उद्योगवर्धिनी मुंगी उडाली आकाशी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2021   
Total Views |
 udyog_1  H x W:
 
 
 
‘उद्योगवर्धिनी’तर्फे दिनांक ४ आणि ५ रोजी सर्वेश हॉल डोंबिवली येथे ग्राहकपेठ आणि खाद्यमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या सगळ्याचे श्रेय भावना आंबेटकर व वैदेही बागुल आणि अद्वैत बापट या तिघांना जाते. कल्याण-डोंबिवली परिसरातील ३१ उद्योजिकांनी या मेळाव्यात सहभाग घेतला होता. या मेळाव्याचे अंतरंग उलगडणे हासुद्धा एक सुखद अनुभव. तो अनुभव मांडण्याचा केलेला प्रयत्न.....
 
 
खुट्टण मिर्ची जाशील कैसी?’ असा पारंपरिक प्रश्न प्रसिद्ध आहेच. पण, ‘उद्योगवर्धिनी’च्या ग्राहकपेठ आणि खाद्यमेळाव्यात उपस्थित उद्योजिका आणि त्यांच्या सासर-माहेरच्या महिला, त्यांचे एकमेकींशी असलेला स्नेह, सहकार्य पाहिले. वाटले की, अगदी मागच्या पिढ्यांपर्यंत संयुक्त कुटुंबात महिलांचे एकमेकींशी जे आपुलकीचे स्नेहाचे नाते होते ते आजही आहे. इथे जमलेल्या सगळ्याच उद्योगिनी या नवउद्योजिका आणि गृहिणी. प्रत्येकीसोबत सासूबाई, नणंद, जाऊ, वहिनी मदतीला आलेल्या. तिथे ‘उद्योगवर्धिनी’ आणि ‘स्वयंम महिलामंडळा’ने यापैकी काही जणींचा प्रातिनिधिक स्वरूपात परिसंवादही आयोजित केला होता. त्यात या उद्योजिकांनी यशाचे श्रेय माहेरपेक्षा, स्वतःपेक्षाही सासरच्यांना दिलेले. काय होणार कुटुंब संस्थेचे? असा प्रश्न अधूनमधून विचारला जातो. पण, या उद्योजिकांच्या परिसंवादाने या प्रश्नाचे उत्तर दिले की, संयुक्त कुटुंब आजही व्यक्तीच्या प्रगतीच्या मार्गाला पूरक आहे.
 
 
 
असो, गृहिणी ते उद्योजिका होण्याचा प्रत्येकीचा प्रवास कसा होता? तर इथे कुणाच्या घरी ‘लॉकडाऊन’मुळे घरचा कर्ता पुरुष घरी बसलेला, कुणाची चांगली नोकरी सुटलेली, तर कुणा मायमाऊलीच्या दिव्यांग मुलाचा आत्मविश्वास कायम ठेवणारा आर्थिक उत्पन्नाचा मार्ग ‘लॉकडाऊन’मुळे खुंटलेला. समोर आर्थिक विषण्णतेचा अंधारच होता. मात्र, या अंधारावर मात करत या महिलाशक्तींनी स्वकर्तृत्वाची झेप घेतली. हे चित्र ‘उद्योगवर्धिनी’च्या ग्राहकपेठेत सर्वत्र दिसत होते.इथे ज्यांनी खाद्यपदार्थांचे किवा इतरही स्टॉल लावले होते त्या कोण होत्या? तर या होत्या सर्वसाधारण घरातील महिलाशक्ती. केवळ परिस्थिती पालटावी, आपल्या कुटुंबाचे उत्पन्न वाढवावे, ‘लॉकडाऊन’मुळे आपले घरटे उद्ध्वस्त होऊ नये म्हणून या गृहिणींनी सुरू केलेला उद्योग-व्यवसाय समाजात चांगलाच स्थिर झाला. गाव, शहर, राज्य आणि अगदी देशाच्या सीमा लांघत या महिलांनी सुरू केलेल्या उत्पादनांनी आपली यशाची चढती कमान राखली. तसे पाहायला गेले तर आपण पाहत असतो की, कित्येक स्पर्धांमध्ये उद्योगिनी, यशस्विनी म्हणून महिलांचा सत्कार होतो.
 
