पायघड्या, अंतरपाट आणि बरेच काही...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2021   
Total Views |

Madhura Jog_1  
 
 
कलेची हौस असणे आणि या कलात्मक दृष्टीतून आपल्या व्यवसायाला नवी उंची देणे, हे सगळ्यांनाच जमते असे नाही. पण, मधुरा जोग यांनी स्वकर्तृत्वाने हे सिद्ध केले. त्यांच्या या प्रवासाचा घेतलेला मागोवा...
लग्नात नवर्‍या मुलाचे औक्षण करायचे आहे? त्याचे स्वागत करण्यासाठी पायघड्या घालण्याची हौस आहे? मग हॉल आणि त्यातही वराच्या वेशभूषेला साजेशा पायघड्या मिळाल्या तर? वधूवरामध्ये विवाहाच्या वेळी अंतरपाट धरतो. पण, आंतरपाटावरील चित्र कलात्मक आणि सुखद असेल तर? वधूने ओलांडायचे मापही कलात्मक असेल तर, डोहाळे जेवणाची वाडीही आकर्षक असेल तर? असा विचारही कुणाच्या मनात सहसा येत नसेल. पण, मधुरा जोग यांच्या मनात तो विचार आला. नुसता विचार येऊन थांबला नाही, तर त्यांनी या सगळ्या वस्तू पुरवण्याचा व्यवसायही सुरू केला. तसा त्यांचे ‘वैभव जनरल स्टोअर्स’ हे दुकान पर्सेससाठी प्रसिद्ध. वारली पेंटिंग केलेल्या आकर्षक रंगसंगतीच्या आणि कलात्मक पर्सेेस घ्यायला लोक दुरून दुरून त्यांच्या या दुकानात येतात. ज्या महिलांना स्वयंरोजगार करायचा आहे, त्या महिलांना मधुरा मार्गदर्शनही करतात. काही महिलांकडून पर्सेस बनवूनही घेतात. मधुरा यांचे ‘रेशीमगाठी’ हे ‘वधूवर सूचक मंडळ’ही आहे.
 
 
 
विशेष म्हणजे, ‘लॉकडाऊन’च्या काळात त्यांनीही मंडळ स्थापन केले. ‘लॉकडाऊन’मुळे विवाह सोहळ्यांचे स्वरूपही पालटले. त्यातच विवाह जुळणेही कठीण होऊन बसले. पण, कामानिमित्त मधुरा यांचा समाजात सर्वत्रच वावर. त्यामुळे केवळ ब्राह्मण वधूवरांसाठी त्यांनी ‘रेशीमगाठी वधूवर सूचक मंडळ’ काढले. जानेवारी २०२१ पासून आजपर्यंत त्यांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पाच वधूवर मेळावे घेतले. हे मेळावे ‘ऑनलाईन’ होते बरं का? ज्यांनी वधूवर मेळावे पाहिलेत त्यांना कल्पना येऊ शकते की, हे किती कठीण काम आहे. इच्छुक वधूवरांची माहिती गोळा करणे, त्याची सत्यता तपासणे आणि त्यांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणे महाकठीण काम. पण, मधुरा आणि सहकार्‍यांनी ‘योगिनी’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून हे मेळावे यशस्वी केले. त्यातून काही विवाह जमले आणि सध्या संसार चांगला सुरूही आहे. तर मुद्दा असा की, एक महिला पर्सेस, अंतरपाट आणि पायघड्या वगैरेच्या व्यवसायात मोठ्या आत्मविश्वासाने वावरते.
 
 
 
सामाजिक कार्य करते, महिलांनी आर्थिक क्षेत्रात स्वावलंबी व्हावे यासाठी प्रयत्न करते, इतकेच काय स्वजातीचे ‘वधू-वर सूचक मंडळ’ काढते आणि त्यातही यश मिळवते. हे दिसायला सोपे आहे. मात्र, त्यामागची कहाणी मोठी आहे. ‘पी हळद आणि हो गोरी’ असे नसते. मधुरा यांच्या कष्टापाठी, जिद्दीने मिळवलेल्या यशामागे, त्यांच्या कौटुंबिक संस्कारांचा मोठा वाटा आहे.कल्याणचे अरुण देवधर आणि सविता देवधर पापभिरू दाम्पत्य. कष्टाला पर्याय नाही. मात्र, हौसेलाही मोल नाही, असे मानणारे हे दोघे जण. त्यांना दोन अपत्य. त्यापैकी एक मधुरा. अरुण रेल्वेत कामाला; मात्र त्यांना कलेची, संशोधनाची सर्जनशीलतेची आवड होती हे नक्की. त्यातच एकदा अरुण यांच्या मित्राने नव्यानेच घेतलेल्या सोफासेटचे ‘रेक्झिन कव्हर’ बदलले. अरुण यांची शिवणाची आवड त्या मित्रालाही माहिती होती.
 
