आम्ही म्हातारे नव्हे, तर ‘महा तारे’!
30-Sep-2021
Total Views |

आज १ ऑक्टोबर. हा दिवस जगभरात ‘ज्येष्ठ नागरिक दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने ज्येष्ठ नागरिकांचे कायदेशीर हक्क, अधिकार आणि त्यांचे कुटुंबातील स्थान याचा ऊहापोह करणारा हा लेख...
भारतीय संस्कृतीत ज्येष्ठ नागरिकांचे स्थान नेहमीच मानाचे राहिले आहे. कारण, ते परिवाराचा आधारवड असल्याने त्यांना अनमोल ठेवाही म्हटला जातो. अतः त्यांच्या छत्रछायेत लहानाचे मोठे झालेल्या प्रत्येक सदस्याने त्यांना सन्मानाची-आदराची वागणूक देणं खर्या अर्थानं कर्तव्यच आहे, हे कदापि विसरू नये. कारण, आजच्या पिढीने एक गोष्ट लक्षात ठेवावी की, तुम्ही जशी वागणूक तुमच्या आई-वडिलांना देताहात, तशीच वागणूक पुढे तुमची मुलं तुम्हाला देतील. आपल्या आयुष्याची संध्याकाळ ही कधी व कुठे होईल, याचा अंदाज आपण बांधू शकत नाही. आपण केलेलं कार्य वा कृत्ये परत फिरून कधी ना कधी आपल्यासमोर उभी राहतातच. कारण, म्हणतात ना ‘करावे तसे भरावे!’
प्रत्येकाला काळानुरूप वृद्धापकाळाला सामोरे जावेच लागते. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने आपल्या घरातील वडीलधारी मंडळींशी आपलेपणाच्या भावनेने वागावे, यातच तुमची भलाई आहे अन् जीवनाची सार्थकता आहे.प्रत्येकाने एकमेकांचा आधार बनून जीवनाचा गाडा हाकायला पाहिजे, जेणेकरून भावी पिढीवर चांगले संस्कार होऊन पुढे ते आदर्श नागरिक बनून समाजाला सुयोग्य दिशा देतील. शरीर साथ न देणं, सुरकुत्या पडलेली ती त्वचा, धुसर झालेली नजर, कानाला ऐकू येत नसले, तरीदेखील सर्वकाही जाणणारी ही मंडळी घराघरांत परिचित आहे. तथापि, सर्वांनी हसतखेळत, सुखी, आनंदी व समाधानी राहावे, हाच खरा त्यांचा मानस असतो. यास्तव घराघरांतील युवक-युवतींनी वडीलधारी मंडळींचा चांगल्याप्रकारे सांभाळ करावा, हेच अपेक्षित आहे.
मित्रहो, १ ऑक्टोबर हा दिवस जगात ‘ज्येष्ठ नागरिक दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस सन १९९१ पासून विश्वात साजरा होऊ लागला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड रिगन यांनी जगातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्यांवर तोडगा निघावा, तसेच त्यांच्यावर होणार्या अन्यायाला वाचा फोडून त्यांच्या सामाजिक, आर्थिक, आरोग्य, सुरक्षाविषयक न्याय्य मागण्यांवर प्रकाश टाकावा, त्यांच्या जीवनातील दाहकता नाहीशी व्हावी, तसेच सर्व ठिकाणी त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी, ही त्यामागील मुख्य कारणं आहेत.महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे साडे ११ कोटी असून, त्यात जवळ जवळ सव्वा कोटी नागरिक हे ज्येष्ठ स्त्री-पुरुष आहेत, म्हणजेच राज्यातील लोकसंख्येच्या सरासरी दहा टक्के. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे (फेस्कोम) ब्रीदवाक्य आहे, ‘जगण्यासाठी खा, खाण्यासाठी जगू नका! हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा!’ यानुसार ज्येष्ठांनी आपल्या जीवनाची मार्गक्रमणा करावी, हे अभिप्रेत आहे. आपल्या राज्यातल्या प्रत्येक विभागात महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाची कार्यालये आहेत. त्याच्या अधिपत्याखाली जिल्ह्यात अन् तालुका स्तरावर असलेले विविध ज्येष्ठ नागरिक संघ/ संस्था (रजिस्टर) या त्या त्या विभागाच्या महासंघाशी जोडलेले असतात. राज्यातील सर्व विभागीय महासंघ हे राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभाग, मंत्रालय याच्याशी संलग्न असतात. सदर महासंघाची विभागीय अन् राज्यस्तरीय पातळीवर दरवर्षी अधिवेशने भरून आपले ज्वलंत प्रश्न व मागण्या राज्य शासनाच्या सामाजिक न्याय खात्याकडे लेखी स्वरूपात सादर केल्या जातात.
