गणपती बाप्पा मोरया! मोदी एक्स्प्रेसने चाकरमानी कोकणात रवाना

गणपती बाप्पा मोरया! मोदी एक्स्प्रेसने चाकरमानी कोकणात रवाना

    07-Sep-2021
Total Views |

MahaMTB _1  H x


मुंबई : आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नाने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत रेल्वे प्रवासाची सोय करणारी मोदी एक्सप्रेस दादरहून कोकणात जाण्यासाठी रवाना झाली. गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत आणि टाळ मृदुंग वाजवत चाकरमानी गणेशोत्सावासाठी निघाले. दादर रेल्वे स्थानकाहून मोदी एक्सप्रेसला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा कंदिल दाखविला.


नितेश राणे यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आलेल्या या मोदी एक्सप्रेसमधून एकूण १८०० प्रवासी कोकणात गणेशोत्सवासाठी रवाना झाले. भाजप आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून मोदी एक्सप्रेस सोडण्यात आली. गेल्या वर्षी चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाता आले नव्हते. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी चाकरमान्यांना एक्सप्रेसची खास व्यवस्था केली होती.
मंगळवारी सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी या एक्सप्रेसला रावसाहेब दानवे यांनी हिरवा कंदिल दाखवला. यावेळी चाकरमान्यांनी एकच जल्लोष केला. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करतानाच टाळ मृदुंग वाजवत चाकरमानी कोकणाच्या दिशेने रवाना झाले. यावेळी चाकरमान्यांनी गणपतीची आरतीही घेतली. ही स्पेशल एक्सप्रेस काही खास स्टेशन घेऊन कोकणात दाखल होणार आहे.
 
दादर ते वैभववाडी करून सावंतवाडीत ही ट्रेन थांबणार आहे. १८ डब्यांची ही गाडी असून अठराशे प्रवासी एक्सप्रेसमधून जात आहेत. त्यांच्या एकवेळचे जेवणही देण्यात आले आहे, अशाप्रकारे ही सोय पहिल्यांदाच झाली आहे. रावसाहेब दानवे यांनी मोदी एक्सप्रेसमध्ये येऊन प्रवाशांची चौकशी केली तसेच तुम्ही कुठून आलात? कुठे जाणार आहात? किती दिवस कोकणात राहणार आहात? तुमच्यासोबत कुटुंबातील कोण कोण आहेत? तुमची प्रकृती चांगली आहे ना?, अशी विचारपूस करतानाच प्रवास करताना आणि कोकणात गेल्यावरही कोरोना नियमांचे पालन करा, मास्क लावूनच घराबाहेर पडा, अशा सूचनाही त्यांनी प्रवाशांना दिल्या.