 
 
ते स्त्युत्यच आहे. मात्र, या उद्योगिनी कुणा उद्योगपती किंवा प्रथितयश नेत्याच्या पत्नी, लेकी, सुना किंवा नगरसेवक, आमदार, खासदार वगैरे वगैरे असलेल्या दिसतात. या सगळ्या जणींच्या कर्तृत्वाचा आदर आहेच. पण, वैयक्तिक संघर्ष आणि समाजकारणात या सगळ्या महिलांसोबतच खर्‍या यशाच्या मानकरी आहेत त्या या छोट्या उद्योजिका. कदाचित, या महिला उद्योजिकांचे उत्पन्न केवळ त्यांच्या घरचा जमाखर्च सांभाळत असेल. पण, शून्यातून त्यांनी घेतलेली भरारी ही खूप मौल्यवान आहे. आपण उडू शकतो आणि पंखं नसले, असले तरीसुद्धा... ही जी प्रेरणा आहे ती अमूल्य आहे. नेमके हेच चित्र ‘उद्योगवर्धिनी’च्या मेळाव्यात दिसत होते.या मेळाव्यात एकाच प्रकारच्या उत्पादनांचे केवळ दोन स्टॉल लावायचे, हा ‘उद्योगवर्धिनी’च्या भावना आंबेटकर यांचा निर्णय. कारण, त्यामुळे मेळाव्यात स्टॉल लावलेल्या उत्पादकांच्या वस्तूविक्रीला योग्य न्याय मिळेल, असा वास्तविक हिशोब. त्यानुसार इथे घरगुती खाद्य उत्पादनांचे स्टॉल, त्यावर वेगवगळी भाजणीची पिठं, लोणची, मुरांबा यामध्ये वैविध्य. संस्कृती उत्पादनांचा स्टॉल पाहून मात्र विशेष वाटले. अननसाचा मुरंबा, थालीपिठाची भाजणी, कोथिंबीर वडीचे पिठ, लोणची आणि त्यातही उपवासाचे लोणचे..
 
 
 
सगळेच पदार्थ अप्रतिम.पलीकडेही असाच एक स्टॉल. जिथे गुळ-वेलची घातलेला ताजा खरवस मिळत होता. एक स्टॉल तर केवळ आवळा या विषयाला वाहिलेला. सगळेच पदार्थ आवळ्याचे. आकर्षक साबण, फेसवॉश, शॅम्पू, स्क्रब यांचेही दोन स्टॉल. या स्टॉलवरचे साबण, त्यांचा रंग आणि सुवास पाहून कुणालाही वाटेल की साबणच आहेत ना? साबण आणि स्क्रबचा स्टॉल लावणार्‍या उद्योजिकेला पाहून आश्चर्य वाटले, कारण होते तिचे वय. वय वर्षे होते १५. तर दुसरा साबण आणि स्क्रबचा स्टॉल होता एका दिव्यांग पुत्राच्या मातेचा. आपल्या मुलाने सतत कार्यमग्न राहावे, स्वावलंबी व्हावे म्हणून तिने मुलाला हे प्रशिक्षण दिलेले. त्याच्याकडून हे साबण आणि स्क्रब तयार करून घेतलेले. हे साबण आणि स्क्रब तर बाजारातील नामांकित साबणांच्याही तोडीस तोड होते. खाद्यपदार्थांचे स्टॉलही होते. त्यात लाडवांचा, आम्रखंडाचा आणि पेढ्यांचा स्टॉल विशेष. काका-काकी आणि त्यांचा सुपुत्र त्या स्टॉलवर होते.
 
 
 
काका-काकी आणि त्यांचा सुपुत्र तिघे जण मिळून हा व्यवसाय चालवतात. या लाडू आणि आम्रखंड-श्रीखंडाशिवाय कल्याण आणि डोंबिवलीमधील बहुतेकांचा सण साजरा होत नाही, यातच या उत्पादनांचे महत्त्व कळू शकते. काही स्टॉल कृत्रिम मोत्यांच्या दागदागिन्यांचेही होते. खास मराठमोळ्या पद्धतीचे अलंकार. पाहताक्षणीच कुणाही स्त्रीचे डोळे, मन आणि पाय जागच्या जागी थबकतील, असे अलंकार. देवाची वस्त्रे, माळा, रोषणाई, सजावट यांच्या सामानाचाही स्टॉल होताच. या मेळाव्यात धारावीची उद्योजिकाही सामील झाली होती. तिच्या वडिलांचा चामड्याच्या वस्तू बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय. ती उच्चशिक्षित. ‘लॉकडाऊन’मध्ये नोकरी सुटली. मग ती या पारंपरिक व्यवसायाकडे वळली. धारावीमध्ये तिचा आता चामड्याच्या वस्तू जसे बॅग, पट्टा वगैरे विक्रीचा व्यवसाय आहे. इथे उंदीर, झुरळ, डास, मारण्यासाठीचे औषध, तसेच कपड्यावरील, फर्निचरवरील डाग घालवण्यासाठीचे उत्पादन विकणाराही एक स्टॉल होता.
 
