मुंबई : टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकले आणि तो रातोरात स्टार झाला. आता त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली असून जाहिरात क्षेत्रामध्ये त्याची किंमत ही हजार पटीने वाढली आहे. नीरज सोबत करार करणाऱ्या कंपन्यांनी त्याला १ हजार टक्के इतकी वाढ दिली आहे.
विराट कोहली हा सर्वाधिक 'ब्रँड व्हॅल्यु' असलेला क्रीडापटू. त्यानंतर आता नीरज चोप्रा हा त्याच्या जवळ पोहचला आहे, असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. टोकियो ऑलिम्पिक पूर्वी नीरजचे करार हे १५ ते २५ लाखांपर्यंत होते. आता मात्र, त्याचे करार मूल्य हे चक्क कोटींच्या घरात पोहचले आहे. विराट कोहलीचे करार मूल्य हे १ ते ५ कोटींच्या घरात आहे. नीरजने याबाबतीत रोहित शर्मा, के. एल. राहुलला मागे टाकले आहे. त्यांचे करार मूल्य सध्या ५० लाख ते १ कोटींच्या घरात आहे.
आगामी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ पर्यंत नीरज चोप्राचे हे करार असणार आहेत. तसेच, हे सर्व करार करताना त्याने तंबाखू, मद्य आदी गोष्टींच्या जाहिराती करण्यास नकार दिला आहे. सोशल मिडीयावर त्याचे चाहते वाढले आहेत. इन्स्टाग्रामवर त्याचे ४० लाख तर ट्विटवर ६ लाख फॉलोअर्स आहेत. सुवर्णपदक जिंकल्यानंतर इस्टाग्रामवर एका दिवसात त्याच्या फॉलोअर्सची संख्या ११ लाखाने वाढली होती.