मुंबई : मराठवाड्यात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे आवाहन राज्य सरकारला केले आहे. ‘केवळ पोकळ आश्वासने न देता नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष मदत करा,‘ असे आवाहन देवेंद्र फडणवीस ट्विट करत राज्य सरकारला केले आहे.
आपल्या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आज शेतकरी असो की, समाजातील लहानातील लहान घटक, त्याला पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आणि तितक्याच तातडीच्या मदतीची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे अशा गंभीर बाबीचा राज्य सरकारने विचार करावा, ही कळकळीची विनंती आहे,“ असे फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
“राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे.
लाखो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकर्यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. निसर्ग, ‘तोक्ते’ ही दोन चक्रीवादळे आणि पुराची कोकणात अजून मदत मिळाली नाही. अशात मराठवाड्यासंदर्भात जी माहिती राज्य सरकारनेच दिली, ती अतिशय धक्कादायक आहे. कोरोनामुळे सातत्याने लहान घटक संकटात असताना आणि त्यांना कोणतीही मदत स्वतंत्रपणे दिली जात नसताना या आकस्मिक संकटांनी शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असणारे घटक खचून जाणार नाहीत, याची काळजी राज्य सरकारने घेतली पाहिजे,“ असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे.
‘मराठवाडयात ओला दुष्काळ जाहीर करा‘
“अतिवृष्टीमुळे मराठवाड्यामधील आठही जिल्ह्यांत अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्याप्रमाणे प्रचंड नुकसान झाले होते त्याचप्रमाणे लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, हिंगोली या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही गंभीर परिस्थिती पाहता राज्य सरकारने अतिवृष्टी झालेल्या मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे न करता शेतकरी व जनतेला तातडीने मदत द्या,“ अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बुधवार, दि. 29 सप्टेंबर रोजी केली.
पुढील आठवड्यात मराठवाडा दौरा करणार
प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, मराठवाड्यात झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे ज्या भागांमधील शेतकरी अडचणीत आहे, त्या भागात कुठल्याही प्रकारचे पंचनामे न करता त्यांना तातडीने मदत करण्याची आवश्यकता आहे. मराठवाड्यात झालेल्या या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मी पुढील आठवड्यात मराठवाडा दौरा करणार आहे,“ अशी माहिती दरेकर यांनी दिली.
शेतकरी संकटात, पण कृषिमंत्री निवडणुकीत व्यस्त
“राज्याचे पुनर्वसनमंत्री, कृषिमंत्री यांनी अतिवृष्टी झालेल्या भागांमध्ये तातडीने आढावा घेणे आवश्यक आहे. राज्यातील शेतकरी संकटात असताना कृषिमंत्री महोदय मात्र पालघर पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याचे समजते.जनता आहे म्हणून निवडणुका आहेत आणि म्हणून सरकार आहे, याचे भान सरकारला असले पाहिजे,” असा टोलाही दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.
तातडीने मदत पोहोचवा : मुख्यमंत्री
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली. मात्र, आम्ही सरकार म्हणून या शेतकर्यांच्या पाठीशी असून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहोचवावी, असे निर्देश त्यांनी दिले.