‘दि मॉर्निंग कन्सल्ट’ला काय कळते?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Sep-2021   
Total Views |

MODI_1  H x W:





काय म्हणता ‘दि मॉर्निंग कन्सल्ट’च्या सर्वेक्षणानुसार जगभरातल्या सगळ्यात शक्तिशाली नेत्यांमधूनही मोदी जगातले सगळ्यात प्रथम क्रमांकावरचे लोकप्रिय नेते आहेत? नाही! नाही!! ते सर्वेक्षण काहीही म्हणू दे. जोपर्यंत मी त्यांची मुलाखत घेत नाही तोपर्यंत ते लोकप्रिय होऊच शकत नाहीत. तुम्ही मुलाखती वाचल्या नाहीत? नसतील, तर तुम्ही ‘महाराष्ट्रद्रोही’, ‘मराठीद्रोही’ कळले? जगाने मोदींना सगळ्यात शक्तिशाली नेते मानले म्हणून काय झाले? बघा, आम्ही सगळे एक होऊ जसे प. बंगालमध्ये एक झालो. दीदीने बंगाल जिंकावा म्हणून आम्ही बंगालच्या तख्तावर पाणी सोडले, जर आम्ही तिथे लढलो असतो, तर मग आमच्यात आणि दीदीमध्ये ‘टफ फाईट’ असती. दीदीला धोका नको म्हणून मग आम्ही शांत राहिलो आणि दीदी जिंकल्या. विषयांतर झाले. आम्हीच लोकप्रिय आहोत समजले? आमच्या साहेबांचे ‘फेसबुक लाईव्ह’ चालते ना? तेव्हा किती लोक ते ‘लाईव्ह’ पाहायला जमतात माहिती आहे का? काय म्हणता, फुकटचे मनोरंजन होते म्हणून लोक ‘फेसबुक लाईव्ह’ पाहतात? जाऊ दे, मी असे काही ऐकत नसतो. पण मी सर्वांना सांगतो की, मोदी जरी जगभरातले लोकप्रिय नेते असले तरी ज्यांचा मुख्यमंत्री त्यांचेच सरकार असते, कळले का? काय म्हणता, हे मला का सांगावे लागते? मग सांगितल्याशिवाय लक्षात कसे राहणार? असो. त्यांची थोरवी अधूनमधून मी ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ मुलाखतीमधून सांंगतच असतो. अशा ‘स्पेशल’ मुलाखती मी मोदींच्या कधी तरी घेतल्यात का? नाही ना? मग ते लोकप्रिय नाहीतच. बरं. ते जाऊ दे. लेखी नको, पण तशी ती मुलाखत? मोदी बसलेत, मी बसलोय. मी त्यांना म्हणेन तुम्हाला तर ‘डब्ल्यूएचओ’पेक्षाही जास्त ज्ञान आहे. जेव्हा असे म्हणणारी मी मुलाखत घेईन, तेव्हाच मोदी जगातले सर्वात हुशार बुद्धिमान आणि लोकप्रिय नेते असतील समजलं. डॉक्टरला काय कळते? तसे ‘दि मॉर्निंग कन्सल्ट’ला काय कळते?


राजू शेट्टींचे तेल गेले तुपही गेले


उपोषण करणारे, साखळी उपोषण करणारे, प्राणंतिक उपोषण करणारे खरेच जीव जाईपर्यंत उपोषण करतात का? ज्या कारणासाठी त्यांनी उपोषण केलेले असते ते राहते बाजूला आणि मग कुणी एक अधिकारी किंवा मंत्रीबिंत्री यांना लिंबूपाणी देतो. झाले उपोषण सुटते. मात्र, याने केवळ सुकलेल्या गळ्याची तहान भागते समस्यांचे उत्तर मिळते का? नाही! तर हे सगळे आठवण्याचे कारण राजू शेट्टी. प्रश्न सोडवा नाही तर जलसामाधी घेईन असे ते छातीठोकपणे म्हणाले होते. अर्थात राजू शेट्टी यांनी जलसमाधी घ्यायलाच हवी होती असे काही म्हणणे नाही. पण सामाजिक आणि राजकीय जीवनातही आपण सार्वजनिक ठिकाणी काय बोलतो याची काही किंमत असते. खरे तर राजू शेट्टी यांनाही माहिती आहे की सध्याच्या राजकारणात त्यांची किंमत त्यांच्या श्रेष्ठींना नाही. आपली किंमत तपासण्यासाठी शेट्टी यांनी आंदोलन आणि जलसमाधीचे पिल्लू सोडले. पण हाय रे दैवा.. कुणीही शेट्टी यांच्या विधानांची दखल घेतली नाही. फडणवीस असताना शेट्टी यांनी अगदी जिवाची फेकाफेकी केली. जिवाची फेकाफेकी यासाठी की फडणवीसांचे सरकार कसे शेतकरी धार्जिण नाही सांगताना रस्त्यात टोमॅटो, कांदे फेकले, टरबूज-कलिंगड फोडले, भरल्या दुधाचे कॅन पालथे केले. दुरदर्शनवर या सगळ्या फेकाफेकी, फोडाफोडीच्या बातम्यांचा रतिब घातला होता. आता मात्र जग सूना सूना लागे असे झाले आहे. शेतमाल दुध फेकायचे तर सोडाच प्रत्यक्ष जीव द्यायची, जलसमाधीची धमकी दिली पण कुणी कुणी विचारत नाही. त्यात आता ते खंजीर खुपसणार्‍यांचा करेक्ट कार्यक्रम करणार वगैरे म्हणतात. पण राजू शेट्टी यांना आता तो नैतिक अधिकार आहे का? १२ आमदारांमध्ये आपला नंबर आहे की नाही? यातच राजू शेट्टी यांच्या शेतकरी नेतृत्वातली पत गेली, समाजकारणातली निष्ठा गेली. आता राजू शेट्टींना शल्य राहिले केवळ मिळत नसणार्‍या आमदारकीचे. थोडक्यात शेट्टींची स्थिती तेल गेले तुप गेले हाती धुपाटणे आले.
@@AUTHORINFO_V1@@