‘नगरवासी -वनवासी, हम सब भारतवासी’ हे कल्याण आश्रमाचे जे सूत्र आहे ते सूत्र कमळाकर शारंगधर बेडेकर यांनी मुंबईत अक्षरश: प्रत्यक्षात उतरवून दाखवले. ते उत्तम प्रशासक व कर्तव्यकठोर तर होतेच; पण त्याहीपेक्षा अधिक ते कर्मठ कार्यकर्तादेखील होते. वनवासी बांधवांच्या विकासासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. त्यांनी २५ ऑगस्टला या जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांच्या स्मृती कायमच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहेत. त्या स्मृतींना प्रणाम!
मुंबई मधील संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि कल्याण आश्रमाचे केवळ मुंबईतीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील प्रमुख आधारस्तंभ असलेले कमळाकर शारंगधर बेडेकर म्हणजे सामान्य भासणारे; पण असामान्य कर्तृत्व असलेले एक समर्पित व संघटनशरण असे व्यक्तिमत्त्व होते. मुंबईसारख्या अवाढव्य महानगरात कल्याण आश्रमासारख्या एका सामाजिक संस्थेला समाजाने दखल घ्यावी, असे जे स्थान प्राप्त झाले, त्यामागे बेडेकर यांच्यासारख्या कल्पक कार्यकर्त्याचे खूप मोठे परिश्रम कारणीभूत होते. ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’मध्ये नोकरी करत असताना वनवासी बांधवांना, वनवासी कल्याण आश्रमाला विविध माध्यमातून साहाय्य करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘वनवासी मित्रमंडळा’चे बेडेकर हे प्रमुख संस्थापक होते. या माध्यमातून त्यांचा वनवासी जीवनाशी जो संपर्क आला, तो त्यांनी सतत वर्धिष्णू ठेवला आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत आपल्या वनवासी बांधवांच्या विकासासाठी ते सतत प्रयत्नरत राहिले, असे आपल्याला नक्की म्हणता येईल.
ठेंगणीशी व सडपातळ बांधा असलेली अशी प्रथमदर्शनी बेडेकरांची मूर्ती होती. सर्वसाधारण व सामान्य वाटावं असंच हे व्यक्तिमत्त्व होतं. पण, बेडेकर म्हणजे काय चीज आहे हे प्रत्यक्ष त्यांच्यासोबत काम केल्यानंतरच समजत असे. तरुण असताना प्रत्यक्ष संघकामात असेल किंवा दीर्घकाळ काम केलेल्या कल्याण आश्रमात असेल, जी तडफ, जो झपाटा त्यांच्या कामाचा होता त्यांनी तो अखेरपर्यंत टिकवून ठेवला हे विशेष. तब्येतीची सहज चौकशी केली तरी, “मला काय झाले, एकदम ठणठणीत आहे, मला अद्याप एकाही गोळीची आवश्यकता भासत नाही,” अशा प्रकारचे उत्तर हा पंच्याहत्तरी ओलांडलेला तरुण देत असे. मुळात तरुणांनाही लाजवेल, असा त्यांचा उत्साह, जोश, तडफ पाहिल्यानंतर तब्येतीची चौकशी करण्याचे धाडस आपण उगाच का केले, असा नंतर प्रश्न पडत असे.
बेडेकर यांचा झपाटा प्रथम अनुभवण्यास मिळाला तो ९३ साली किल्लारी येथे झालेल्या भूकंपाच्या वेळी. कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय संघटनमंत्री भास्करराव कळंबी यांच्या पंच्याहत्तरीचा कार्यक्रम नुकताच मुंबईत संपन्न झाला होता. त्यानिमित्ताने कल्याण आश्रमाला पूर्वांचलातील कामासाठी दोन जीप देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच किल्लारी भूकंप झाल्याने भास्कररावांनी त्या गाड्या तशाच भूकंपग्रस्त भागातील मदतकार्यासाठी पाठवल्या होत्या. त्या गाड्या घेऊन बेडेकर व अन्य कार्यकर्ते लातूर येथे आले होते. त्यावेळी आमची प्रथमच ओळख झाली. भूकंपग्रस्त भागात पुढचे आठ-दहा दिवस बेडेकर व अन्य मंडळींनी ज्या तडफेने मदतकार्य केले, त्याला खरोखरच तोड नव्हती. मदतकार्य संपल्यानंतर जेव्हा मुंबईला परत जाण्याची वेळ आली, तेव्हा काही गावांमधील लोकांच्या डोळ्यात निरोप देताना अक्षरशः अश्रू आले होते. स्वयंसेवक या नात्याने केलेल्या मदतकार्यातून बेडेकरांनी आपल्या निःस्वार्थ सेवेचा खोलवर ठसा भूकंपग्रस्त ग्रामस्थांच्या मनात निर्माण केला होता.
