वैदिक परंपरा आणि साधना - भाग-१०

वैदिक परंपरा आणि साधना - भाग-१०

    08-Sep-2021
Total Views |
  kund_1  H x W:
                                         
  
‘कुंडलिनी’ शक्तीचे शरीरातील स्थान
 
पेशीतील गुणसूत्रात ‘जीन्स’ असतात. या ‘जीन्स’मध्येसुद्धा आणखी परमसूक्ष्म रचना असतात, त्यांना ‘गुणाणू’ किंवा 'Quality Particles' म्हणतात. हे ‘गुणाणू’ एक दुसर्‍यामुळे नेहमी एका विशिष्ट ढंगाने स्पंदन पावत असतात. ‘गुणाणू’चे स्थान त्यांच्या भिन्न भिन्न रचनेनुसार जरी भिन्नभिन्न असले, तरी गुणाणूंची एकूण रचना कुंडलाकार अवस्थेमध्ये (Spiral) असते. कुंडलस्थित ‘गुणाणूं’ची रचना जर बदलविली, तर भिन्न गुण उत्पन्न होतात आणि ते त्या व्यक्तींचे गुण बनतात.
 
 
 
त्याच ‘गुणाणूं’ची विशिष्ट प्रकाराने रचना झाल्यास प्रेम किंवा अन्यान्यप्रकारे रचना झाल्यास द्वेष किंवा क्रोध आदी गुण उत्पन्न होतात, हे आता सिद्ध झालेले आहे. खोराणा यांचा असा दावा आहे की, ‘गुणाणूं’ची रचना बदलून मूर्खाचा ज्ञानी, क्रोधीचा शांत स्वभावी आणि अशाच प्रकारे अत्युत्तम गुणांची व्यक्ती बनविणे शक्य होईल.परंतु, या प्रकारची गुणबदलाची प्रक्रिया अजून पूर्णांशाने शक्य कोटीत आलेली नाही आणि हेही अजून प्रस्थापित झालेले नाही की, शरीरातील घटाघटामध्ये भरून असलेल्या ‘गुणाणूं’चे परिवर्तन कोणत्या प्रक्रियेने साध्य करता येईल. शिवाय अशा प्रकारच्या प्रक्रियेने गुणरोपण किंवा परिवर्तन केल्यास अनेक योनीमधून प्रस्थापित झाले.
 
 
 
‘गुणाणू’ आपल्या प्रस्थापित गुणरचनेचा त्याग करून, आपल्या मूळ प्रकृती रचनेपासून अगदी भिन्न आणि परक्या अशा नवीन गुणरचनेचा स्वीकार करतील का? आणि प्रकृतीच्या संस्कारातून उत्पन्न झालेल्या ‘गुणाणूं’नी जरी बाह्यशक्तींच्या दबावाखाली अनिच्छेने काही क्षण भिन्न रचनेचा स्वीकार केला, तरी ‘गुणाणू’ या नवीन रचनेचा कायम स्वीकार करतील का? हे जर शक्य नसेल, तर गुणबदल चिरस्थायी कसा होईल? या प्रश्नांचे गूढ अजून तरी विज्ञानाने उकललेले नाही. याबाबत विज्ञानाने मौन धारण केल्यासारखे वाटते. आजतरी गुणांबद्दल हे एक प्रमेय आहे. अजून सिद्धांत प्रस्थापित झालेला नाही.
 
 
 
‘गुणाणूं’बदलाचे वैदिक तत्त्वज्ञान
 
 
 
वैदिक ऋषींना हे ‘गुणाणूं’बदलाचे जटिल आणि दिव्य शास्त्र अवगत होते. ‘गुणाणू’बदलाला ते ‘कुंडलिनी’ जागृती म्हणतात. जे कार्य आज विज्ञान बाह्य उपकरणांच्याद्वारे करू इच्छिते ते शरीराच्या प्रत्येक पेशीतील नियतीप्राप्त ‘गुणाणूं’ची रचना बदलण्याचे कार्य ऋषिमुनींनी योगसाधनेद्वारे केलेले आहे. या कठीण प्रयोगात ऋषी यशस्वी झाले, तर आज विज्ञान अजून प्रयोगावस्थेतच आहे. सतत साधना करीत राहिल्यास साधकाच्या मूळ शरीरातील ‘गुणाणू’रचना आपोआप बदलून साधकाच्या साध्य विषयानुकूल नवीन रचना तयार होते आणि जेव्हा हा ‘गुणाणू’बदल ज्ञात अवस्थेपर्यंत येऊन पोहोचतो तेव्हा त्याला ‘कुंडलिनी’ जागृती म्हणतात, तोपर्यंत ‘कुंडलिनी’ किंवा पेशीस्थित ‘गुणाणू’रचना सुप्त किंवा निद्रिस्त अवस्थेत असते, असे मानले जाते. साधकाच्या ध्येयाच्या दृष्टीने ती रचना आवश्यक नसल्यामुळे सुप्त असते. यावरून हे स्पष्ट होईल की, ‘कुंडलिनी’ जागृती म्हणजेच ‘गुणाणू’बदल (डीएनए बदल) होय.
 