 
 
‘हर्बल प्रोडक्ट’ असल्यामुळे आणि त्या स्टॉलवर माहिती देणार्‍या महिला अत्यंत कुशलतेने माहिती देत असल्याने या स्टॉलवर गर्दी होती. एक महिला ते १५० रुपयाचे प्रोडक्ट घ्यायलाही तयार झाली. ती महिला पैसे देणार इतक्यात स्टॉलवरची महिला म्हणाली, “तुमच्या कपड्याला कसले डाग आहेत?” समोरची महिला म्हणाली, “दुसर्‍या कपड्याचा रंग लागला आहे.” यावर स्टॉलवाली महिला म्हणाली, “मग आमचे प्रोडक्ट त्यासाठी नाही. तुम्ही इतके पैसे घेऊन प्रोडक्ट घ्याल आणि उद्या डाग निघाले नाही, तर प्रोडक्टबद्दल तुमच्या मनात शंका निर्माण होईल.” असे सांगून तिने आपले प्रोडक्ट कोणते कोणते डाग काढते हे सप्रमाण दाखवले. इतकेच नाही तर ते डाग कसे जातील, याचा घरगुती उपायही तिने सांगितला. कसेही करून आपले प्रोडक्ट विकायचेच, अशी मानसिकता असलेले लोक आपण पाहतो. त्यापार्श्वभूमीवर या स्टॉलवरचे दृश्य वेगळे होते. हा प्रसंग यासाठी की, व्यवसायातील सचोटी प्रामाणिकता आणि विश्वासार्हता छोट्या-छोट्या गोष्टीतून इथे व्यक्त होते. याच स्टॉलवर का?
 
 
 
सगळ्याच स्टॉलवर. अतिशयोक्ती किंवा अव्वाच्या सव्वा खोटे बोलून आपले उत्पादन ग्राहकांच्या माथी मारण्याचा कुणीही प्रयत्न करत नव्हते. बाजूच्या स्टॉलवर गर्दी आहे, त्या गर्दीने आपल्याकडे वळावे, यासाठी कुणीही बेशिस्तपणा, आगाऊपणा करत नव्हते. उलट काही ठिकाणी असेही दृश्य होते की, ग्राहकाने कसल्या उत्पादनाची विचारणा करावी आणि स्टॉलधारक महिला सांगताना दिसली की, “तुम्हाला जसे प्रोडक्ट हवे ते आमच्याकडे नाही, बाजूच्या स्टॉलवर मिळेल.” तसेच काही कामानिमित्त एखाद्या स्टॉलवर कुणी प्रतिनिधी नसला आणि तिथे ग्राहक आले, तर बाजूच्या स्टॉलवरील महिला या स्टॉलच्या उत्पादनाची माहिती देतानाही दिसली.
 
 
 
महिलांमध्ये उपजत असलेला कुटुंब वत्सलपणा, एकमेकांना सांभाळून घ्यायची वृत्ती इथे सहज दिसत होती. काहीही असो. प्रचंड नकारात्मक परिस्थितीमध्ये केवळ आत्मविश्वासाच्या जोरावर गृहउद्योग सुरू करून उद्योजिका म्हणून यशस्वी झालेल्या या उद्योजिका म्हणजे ‘मुंगी उडाली आकाशी...’."भारतीय संस्कृती आणि संस्कार हे ‘उद्योवर्धिनी’च्या ग्राहकपेठेत असावे हा निकष होताच. मोठ्या कष्टाने उद्योग-व्यवसायात उतरलेल्या महिलांची कोरोना ‘लॉकडाऊन’मुळे पीछेहाट झाली. त्यांची उमेद संपू नये, त्यांच्यातली जिद्द आणि उद्योजिकता कायम राहावी म्हणून हा ग्राहकपेठ मेळावा आयोजित केला."
- भावना आंबेटकर
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@