साधारण १९९७ नंतर बेडेकर प्रत्यक्ष मुंबईतील कल्याण आश्रमाच्या कामात जबाबदारी घेऊन काम करू लागले. मुंबईमध्ये कल्याण आश्रमाला विशेष स्थान निर्माण करून देण्यात ज्या प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश करता येईल, त्यात कमळाकर बेडेकर हे अग्रस्थानी होते. ‘नगरवासी -वनवासी, हम सब भारतवासी’ हे कल्याण आश्रमाचे जे सूत्र आहे ते सूत्र बेडेकरांनी मुंबईत अक्षरश: प्रत्यक्षात उतरवून दाखवले. वनवासीक्षेत्रासाठी केवळ साहाय्य किंवा मदत देणारे न होता, या कामात लोकांनी प्रत्यक्ष सहभागी व्हावे, यासाठी झपाटल्यागत त्यांनी काम केले. कॅलेंडर प्रकाशन असेल, ‘आंबेसरी’सारखा ग्रामविकासाचा प्रकल्प असेल, माणगावची आश्रमशाळा असेल किंवा केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशाच्या अन्य भागात कल्याण आश्रमासाठी लागणारे साहाय्य उपलब्ध करून देणे असेल, यासाठी बेडेकरांनी जी मेहनत घेतली, त्याला खरोखरच तोड नाही.
सामाजिक संस्थेसाठी पैसा मागणे ही कार्यकर्त्यांच्या दृष्टीने सर्वात अवघड गोष्ट समजली जाते. पण, बेडेकर बिनधास्तपणे कितीही मोठी व्यक्ती, संस्था असेल तरी मोठमोठ्या देणग्या मागण्यास बिलकूल अडखळत नसत. सामाजिक कामासाठी जो पैसा देतो तोच आपल्या कामाचा, असे त्यांचे एक अजब तत्त्वज्ञान होते. आपण आपल्या घरासाठी नाही, तर समाजासाठी पैसा मागत आहोत, त्याच्यामुळे लाज कशाला बाळगायची? असे त्यांचे सहज सांगणे असे. बेडेकरांची तळमळ, त्यांची निःस्पृहता सर्वांना ठाऊक असल्याने धनाढ्य व्यापारी, उद्योगपतीही त्यांच्या पुढे सतत नम्र होत असत. रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील कल्याण आश्रमाच्या शाळेचे बदललेले रूप व त्यासाठी वापरण्यात आलेली वीट अन् वीट बेडेकरांनी या शाळेसाठी घेतलेल्या परिश्रमाची साक्षीदार आहे.
या शाळेसाठी त्यांनी प्रचंड आर्थिक मदत गोळा केली, असंख्य लोकांना शाळा दाखवण्यासाठी ते घेऊन आले व सामाजिक कार्यासाठी त्यांच्यातील प्रेरणा जागृत केली. माणगावला शाळा दाखवण्यासाठी ते जेवढ्या व्यक्तींना घेऊन येत असत, त्या सगळ्यांना एक तर कार्यकर्ता बनवत किंवा देणगीदार तर नक्की बनवत असत.बेडेकर मुंबई महानगराचे प्रदीर्घ काळ सचिव होते. तसेच माणगाव येथील शिक्षण संकुल असेल किंवा मालाड येथील ‘उत्कर्ष शिक्षण संस्था’ असेल या संस्थेचेही ते पदाधिकारी होते. मात्र, या पदाचा मोठेपणा त्यांनी आपल्या कामाच्या आड कधीही येऊ दिला नाही. बर्याच वर्षांपूर्वी पेण तालुक्यातील काही कातकरी महिलांची सहल मुंबई येथे नेली होती. त्यावेळी सर्व मोठेपण विसरून जेवण वाढण्यापासून ते जेवण झाल्यानंतर फरशी पुसण्यासारखी छोटी कामे त्यांनी ज्या सहजतेने केली, ती पाहिल्यानंतर त्यांच्यातील सेवाभावी कार्यकर्त्यांचे खूपच जवळून दर्शन झाले.