 
 
‘कुंडलिनी’ म्हणजे ‘गुणाणू’रचना
 
 
लेखकाचा अनुभव असा आहे की, ‘कुंडलिनी’ जागृतीच्या कितीतरी अगोदरच्या टप्प्यात साधकाला आपल्या शरीरात हळूहळू सूक्ष्म बदल होत असल्याची जाणीव होते. अर्थात, या ‘घटगुणाणू’ परिवर्तनासाठी त्याने स्वतःची सिद्धता ठेवली पाहिजे. अन्यथा या परिवर्तनाची चाहुल साधकाला लागणार नाही. अशाप्रकारे गुणपरिवर्तनासाठी सावध राहणे, ही साधी गोष्ट नाही. अत्युच्च धारणा असलेल्या साधकालाच ही सतर्कता शक्य आहे. दुसरे कारणसुद्धा तेवढेच अवघड आहे, ‘गुणाणू’परिवर्तन किंवा ‘कुंडलिनी’ जागृतीचे भिन्नभिन्न टप्पे साधकाला असह्य होऊन दाह निर्माण करतात. ‘कुंडलिनी’ जागृतीच्या काळात साधकाला इतके असह्य कष्ट सोसावे लागतात की, त्यामुळे अधिकांश साधक आपल्या शरीरात होत असलेल्या बदलावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. ‘कुंडलिनी’ जागृती म्हणजेच ‘गुणाणू’रचना परिवर्तन आहे, याबद्दल लेखकाला मुळीच संदेह नाही. ‘कुंडलिनी’ जागृती ही काही मौजेची किंवा आनंददायी गोष्ट नाही, एक प्रकारची विलक्षण गतिमानता आणि विद्युत स्पंदनशीलता उत्पन्न होते. ‘गुणाणूं’चे परिवर्तन चालू असल्याचे हे लक्षण आहे.
 
 
  
हे परिवर्तन परिपूर्णावस्थेत पोहोचते, तेव्हा साधकाच्या शरीरात असह्य दाह उत्पन्न होतो. परंतु, तापमापकाने शरीराचे तापमान पाहिल्यास काहीच आढळून येत नाही, असा विलक्षण अतींद्रिय दाह असतो. प्रत्येक खर्‍या योग्याने किंवा भक्ताने या शरीरदाहाचे वर्णन आपापल्या काव्यरचनेत केलेले आहे. भक्त मीरा म्हणते, ’राणाने भेजा विषका प्याला। पीबत मीरा नाची रे॥’आमचे साहित्यिक या पदाचा अर्थ निराळाच लावतात. याचे कारण त्यांना साधनासमयी उत्पन्न होणार्‍या या दाहाचा म्हणजेच भक्त मीराने ज्याला ‘विषाचा प्याला’ संबोधिले, त्या विषाच्या प्याल्याचा मुळीच अनुभव नसतो.
 
 
 
‘कुंडलिनी’विषयी भ्रामक विज्ञान
 
 
 
मानवजातीकरिता हे एक शुभ लक्षण आहे की, आजकाल सर्वत्र योगासनावर व काही अंशी ध्यानधारणेवर भर दिला जात आहे. आता सर्व मानवजात स्वतःला ‘वैदिक’ म्हणजेच ज्ञानमय जीवनाने परिपूर्ण बनवू इच्छिते, हे शुभचिन्ह आहे. साधक कोणत्याही देशाचा किंवा धर्माचा असला, तरी योगाभ्यासावर सर्वांचा अधिकार आहे. स्वतःला उन्नत व ज्ञानपूर्ण बनविणे सर्व मानवांचे कर्तव्य आहे. ‘विद्’ म्हणजे जाणणे आणि ज्ञान मिळवून जीवन व्यतित करणे, या उद्देशाने सर्वच संसार पुन्हा वैदिक बनण्यात मानव जातीचे कल्याण आहे. दुर्दैवाने काही नामधारी योगी किंवा महात्मे आपण ‘कुंडलिनी’मुळे संपन्न झालो, असे सांगतात, पण ‘कुंडलिनी’ म्हणजे काय, याचे त्यांना स्वतःलाच ज्ञान नसते.
 
 
 
‘कुंडलिनी’ जागृतीमुळे जुना साधक पूर्णपणे नवीन बनतो. मूर्खाचा परम ज्ञानी, कुरूपाचा सुंदर, सावळ्या वर्णाच्या जागी सुवर्णकांती, मूढाचा ज्ञानी, कवन करता येत नसलेल्याला कवी आणि अरसिकाला कलाकार बनविणे हा ‘कुंडलिनी’ जागृतीचा पराक्रम आहे. म्हणूनच सारे खरे संत किंवा योगी हे ज्ञानी, विद्वान, कवी आणि कलाकार असतात. ते स्वरूपवान राहूनसुद्धा निरहंकारी असतात. अध्यात्मप्राप्तीकरिता अहंकार हा शाप असून नरकासमान आहे.
 
 
 
खरा साधक सर्वगुणसंपन्न असूनही अहंकारी नसतो. संस्कृतमध्ये एक म्हण आहे. ‘क्वचित् काणा भवेत् साधुः’ म्हणून खरे संत, योगी, हे कवी कलाकार, विद्वान सुस्वरूप असतात, जसे की, श्री ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, कबीर, तुलसीदास, मीराबाई, स्वामी विवेकानंद इत्यादी. जो सज्जन या जन्मात कुरूप, मूर्ख, अहंकारी, विषयासक्त, अकवी आणि अविवेकी असेल, त्याने साधना करून आपला उद्धार साधावा व पुढील जन्माची प्रतीक्षा करावी. गीतेत म्हटले आहे ‘शुचिनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभि जायते।’ 
 
-योगिराज हरकरे 
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)