‘कोरोना’नंंतरचे ऑफिस-ऑफिस!

    30-Sep-2021
Total Views |

corona_1  H x W
यापूर्वीच्या लेखांमधून कोरोनाकाळातील कार्यपद्धती, विविध कंपन्यांनी यादरम्यान अमलात आणलेली कार्यशैली, मनुष्यबळाचे यशस्वी व्यवस्थापन यांसारख्या विविध महत्त्वाच्या विषयांना या स्तंभातून आपण स्पर्श केला. आजच्या भागात कोरोनानंतरच्या काळातील ऑफिस, कर्मचार्‍यांची मानसिकता, कार्यपद्धती यांचा विचार करुया.

कोरोनाकाळात कंपनी आणि कर्मचारी या उभयतांनाही ज्या एका मुख्य बाबीची कमतरता प्रामुख्याने जाणवली, ती म्हणजे त्यांचे रोजचे कार्यालयीन ठिकाण म्हणजेच ऑफिसची. वर्षानुवर्षे व दररोज कामासाठी ज्या कार्यालयात जायचे व जिथे प्रसंगी रात्रंदिवस काम करायचे, त्याच ठिकाणी जाण्यावर कोरोनाकाळात प्रतिबंध वा बंदी अनुभवावी लागली व अमलात आणावी लागली. देश-विदेशात सर्वदूर थोड्या-फार फरकाने अशीच स्थिती होती. ही परिस्थिती अंगवळणी पडली असतानाच आता कोरोनादरम्यान वा त्या नंतरच्या काळात कर्मचारी कंपनी स्तरावर काय आणि कशाप्रकारे बदल होऊ शकतात, हे पाहणे म्हणूनच लक्षणीय ठरते.


कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजेच गेल्या वर्षी विविध निर्बंध व नियमांसह टाळेबंदी लागू झाली व त्यामुळे कर्मचार्‍यांच्या कामकाजात प्रामुख्याने दोन प्रकारचे बदल दिसून आले. अधिकांश कर्मचार्‍यांना घरून कामकाज सुरू करावे लागले, तर काही जणांचे नोकरी-रोजगारही गेले. अकल्पितपणे झालेल्या या कर्मचार्‍यांच्या कामकाजाविषयक बदलांचे परिणाम कर्मचारी-त्यांचे कुटुंबीय व कंपनीतील सहकारी-व्यवस्थापन या सर्वांवर प्रामुख्याने झालेले पाहायला मिळाले.कधी कर्मचार्‍यांची वैयक्तिक अडचण वा गरजेपोटी घरून काम करण्याची पद्धत एक विशेष बाब म्हणून प्रचलित होतीच; मात्र कोरोनामुळे बहुतांश कंपनी कार्यालयांमधील कर्मचार्‍यांना विविध निर्बंधांसह घरून काम करण्यास सांगितल्यामुळे अभूतपूर्व स्थिती उत्पन्न झाली. या बदलत्या स्थितीचे परिणाम कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबावर अपरिहार्यपणे झाले.
परिस्थितीची निवड व कामाची गरज यापोटी ज्या कर्मचार्‍यांना घरून काम करायचे असल्याने त्यांनी त्यानुरूप आपल्या मनाची आणि कामाची तयारी तातडीने केली. याला कर्मचार्‍यांच्या घरची मंडळी व कार्यालयीन सहकारी-अधिकार्‍यांनीही आवश्यक ती साथ दिली. यातूनच कोरोनाकाळातील कामाचे आव्हान सुरुवातीपासूनच यशस्वीपणे पेलण्यात आले. हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे. मात्र, जसजसा काळ जाऊ लागला, त्यानंतरच्या सहा महिन्यांनंतर कर्मचार्‍यांनी घरून काम करण्याच्या या पद्धतीला परिस्थितीनुरूप नवनवे आयाम मिळत गेले. हीच बाब कंपनी कार्यालयांच्या संदर्भात दिसून आली.


गेली दीड वर्षे अशा पद्धतीने काम करताना कंपनी आणि कर्मचार्‍यांना बहुविध आव्हानांचा सामना करावा लागला. कोरोनाच्या अकल्पित आपत्तीला जोड मिळाली ती विविध प्रकारच्या शासकीय, प्रशासकीय, वैद्यकीय, सामाजिक, आरोग्यविषयक व कौटुंबिक बंधने आणि निर्बंधांची. यामध्ये कर्मचार्‍यांना घरून काम करण्यासाठी आवश्यक असे तंत्रज्ञान व पाठबळ, घरी काम करण्यासाठी आवश्यक अशी जागा, वातावरण व कर्मचार्‍यांची मानसिकता व मुख्य म्हणजे अशाप्रकारे दूरस्थ पद्धतीने होणार्‍या कामाची परिणामकारकता साधणे या आणि अशा आव्हानांचा समावेश करता येईल.कोरोनाने व्यवसायासह समाजजीवनाच्या विविध संदर्भात वेगवेगळी शिकवण दिली. ही पण एक वस्तुस्थिती ठरली. संगणकीय संवादशैली आणि पद्धतीचा मोठा व सोयीस्कर वापर याचा या संदर्भात विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. ‘ऑनलाईन’ पद्धतीने मर्यादित जणांपासून अनेकांशी संवाद संपर्क साधण्याचे तंत्र आणि तंत्रज्ञान आता कोरोनाकाळातील सोईस्कर व सर्वमान्य पद्धती ठरली आहे. याच संवादतंत्राचा उपयोग आता अंतर्गत संवाद, उमेदवारांची मुलाखत, व्यवस्थापन संवाद, व्यवसाय विषयक परिषदा, प्रशिक्षण सत्र इ. बहुविध प्रकारे व अनेकविध स्वरूपात केला जात आहे. सहजपणे, कमी खर्चात व नेमक्या वेळेत विविध प्रकारच्या व्यावसायिक कामांसाठी कोरोनाकाळात उपयोग करण्याची सुरुवात आणि सवय आता नेहमीसाठी व कायमस्वरूपी वापरण्याकडे कंपन्यांचा वाढता कल दिसून येतो.