 
 
त्याने ते कव्हर अरुण यांना दिले. अरुण यांनी त्या ‘रेक्झिन कव्हर’च्या शाळेच्या बॅग शिवल्या. मधुरा आणि त्यांचा भाऊ या बॅग शाळेतही घेऊन गेले. मात्र, या बॅग पाहून त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी त्यांच्या त्यांच्या आईबाबांकडे हट्ट केला की, आम्हालाही अशा बॅग पाहिजेत. त्यातूनच मग अरुण यांच्याकडे या बॅगसंदर्भातली विचारणा होऊ लागली. त्यातून अरुण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अशा बॅग बनवण्याचा व्यवसायच सुरू केला. या बॅगना चांगली मागणी येऊ लागली. मधुरा यांनी हा प्रवास जवळून पहिलेला. त्यांच्यातही कलेची आवड उपजतच निर्माण झाली. मधुरा यांनी ‘बीकॉम’पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ‘आयटीआय’मधून ‘ड्रेसमेकिंग’चा कोर्स केला. कोर्स केल्यानंतर दोन वर्षांत ४००च्या वर पंजाबी डे्रस शिवले. याच काळात त्यांचा विवाह संजीव जोग यांच्याशी झाला. एकत्र कुटुंबपद्धतीत संसार सुरळीत सुरू होता.
 
 
 
मधुरा यांना मुलगा झाला. २००९ साली संजीव यांची कंपनी बंद पडली. नोकरी गेली. अर्थार्जनाचा यक्षप्रश्न समोर होता. अशावेळी मधुरा यांनी पती संजीवसोबत त्यांनी पर्सेस, दुपटी, ओटी भरणी साहित्य, विशेष प्रसंगी वापरला जाणारा नोटांचा हार बनवणे वगैरेचा व्यवसाय सुरू केला. आपणही विविध पर्सेस शिवायच्या, असे त्यांनी ठरवले. मात्र, त्याच काळात मधुरा आजारी पडल्या, गर्भाशयाच्या पिशवीची शस्त्रक्रिया करावी लागली. ‘दुष्काळात तेरावा महिना’ असेच ते दिवस. पण, मधुरा यांनी हिंमत हारली नाही. उपचार करून त्या बर्‍या झाल्या आणि पुन्हा नव्याने कामाला लागल्या. आपल्या व्यवसायाचा आर्थिक ताळेबंद चांगलाच जमवला. आज सकाळी तीन तास आणि संध्याकाळी तीन तास, असे दिवसाचे सहा तास त्या आपल्या व्यवसायाला देतात. उरलेला वेळ कुटुंब तसेच सामाजिक कार्याला देतात.
 
 
 
हे सगळे करताना दररोज नवनवी आव्हानं येतात. पण, काही झाले तरी आपल्या व्यवसायात आपण कधीही माघार घ्यायची नाही हे ध्येय त्यांनी ठरवलेलेच. मधुरा म्हणतात, “आपली समाजसंस्कृती आदर्श आहे. प्रत्येक सण-उत्सवात अर्थार्जनाची मोठी संधी आहे. या संधीचा उपयोग करत येणार्‍या काळात समाजात आणखी उद्योगिनी निर्माण व्हाव्यात, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. सण-उत्सव यामध्ये खर्‍या अर्थाने महत्त्वाची भूमिका असते ती घरच्या महिलांची. या सण-उत्सवांतील अर्थकारण समजून घेत महिला या क्षेत्रात स्वयंरोजगार मिळवू शकतात.” अर्थात, मुधरा यांचे विचार समाजातील प्रत्येक महिलेला प्रेरणा देतात, हे नक्कीच!
 
 
@@AUTHORINFO_V1@@