बेडेकरांमध्ये एक सहजपणे दिसणारी व जाणवणारी निरागसता होती. त्याच्यामुळे ते कितीही कठोरपणे बोलले तरी त्याचे फार वाईट वाटत नसे. शाळेतील कर्मचारी-कार्यकर्ता असा बर्याच वेळेस संघर्ष व्हायचा. या संघर्षात त्यांच्यासोबत खडाजंगी होण्याचे व खटके उडण्याचे बरेच प्रसंग निर्माण झाले. त्या त्या वेळी या विषयातली कठोर मते त्यांनी व्यक्त केली व प्रत्यक्षात आणलीदेखील. पण, या सगळ्यात कार्यकर्त्यांमध्ये कटुता निर्माण होणार नाही, याचीदेखील त्यांनी काळजी घेतली. पूर्णवेळ कार्यकर्ता किंवा प्रचारक या व्यवस्थेबद्दल त्यांच्या मनात प्रचंड श्रद्धेची भावना होती. आम्ही खूप सामान्य कार्यकर्ते आहोत. पण, तुम्ही पूर्णवेळ कार्यकर्ते, प्रत्यक्ष समाजामध्ये जाऊन काम करणारे, लढणारे कार्यकर्ते आहात, त्यामुळे तुम्हाला रसद कमी पडणार नाही, याची जबाबदारी आम्हा शहरातील कार्यकर्त्यांची आहे, असा त्यांचा कायम भाव होता.
त्यामुळे या व्यवस्थेबाबत कुठेही चुकीचा संदेश जाणार नाही, यासाठी ते प्रचंड काळजी घेत. ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ असा आश्वासक हात ते कायम पूर्णवेळ कार्यकर्त्यांच्या पाठीवरून फिरवत राहिले.संस्था चालविण्याचा प्रदीर्घ अनुभव असल्याने बेडेकर एक उत्तम प्रशासक व कर्तव्यकठोर व्यक्तिमत्त्व होतेच; पण त्याहीपेक्षा अधिक ते कर्मठ कार्यकर्तादेखील होते. शाळेची केवळ इमारतच नाही, तर तिथे काम करत असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांची, कर्मचार्यांची मनःस्थिती निकोप ठेवण्यासाठीही त्यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थाचालक आणि कार्यकर्ता या दोन भूमिकांमध्ये त्यांनी कधी गल्लत होऊ दिली नाही.संस्थेची आवश्यकता म्हणून शाळेतील कर्मचार्यांना कठोरपणे बोलल्यानंतर दुसर्याच क्षणी त्याच्या पाठीवर हात फिरवत सहजपणे चहासाठी त्याच्या घरी जाण्यात त्यांनी कधीही कमीपणा मानला नाही.
त्यांनी कल्याण आश्रम किंवा शिक्षण संस्थांमध्ये विविध पदे भूषविली. पण, आपल्यातील ‘कार्यकर्ता’ या भावनेला त्यांनी कधीच उणेपण येऊ दिले नाही. तब्बल १६ वर्षे अहोरात्र खपून त्यांनी माणगावच्या शाळेचे देखनणेपण समाजासमोर उभे केले. एवढे सगळे करूनही प्रकृतीच्या कारणास्तव या सर्व जबाबदारीपासून ते सहजपणे बाजूला झाले. ज्या सहजपणे सर्व जबाबदारीपासून ते बाजूला झाले, तेवढ्याच सहजपणे त्यांनी २५ ऑगस्टला या जगाचादेखील निरोप घेतला. एकूणच कल्याण आश्रमाच्या महाराष्ट्रातील गेल्या २५ पेक्षा अधिक वर्षांच्या कामाचे बेडेकर एक प्रमुख मार्गदर्शक होते. निरपेक्ष, निर्लेप, प्रामाणिक व समर्पणशील व्यक्तींच्या बळावर कुठलीही सामाजिक संस्था चालत असते. कमळाकर शारंगधर बेडेकर हे अशाच व्यक्तींच्या मालिकेतील अग्रस्थानी असणारे एक नाव होते. त्यांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली!
- महेश काळे