गेली दीड वर्षे कर्मचार्‍यांना घरून काम करण्याच्या पद्धतीचा सराव झाल्यानंतर या पद्धतीला अधिक लवचिक व कार्यक्षम स्वरूप देण्यावर कंपनी-व्यवस्थापनांद्वारा आता भर दिला जात आहे. त्यासाठी विविध ठिकाणी व गरजेनुरूप प्रयत्न सुरू आहेत. सर्वसाधारणपणे यासंदर्भात कंपन्यांचा कल दिसून येतो. त्यादृष्टीने संबंधित व्यवसाय-विभागप्रमुख व त्यांचे सहकारी-कर्मचारी यांना त्यांच्या कामाच्या गरजा आणि निकड यानुरूप काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.बहुसंख्य कर्मचारी प्रदीर्घ काळासाठी घरून काम करीत असल्याने त्यांचे प्रत्यक्ष काम आणि कामाची उत्पादकता यासाठी कंपनी-कर्मचारी या उभयपक्षी उपयुक्त मोजमाप केले जात आहे. ‘पीपल स्ट्राँग’चे सह-संस्थापक व मुख्याधिकारी पंकज बन्सल यांच्यानुसार कोरोनाकाळात प्रस्थापित-प्रचलित कार्यपद्धती सुरुवातीला तात्पुरत्या स्वरूपात असली, तरी त्याला आता कायमस्वरूप मिळणे अटळ आहे. त्यांच्या मते आता आणि यापुढे कंपन्यांमधील कर्मचार्‍यांचे प्रत्यक्ष काम आणि त्यांच्या कामाची उत्पादकता ठरविताना घरून काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या कामाचे तास न मोजता त्यांच्या कामाची उपयुक्तता आणि व्यावसायिक उत्पादकता हेच निकष लावले जातील. कंपनी आणि कर्मचार्‍यांसाठी घरी काम करताना त्यांच्या काम-काळ-वेग याचे वेगळेच समीकरण पुढील काळामध्ये निर्णायक ठरणार आहे.


याच संदर्भात व कोरोनाकाळात जागतिक स्तरावर काम करणार्‍या ‘गार्टनर’या संस्थेतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात प्रामुख्याने असे नमूद करण्यात आले आहे की, जागतिक स्तरावर कोरोनाकाळात सुमारे ५० टक्के कंपनी-व्यवस्थापनांच्या मते कर्मचार्‍यांनी घरून काम करण्याची पद्धत उपयुक्त ठरली आहे. याच सर्वेक्षणात लक्षात आलेली अन्य बाब म्हणजे कर्मचार्‍यांनी घरून काम करण्यामुळे कंपनीच्या प्रशासकीय व व्यावसायिक खर्चात लक्षणीय स्वरूपात बचत झाली. गेल्या आर्थिक वर्षात कोरोनाकाळातही चांगला नफा कमविलेल्या कंपन्यांच्या आर्थिक ताळेबंदांद्वारेही हीच बाब अधोरेखित झाली आहे.सद्यःस्थितीत कोरोना आणि कंपनी-कर्मचारी यांच्यासंदर्भात व्यवस्थापन सल्लागार कंपनी ‘मेकँझी’तर्फे करण्यात आलेल्या विशेष अभ्यासानुसार कंपनी-कर्मचारी-कोरोना आणि कामकाज यामध्ये परंपरागत कामकाज पद्धतीपासून कायमस्वरूपी घरून काम करण्याची पद्धत अमलात आणणे, हा फार मोठा बदल होता. ‘मेकँझी’नुसार या बदलाला कायमस्वरूपी वा स्थायी स्वरूप देण्यासाठी कंपनी-कर्मचारी या उभयस्तरावर बदल आणि बदलाचे व्यवस्थापनविषयक प्रशिक्षण-प्रबोधनाची नितांत आवश्यकता राहणार आहे.


सद्यःस्थितीत कर्मचार्‍यांनी अधिकाधिक वा शक्य त्या सार्‍या प्रमाणात घरून काम करण्याला कंपनी व्यवस्थापनाची पहिली पसंती असल्याचे दिसून येते. अर्थात, बर्‍याच कंपन्या अशाही आहेत की, त्यांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेता कर्मचार्‍यांनी दीर्घकाळ घरून काम करणे व्यावहारिक ठरणार नाही. अशा कंपन्या त्यामुळेच पर्यायी कार्यपद्धतीवर विचार करणे अपरिहार्य आहे. याचेच अकुशल असंघटित, अनौपचारिक वा पूरक स्वरूपाचे उद्योग-व्यवसाय करणार्‍यांच्या संदर्भात काही आकडेवारी स्पष्ट केली आहे. त्यानुसार देशाच्या प्रचलित सकल घरेलू उत्पादन (जीडीपी)पैकी ५० टक्के,तर एकूण कर्मचार्‍यांपैकी ८० टक्के कामगार-कर्मचारी हे या असंघटित उद्योगक्षेत्रात काम करीत असल्याने त्यांनी कोरोनाकाळ व प्रचलित परिस्थिती-गरजांनुरूप संमिश्र कामकाजपद्धतीला आपली पसंती दिली असून तीपण निश्चितच विचारणीय व उपयुक्त ठरू शकते.

- दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर व्यवस्थापक व सल्लागार आहेत)