नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नुकतेच आगामी टी - २० विश्वचषक स्पर्धेसाठी संघ जाहीर केला. यानंतर अवघ्या काही तासांमध्येच मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांना पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेटमधला अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. याबद्दल पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने टीका केली असून आता मोहम्मद आमिरनेदेखील निवृत्ती मागे घेतल्याच घोषित केले आहे.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने या दोघांच्या निवृत्तीनंतर टीका करताना म्हणाला की, "मला वाटते की मिसबाह आणि वकार यांचा राजीनामा पाहून तालिबान्यांनी जे अमेरिकेसोबत केले तेच यांच्याबाबतीत झाले आहे. त्यांना माहीत होते, की रमीज राजा त्यांना सोडणार नाही म्हणून त्यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निर्णयाची वाट बघायला हवी होती. काहीतरी मोठे घडले असले, पण रमीज राजाने त्यांना काढले नसते. दोघेही घाबरून पळून गेल्यावर आता प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत."
मिसबाह आणि वकार राजीनामा देताच अमीरने निवृत्ती घेतली मागे
मिसबाह-उल-हक आणि वकार युनुसने राजीनामा दिल्यानंतर त्यांचा जलदगती गोलंदाज मोहम्मद अमीरनेदेखील निवृत्ती मागे घेतली असल्याचे जाहीर केले. जानेवारी महिन्यामध्ये त्याने आपली निवृत्ती जाहीर केली होती. मिसबाह आणि वकारशी वाद असल्याने हा निर्णय घेतला होता. मात्र, आता त्याने पुन्हा एकदा उपलब्ध असल्याचे जाहीर केले आहे. त्याने केलेले आरोप दोघांनीही फेटाळून लावले होते. आमिरला वैयक्तिकरित्या लक्ष्य केले नाही, कामगिरीच्या आधारावर त्याला विश्रांती देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते.