‘थ्रीडी डिझायनिंग’चा विजय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Sep-2021   
Total Views |

udyogbodh 2_1  

‘टूडी’, ‘थ्रीडी’ डिझायनिंग, ‘आर्किटेक्चरल अ‍ॅनिमेशन’, ‘इंडस्ट्रियल अ‍ॅनिमेशन’, ’लोगो अ‍ॅनिमेशन’ यासारख्या सेवांमध्ये च्या ’टॉपआर्च’ने स्वत:चा ठसा उमटविला आहे. ‘जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन’ ही जैन उद्योजकांची सर्वोच्च संस्था बंगळुरूमध्ये सर्वसामान्य जैन समुदायासाठी हजारो घरांची वसाहत उभारत आहे. या वसाहतींच्या ‘थ्रीडी’ डिझायनिंगचे काम ठेलेंच्या ‘टॉपआर्च’ने केले आहे.

आधुनिक तंत्रज्ञान आले की, जग कसे बदलते याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे संगणक युग. साधारणत: ९० च्या दशकात हे संगणकयुग भारतात अवतरले आणि त्याने भारताचा चेहरामोहराच बदलून टाकला. त्याचा जसा फायदा झाला तसा तोटादेखील झाला. विशेषत: पारंपरिक व्यवसायांना त्याचा जास्त फटका बसला. विजय यांचा कौटुंबिक व्यवसाय असणारी फाईल उत्पादन निर्मितीसुद्धा त्याला अपवाद ठरली नाही. मात्र, काळाची पावलं वेळीच ओळखून विजयनी संगणकाची वाट चोखाळली. ‘ऑटोकॅड’सारख्या संगणकीय कौशल्याचे योग्य ते शिक्षण घेतले. या शिक्षणाचा पाया रचून त्यावर आपली उद्योजकीय संस्था उभारली. कालानुरूप बदल घडविणारे हे उद्योजक म्हणजे ‘टॉप आर्च डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक विजय ठेले.

विजय ठेलेंचे वडील बाबुराव ठेले आपली पत्नी प्रमिलासह साठच्या दशकात मुंबईला आले. कुर्ल्याला त्यांनी आपलं बिर्‍हाड थाटलं. तीन मुलगे आणि एक मुलगी अशा चार मुलांसह ते संसाराचा गाडा हाकू लागले. यासाठी पत्नी प्रमिला यांची भक्कम साथ होतीच. बाबुराव हे एका खासगी कंपनीत कामाला होते. कष्टाळू, मनमिळावू स्वभाव, नवीन शिकण्याची तयारी यामुळे त्यांची कोणासोबतही सहज मैत्री होत असे. अशाच मैत्रीतून त्यांनी वह्यांच्या प्लास्टिक आवरणाचा व्यवसाय सुरु केला. साधारणत: सत्तरचा तो काळ असावा.दरम्यान विजय हे ठेले दाम्पत्याचे दुसर्‍या क्रमांकाचे चिरंजीव. त्यांचे पहिली ते चौथी शालेय शिक्षण कुर्ल्यात झाले, तर पाचवी ते दहावीचे शिक्षण शीव येथील साधना विद्यालयात झाले. साधना विद्यालयात शिकवण्याची पद्धतच वेगळी होती. खर्‍या अर्थाने विजय यांच्यावर शालेय संस्कार इथेच झाले. त्यांना वाचनाची आवडदेखील लागली. दहावीची परीक्षा दिल्यानंतर तिसर्‍याच दिवशी विजय आपल्या बाबांना त्यांच्या व्यवसायात मदत करण्यासाठी बाहेर पडले. तोपर्यंत बाबुरावांनी कार्यालयीन कामकाजासाठी लागणार्‍या फाईल्स तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला होता. या काही फाईल्स हातात घेऊन ट्रेन पकडून विजय थेट पोहोचले ते डोंबिवलीला. अवघा १५ वर्षांचे होते ते. पहिल्यांदाच एवढ्या लांबचा ट्रेनचा प्रवास एकट्याने ते करत होते. पहिल्याच दुकानात ते गेला आणि पठ्ठ्याने पहिली ऑर्डर मिळवलीदेखील! या ऑर्डरने त्यांचा उत्साह दुणावला. जर तुम्हाला उद्योजक बनायचे असेल तर तुमच्या अंगी उत्तम विक्री कौशल्य हवे, हा व्यवसायाचा प्राथमिक नियम आहे. विजयनी पंधराव्या वर्षीच हा नियम आत्मसात केला.दहावीनंतर पुढे काय करायचे, हा प्रश्नच होता. शैक्षणिक मार्गदर्शन करायला असे कोणी नव्हते. एवढेच ऐकून होते की, कला आणि वाणिज्य शाखेमध्ये पुढे काही वाव नसतो. त्यामुळे बहुतांश मुले विज्ञान शाखा निवडतात. विजयसुद्धा प्रवाहासोबत गेले. घाटकोपरच्या झुनझुनवाला महाविद्यालयातून रसायनशास्त्र हा विषय घेऊन विज्ञान शाखेची पदवी त्यांनी प्राप्त केली.


दरम्यान, बाबुराव ठेले प्लास्टिक आवरणाकडून फाईल्स निर्मिती क्षेत्राकडे वळले. मोठमोठे स्पर्धक या स्पर्धेत उतरल्याने प्लास्टिक आवरणाचा व्यवसाय जवळपास बंदच होण्याकडे आला होता. त्याचवेळी फाईल्सचा व्यवसाय चांगलाच विस्तारत होता. अगदी विमानातून केरळमध्ये जाण्याइतपत व्यवसाय वाढला होता. महाविद्यालयीन शिक्षणानंतर कौटुंबिक व्यवसाय वाढविण्याचा विजयचा मानस होता. फाईल्स रचनेत, रंगसंगतीत त्यांनी बदलदेखील केले. नरिमन पॉईंट ते बोरिवली आणि बोरीबंदर ते कल्याण या मार्गावरील जवळपास सर्वच स्टेशनरी दुकाने विजयनी पादाक्रांत केली. १९९२च्या आसपास फाईल्सची निर्यात करण्यास सुरुवात झाली. मात्र, दुर्दैवाने याच सुमारास इराण-इराक युद्ध सुरू झाले आणि निर्यातीच्या प्रक्रियेस खिळ बसली ती कायमचीच.१९९५ नंतर संगणकाने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली होती. संगणकामुळे आपल्या व्यवसायाला कुठेतरी थांबा लागणार आहे, हे विजयना जाणवू लागले. त्यामुळे वेगळा व्यवसाय करण्यास त्यांनी सुरुवात केली. फोटोग्राफी, टायपिंग/प्रिंटर मशीनमधील रिबन्स विकणे, झेरॉक्स मशीनचे कागद विकणे, प्लास्टिक फुले विकणे हे सर्व व्यवसाय त्यांनी केले.


’जी गोष्ट कठीण वाटते ती करायची, यश मिळते,’ असे कुठल्यातरी पुस्तकात विजयने हे वाक्य वाचले होते. एव्हाना भीती होती ती संगणकाची. हाताळताना कुठे चूक झाली, तर संगणक बिघडेल ही ती भीती. मात्र, ही भीती घालवण्यासाठी थेट संगणकालाच भिडण्याची विजयने तयारी केली. आर्थिक तंगी असल्याने विजयने आपला कॅमेरा विकला आणि ‘ग्राफिक डिझायनिंग’च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. १०-१२हजार रुपये खर्च झाल्यावर कळले की, आपला मार्ग चुकलाय. त्याचवेळी विजय एका मित्राकडे गेले. तिथे त्यांनी ‘ऑटोकॅड’ हे सॉफ्टवेअर पाहिले. जे आपण शोधत होतो ते हेच. ‘ऑटोकॅड’ शिकण्याचा त्यांनी निश्चय केला. मात्र, पुन्हा अडचणींचा डोंगर उभा राहिला. ‘ऑटोकॅड’ शिकवणारा पहिला शिक्षक चांगली संधी मिळाली म्हणून दुबईला गेला. दुसरा शिक्षक पगार मिळत नाही म्हणून शिकवायला यायचा नाही. आम्ही शुल्क देतो म्हणत कसेबसे विद्यार्थ्यांनी त्यांची समजूत काढली आणि त्यांच्याकडून उरलेले ‘ऑटोकॅड’ शिकून घेतले.याचदरम्यान विजय यांचे लग्न विद्या या तरुणीसोबत झाले. आर्थिक ओढाताण होत होतीच. त्यात काही कारणास्तव विजयना आपल्या पत्नीसह अ‍ॅन्टॉप हिलला राहण्यास जावे लागले. एका चाळीत त्यांनी संसार थाटला. आर्थिक चणचण प्रचंड होती. दोन हजार रुपयांची एक नोकरी त्यांना मिळाली. दोन हजार घर चालविण्यासाठी पुरेसे नव्हते. त्यामुळे ‘ऑटोकॅड’ शिकवायला त्यांनी सुरुवात केली. त्याचे दोन-तीन हजार रुपये त्यांना मिळू लागले. गंमत म्हणजे विजय यांच्या पत्रिकेत लिहिले होते की, ते वयाच्या पस्तिसाव्या वर्षापर्यंत उद्योजक होतील, खूप पैसे कमावतील आणि त्यांच्याकडे गाडीदेखील असेल. पत्रिकेची गोष्ट आठवली की, मनोमन विजयना हसू फुटायचे.


दोन-तीन ठिकाणी तीन वर्षे नोकरी केल्यानंतर विजयना उमगले की, नोकरी हा आपला पिंड नाही. त्यांनी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये ‘व्हिझिटिंग फॅकल्टी’ म्हणून ‘ऑटोकॅड’ शिकवण्यास सुरुवात केली. स्वत: ‘थ्रीडी मॅक्स’चे शिक्षणदेखील घेतले.२००६ मध्ये मे महिन्यात छोट्या बहिणीचे लग्न झाले. वडिलांना कर्करोगाचे निदान झाले होते. २००६ च्या अखेरीस त्यांचे निधन झाले. नोकरी की व्यवसाय हा प्रश्न पुन्हा उभा ठाकला. यावेळी मात्र विजयने आपल्या वडिलांच्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला.२००७ साली आपल्या मुलाच्या नावाने, ‘शार्दूल एंटरप्रायझेस’ नावाची कंपनी विजय यांनी सुरू केली. ही कंपनी बांधकाम व्यावसायिक संस्थांसाठी, ‘आर्किटेक्ट’साठी ‘टूडी’, ‘थ्रीडी’ डिझायनिंगची कामे करुन देऊ लागली. एका विद्यार्थ्यालाच विजय ठेलेंनी कामाला ठेवले. एक संगणक या भांडवलावर व्यवसाय सुरू झाला. हळूहळू व्यवसाय वाढत गेला. २०१३ च्या दरम्यान ‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’ या उद्योजकीय नेटवर्किंग संस्थेमध्ये ते सामील झाले. उद्योजकीय ओळखी वाढल्या. त्याचा लाभ व्यवसाय वाढीसाठी झाला. पत्रिकेत लिहिलेला गाडीचा योग जुळून आला. वयाच्या ३९ व्या वर्षी स्वत:ची चारचाकी घेतली. २०१८ मध्ये आणखी एक पाऊल टाकत ठेलेंनी ‘टॉपआर्च डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड’ नावाची नवीन कंपनी सुरू केली. आतापर्यंत ५० हून अधिक बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांना कंपनीने सेवा दिली आहे. यामध्ये ‘रुस्तमजी’, ’रिलायन्स’, ‘नेपच्यून’ सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.


एकेकाळी परदेशात निर्यात करण्याच्या व्यावसायिक संधीला खिळ बसली होती. मात्र, ‘टॉपआर्च’ने आतापर्यंत दुबई कॉन्सुलेट, ऑस्ट्रिया या देशातील चार-पाच प्रकल्प, बहामा आयर्लंड, कतार सारख्या देशांमधील प्रकल्प पूर्ण करुन आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामे केली आहेत. ‘टूडी’, ‘थ्रीडी’ डिझायनिंग, ‘आर्किटेक्चरल अ‍ॅनिमेशन’, ‘इंडस्ट्रियल अ‍ॅनिमेशन’, ’लोगो अ‍ॅनिमेशन’ यासारख्या सेवांमध्ये ठेलेंच्या ’टॉपआर्च’ने स्वत:चा ठसा उमटविला आहे. ‘जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन’ ही जैन उद्योजकांची सर्वोच्च संस्था बंगळुरूमध्ये सर्वसामान्य जैन समुदायासाठी हजारो घरांची वसाहत उभारत आहे. या वसाहतींच्या ‘थ्रीडी’ डिझायनिंगचे काम ठेलेंच्या ‘टॉपआर्च’ने केले आहे.विजय ठेलेंच्या कंपनीने ‘थ्रीडी अ‍ॅनिमेटेड’ केलेला ‘सॅटर्डे क्लब’चा लोगो संदीप कुलकर्णींच्या ‘डोंबिवली रिटर्न’ या चित्रपटाच्या श्रेयनामावलीत मोठ्या पडद्यावर झळकला तेव्हाचा क्षण आपल्या आयुष्यातला एक आनंददायी क्षण होता, असे विजय ठेले सांगतात.


मराठी माणूस हा नोकरी करणारा असो वा उद्योग-व्यवसाय करणारा, तो आर्थिक साक्षर नसतो. सुरुवातीला बचत करुन मग गुंतवणूक करून समृद्ध होण्याचे ज्ञान त्याला नसते. जे ज्ञान उपलब्ध आहे ते काहीसे क्लिष्ट स्वरुपात असल्याने तो ते ज्ञान मिळवण्याच्या वाटेला जात नाही. भविष्यात मराठी माणसाला आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याचा मानस विजय ठेले व्यक्त करतात.

खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पुछे बता तेरी रजा क्या हैं।
विजय ठेलेंच्या उद्योजकीय प्रवासाला हे वाक्य तंतोतंत लागू पडते.









@@AUTHORINFO_V1@@