठे दुसरे कारण आहे. या सर्वच गटांनी आपले बळ दाखविण्याच्या नादात आपले आपले उमेदवार दिले. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांनी आपली पूर्ण ताकद या ठिकाणी पणाला लावली. भाजपचे दोन आमदार आणि दोन खासदार पूर्ण क्षमतेने भाजपच्या विजयासाठी कार्यरत होते. भाजप कार्यकर्त्यांची फळी इथे चांगली आहे. पहिल्यांदाच भाजपने राष्ट्रीय पक्षाच्या नावावर इथे निवडणूक लढवली.


अल्पकाळात जाहीर झालेला निवडणूक कार्यक्रम


निवडणुकीच्या दहा दिवस अगोदर हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यामुळे मग मतदारांनी कोणाला मतदान करायचे, तर राष्ट्रीय पक्ष कोण? तर भाजप आणि काँग्रेस म्हणून लोकांनी भाजप आणि दुसर्‍या क्रमांकावर काँग्रेसला मतदान केले. महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याने काय झाले हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे इथे भाजपवर विश्वास ठेवून जनतेने भाजपला साथ दिली, असे जाणकार सांगतात.


मराठी आणि मुस्लीम गटांची एकत्र येत ‘एमएम’नावाने हातमिळवणी


‘महाराष्ट्र एकीकरण समिती’च्या पराभवाचे दुसरे कारण म्हणजे काही मराठी आणि मुस्लीम गटांनी एकत्र येत ‘एमएम’ नावाने हातमिळवणी केल्याची एक चित्रफीत या काळात समाजमाध्यमावर व्हायरल झाली होती. यात १४ मुस्लीम आणि २० मराठी एकत्र झाले, तर ते महापालिकेवर सत्ता करू शकतात, असा आशय या चित्रफितीमध्ये होता. याचा फटका ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’ला बसला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून या भागात लोक अत्यंत जागरूक आहेत. अशा वेळी गुप्तपणे झालेली ही हातमिळवणी इथल्या जनतेत रोष निर्माण करणारी होती.


हे नव्या युगातील राजकारण

अल्पसंख्याक भाषकांनी भांडण-तंटे न करता एकत्र येत राष्ट्रीय पक्षाच्या, तरुण उमेदवारांच्या पाठीशी विकासाच्या मुद्द्यावर उभे राहिले तर त्या भागाचा विकास निश्चित आहे, हे येथील जनतेला कळून चुकले आणि म्हणूनच येथील नागरिकांनी भाजपला स्पष्ट बहुमत दिले.


राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नागरिक अत्यंत जागरूक


विकासाच्या मुद्द्यावर इथले नागरिक जागरूक झाले आहेत आणि याच कारणामुळे इथले मराठी लोक भाजपसोबत जोडले गेले. राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर इथले नागरिक अत्यंत जागरूक आहेत. इथल्या काही ‘महाराष्ट्र एकीकरण’च्या नेत्यांनी ‘एमआयएम’सोबत अंतर्गत हातमिळवणी केली. याचा रोष इथल्या मराठी नागरिकांमध्ये होता. त्याचा फटका ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’ला बसला. केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारही त्या भागातील विकासासाठी प्रयत्नशील आहे. यामागील सात ते आठ वर्षांत या भागात जी विकासकामे भाजपच्या माध्यमातून झाली, त्याचमुळे जनतेने भाजपला कौल दिला आहे.

- इरण्णा कदादी, खासदार, भाजप

महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्षाला सत्ता

बेळगाव महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राष्ट्रीय पक्षाला सत्ता मिळाली आहे. याचे कारण आहे विकास. मागील काही वर्षांत भाजप आमदारांनी केलेली विकासकामे, राज्य सरकारच्या योजना, केंद्र सरकारच्या योजना या सगळ्यांकडे बघून येथील मतदारांनी एका नवीन युगाची सुरुवात येथे केली. भाषक आणि भावनिक राजकारणाला विरोध करत एक नवीन दिशा देण्याचे काम येथील मतदारांनी केले आहे. 58 पैकी 35 भाजपचे नगरसेवक निवडून आले हा विजय बेळगावकरांचा आहे. ‘बेळगाव महानगरपालिका बेळगावकरांच्या दारात!’ ही घोषणा आम्ही केली. भाजपचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक केंद्र व राज्याच्या सर्व योजना बेळगावकरांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे काम करणार आहेत.

- अभय पाटील, आमदार, भाजप, बेळगाव


आता वेळ बदलली आहे

भारतीय जनता पक्षाचे संघटनात्मक कार्य हे गल्ली, बूथ आणि स्थानिक पातळीवरच आहे. भाजपच्या सर्वच नेत्यांनी कोरोनाकाळात मोठ्या प्रमाणावर मदतकार्य केले. मराठी भाषक आणि अन्य भाषक राजकारण या भागात यापूर्वी होते. मात्र, आता वेळ बदलली आहे. आता येथील जनतेला विकासाची चाहूल लागली आहे. मीही मराठी भाषक आहे. आम्ही सर्वधर्म आणि भाषक समभाव जपत एकत्रित कार्य करतो आहोत.

- शशिकांत पाटील, जिल्हाध्यक्ष, भाजप, बेळगाव


तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न

दहा वर्षांपासून भाजपच्या आमदार, खासदार यांच्या माध्यमातून जी विकासकामे या भागात झाली, यामुळेच भाजपचा इथे विजय झाला आहे. भाजप यापुढेही विकासाच्या मुद्द्यावर ठाम आहे. तळागाळातील जनतेपर्यंत सर्व विकासकामे, सुखसोयी पोहोचविणे, हा आम्हा सर्व भाजपच्या विजयी नगरसेवकांचा प्रयत्न असणार आहे. जनतेला यापूर्वी ज्या मूलभूत समस्यांसाठी संघर्ष करावा लागत होता, त्यासाठी पुन्हा आवाज उठवावा लागणार नाही, याची खबरदारी आम्ही घेणार आहोत.

- ब्रह्मानंद मिरजकर, नगरसेवक, भाजप, बेळगाव


विकासकामांमुळेच जनतेचा भाजपला कौल

भाजपचे आमदार अभय पाटील यांनी या भागात अनेक विकासकामे केली. या विकासकामांमुळेच जनतेने भाजपला प्रतिसाद दिला. इतकी वर्षे बेळगाव महापालिकेत महाराष्ट्र ‘एकीकरण समिती’ची सत्ता होती होती. मात्र, समितीने आजपर्यंत केवळ भाषेचे राजकारण केले. या भागाच्या विकासासाठी काहीही केले नाही. याचीच खंत इथल्या जनतेत होती. दक्षिण बेळगावमध्ये 25 पैकी 23 नगरसेवक निवडून आले, याचे एकमेव कारण आहे ते म्हणजे विकास. ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत या भागात होत असलेली विकासकामे हेच भाजपच्या यशाचे एकमेव कारण आहे.

- राजू भातकंडे, नगरसेवक, बेळगाव, भाजप


@@AUTHORINFO_V1@@