‘कोविडवेत्त्या’ किशोरीताई!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Sep-2021   
Total Views |
kishori_1  H x
 
 
 
ज्याप्रमाणे भविष्यवेत्ते भविष्यातील बर्‍या-वाईट घटनांचे भाकीत वर्तवतात, त्याप्रमाणे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या मुंबईकरांसाठी जणू ‘कोविडवेत्त्या’च ठरल्या आहेत. आता किशोरीताई मुंबईसारख्या महानगराच्या महापौर आणि त्या ‘कोविड’ची सद्यस्थिती, पालिकेची याविषयीची तयारी वगैरे सांगतात म्हणून ही उपाधी नव्हे, तर काल-परवाच “मुंबईत तिसरी लाट येणार नाही, तर ती आधीच आली आहे,” असे धडधडीत असत्य विधान करून किशोरीताई मोकळ्या झाल्या.
 
 
 
महापौरपदावरील एक जबाबदारी व्यक्ती असाच विनाआधार इतका मोठा दावा करते म्हटल्यावर नेमकी ही लाट किशोरीताईंनाच कुठे, कशी अन् कधी दिसली, असा समस्त मुंबईकरांनाच प्रश्न पडला. का फक्त ही ‘कोविड’ची तिसरी अदृश्य लाट महापौरांनाच खासगीत दर्शन देते आणि मुंबईकरांना मात्र दिसतही नाही? असो. मग काय ही तिसरी लाट पालिकेतील अधिकारी, वैद्यकीय मंडळी आणि मुंबईकरही चौफेर शोधू लागल्यावर तिसर्‍या लाटेवर स्वार झालेल्या किशोरीताई एकाएकी किनार्‍यावर आल्या आणि आपल्या विधानावरून त्यांनी घुमजाव केले.
 
 
 
लहान बाळ झोपले नाही की, त्याला जशी गब्बरची भीती दाखविली जाते, तसाच काहीसा हा किशोरीताईंचा खोडसाळपणा! इतका की, मुंबईतील रुग्णसंख्या अवघी ३००-४००च्या घरात असतानाच, एकट्या किशोरीताईंनाच तिसर्‍या लाटेचा कपोलकल्पित तडाखा जाणवू लागला. गणेशोत्सव ऐन तोंडावर असताना गणरायाच्या आगमनापूर्वीच मुंबईत तिसर्‍या लाटेचे आगमन झाल्याची किशोरीताईंनी आवई उठवली. त्यांना कदाचित वाटले असावे, ज्याप्रमाणे पवार साहेबांनी नाही का मुंबईत १९९३ साली बारावा स्फोट ‘जनहितार्थ’ घडल्याचे छातीठोकपणे जाहीर केले, तर मग केवळ ३०० रुग्ण असताना मुंबईत कोरोनाची तिसरी लाट धडकली अशा वावड्या उठवल्या, तर त्यात गैर ते काय?
 
 
 
खरंतर मुंबईकरांना धीर देणे, त्यांना महामारीसंबंधी अचूक, नेमकी माहिती देणे हे महापौरांचे आद्यकर्तव्य. पण, एक कोटींहून अधिक मुंबईकरांचे लसीकरण झाल्यानंतर श्रेय लाटणारे पालिकेतील हेच सत्ताधारी ‘कोविड’चे आकडे, गर्दी वाढली रे वाढली की, पुन्हा मुंबईकरांमध्ये ‘कोविड’भय उत्पन्न करण्यातच धन्यता मानताना दिसतात. त्यामुळे गणरायाला यंदा हेच साकडे की, बाप्पा रे, यावर्षी या सत्ताधार्‍यांना सुबुद्धी दे, पण पुढील वर्षी सत्ताप्रसादापासून मुंबईहितासाठी या महाभागांना लांबच ठेव!
 
 
मुंबईवर निर्बंधांचे विघ्न...
 
  
महामारी म्हटले की, निर्बंध क्रमप्राप्तच. त्यात कोणाचे दुमत असण्याचे कारणही नाही. पण, या निर्बंधांचा राज्य सरकारने आणि मुंबई महानगरपालिकेने कोरोनाकाळात आजवर जो काही खेळखंडोबा केला, त्यामुळे मुंबईकरांच्या विघ्नांतच एकामागोमाग एक भरीस भर पडली. सार्वजनिक वाहतुकीपासून ते अगदी शाळा, उद्योगधंद्यांपर्यंत सर्वत्रच हा निर्बंधांचा ठाकरी घोळ प्रकर्षाने दिसून आला. पण, आपले कोविड निर्बंधांच्या बाबतीत सुरुवातीला काही निर्णय चुकले होते, आताही काही चुकतेय याचे पुसटसे भानही सत्ताधार्‍यांना, प्रशासनाला नाही.
 
 
 
कारण, तसे भान असते तर गणेशोत्सवाच्या निर्बंधांमध्ये मुंबई महानगरपालिकेने अटीशर्तींचा असा कळस केला नसता. मुंबई आणि गणेशोत्सवाचे अगदी अतूट नाते. पण, गेल्यावर्षीही मुंबईकरांनी उत्सवावर विरजण टाकून आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या आणि लसीकरणाची परिस्थितीही समाधानकारक असतानाही, पालिकेने निर्बंधांच्या माध्यमातून आडकाठीच केलेली दिसते. हे म्हणजे एकीकडे मदतीसाठी एक हात द्यायचा खरा, पण हाताच्या पाच बोटांऐवजी एकच बोट पुढे करायचे, अशी विचित्र गत.
 
 
 
कारण, गणेशोत्सवातही दोन डोस आणि ते घेऊन १४ दिवस झालेल्यांनाच आगमन-विसर्जनात सहभागी होता येईल आणि तेही कोणतीही मिरवणूक न काढता! यामध्ये सार्वजनिक मंडळाचे असे दहा कार्यकर्ते आणि घरगुती गणपती असल्यास पाच सदस्यांनाच एन्ट्री! पण, मुळात हाच प्रश्न उपस्थित होतो की, महानगरपालिका मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर आणि हजारो घरगुती गणपतीच्या आगमन-विसर्जनावर लक्ष ठेवणार तर कशी? विसर्जनस्थळी आलेल्या गणेशभक्तांना त्यांनी दोन डोस घेतल्याचा पुरावा दाखवल्यानंतरच विसर्जनाची परवानगी मिळणार का अन्यथा नाही? सार्वजनिक मंडळांत भक्तांना प्रवेश नाही, असे म्हणायचे, पण भक्तगण, सोसायटीतील मंडळी येता-जाता सहज मंडपात दर्शनही घेतील.
 
 
 
कारण, आता तसेही किती सोसाट्यांमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळले जाते म्हणा? असे एक ना अनेक प्रश्न पालिकेचे गणेशोत्सवावरील निर्बंध वाचल्यानंतर उपस्थित होतात. म्हणूनच नावापुरते असे तोंडदेखले निर्बंध जारी करायचे, पण त्याच्या अंमलबजावणीला फारसे गांभीर्याने घ्यायचेच नाही, असा हा सगळा सावळागोंधळ उत्सवाचा उरलासुरला उत्साह अन् गणेशभक्तांचा हिरमोड करणाराच म्हणावा लागेल.
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@