मुंबई : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रजत बेदीने चारचाकीने एका व्यक्तीला धडक दिली. या व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली येत आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 'जानी दुश्मन', 'कोई मिल गया' सारख्या चित्रपटामध्ये त्याने नकारात्मक भूमिका साकारल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता रजत बेदीने सोमवारी अंधेरी येथील डी.एन नगर ६.३० च्या दरम्यान एका व्यक्तीला धडक दिली. यावेळी चार्चाकीला धडकून ती व्यक्ती गंभीर जखमी झाली होती. मात्र, रजतने प्रसंगवधान राखत त्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर कुपर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्या व्यक्तीच्या कुटुंबाने सांगितल्यानुसार, रजत बेदीने तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले. तसेच, मदत करण्याचे आश्वासनही त्याच्याकडून देण्यात आले आहे. तसेच, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच या प्रकरणी रजत बेदीवर गुन्हा दाखल करण्यात आला. डीएन नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.