अतः प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने आपापल्या भागातील नोंदणीकृत संघात आपले नाव सामील करून त्यांच्या माध्यमातून तहसीलदार कार्यालयातून अधिकृत ‘ज्येष्ठ नागरिक कार्ड’ प्राप्त करून घ्यावे, जेणेकरून सदर कार्ड आपल्याला आवश्यकता भासेल, तेथे तेथे उपयुक्त ठरेल. दारिद्य्ररेषेखालील अन् ज्यांना पेन्शन नाही वा अल्प उत्पन्न गटातील ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना ‘संजय गांधी निराधार योजना’, ‘श्रावण बाळ योजना’ (राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना), ‘इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना’ यांचा लाभ मिळतो. इतकेच नव्हे, तर ‘अन्नपूर्णा’ आणि ‘अंत्योदय योजने’खाली अल्पदरात वा मोफत प्रतिमाह रेशनकार्डवर पाच किलो धान्य व अन्य वस्तू मिळतात. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘समुपदेशन केंद्रे’ स्थापन केलेली असतात. ज्येष्ठांवर घरच्या मुलाने छळवणूक, जोरजबरदस्ती केली, तर त्याच्याविरुद्ध तक्रार केल्यास त्यावर त्वरित फौजदारी कारवाई होऊन तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. एखादा पोटचा मुलगा आई-वडिलांना व्यवस्थित वागवत नसेल, तर संबंधित मुलाकडून किमान दहा हजार रुपये पोटगी म्हणून त्यांना द्यावी लागते. ही कायदेशीर तरतूद ‘आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ अन् कल्याणकारी अधिनियम २००७ ’ या कायद्यात केली आहे. हा कायदा केंद्र सरकारने पारित केला असून, तो देशभरात लागू करण्यात आला आहे.
संत तुकाराम महाराज म्हणतात, “जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना, तूच शोधून पाहे.” थोडक्यात, समाधानी वृत्ती बाळगणे, ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. घरात वाद निर्माण होऊ नयेत, यासाठी सर्वांना समान वागणूक देऊन ज्येष्ठांनी त्यांच्या मतांचा सन्मान करावा. अतिरंजित विचार न मांडता, ‘गोष्टी सांगेन युक्तीच्या चार’ ही भूमिका आपण अवलंबावी. कुटुंबात वावरताना नेहमी ‘सकारात्मक’ दृष्टिकोन ठेवून सर्वांना ज्येष्ठ या नात्याने समान लेखावे. ‘मीच श्रेष्ठ, बाकीचे दुय्यम’ हा मीपणा कटाक्षाने टाळावा.जुन्या-नव्या पिढीतले अंतर (जनरेशन गॅप) लक्षात घेऊन एखाद्या मुद्द्यावर सल्ला विचारला तरच तो द्यावा, विनाकारण प्रत्येक ठिकाणी लुडबुड करू नये. जेथे आपली गरज नसेल तेथे मौन पाळणे, हे ज्येष्ठांसाठी सर्वोत्तम माध्यम आहे. त्यामुळे आपल्या मताला किंमत राहते. तसेच घरातील लहान-मोठ्या सदस्यांमध्ये सामंजस्याने वातावरण तयार होते.‘नटसम्राट’ या नाटकात ज्येष्ठांबाबत सांगितल्याप्रमाणे मुलांना आपले समोरचे ताट द्या. परंतु, पाट देऊ नका, या अनुषंगाने वागावे. भावनावश होऊन, आततायीपणाने आपली सर्वच पुंजी जीवंतपणी मुलांना देऊन टाकू नका. ती तुमची आयुष्याची ढाल आहे, ही मनाशी गाठ असू द्यावी. कायदेशीर बाब म्हणजे आपल्या हयातीत आपले ‘इच्छापत्र’ (मृत्यूपत्र) लिहून ठेवावे, म्हणजे आपण देवाघरी गेल्यावर कौटुंबिक सदस्यांमध्ये मालमत्तेवरून वाद, भांडणे होणार नाहीत.सदर पत्र लिहिताना आपल्या मुलांसह विवाहित मुलींना देखील काहीतरी ‘फुल नाही, फुलाची पाकळी’ याप्रमाणे उपहार द्यावा.त्यांना अजिबात अवहेरू नये. कारण, मानवी जीवनात आई-वडिलांना उपद्रवी न ठरणारी एकमेव सदस्य ‘कन्या’च असते, म्हणूनच स्त्री जातीला पुराणकाळापासून अग्रस्थान आहे.उदा. लक्ष्मीनारायण, सीताराम....
ज्येष्ठांच्या उत्तम आरोग्याच्या दृष्टीने विचार करावयाचा असल्यास, आपल्या ‘जिभेवर ताबा ठेवणे’ हे अत्यंत गरजेचे आहे. सीमित आहार, झेपेल तेवढा व्यायाम (योगा-प्राणायाम, फिरणे वगैरे) अन् पुरेशी विश्रांती, असा दैनंदिन कार्यक्रम असावा. ‘स्मृतिभ्रंश (अल्झायमर)’सारखा आजार जडू नये, यासाठी नित्यनेमाने वाचन करणं आवश्यक आहे. त्यामुळे मेंदू सक्रिय राहून त्यात कोणत्याही प्रकारचा कमकुवतपणा येत नाही, तर तो ‘अॅक्टिव्ह’ राहतो. याशिवाय आध्यात्मिक क्षेत्रातही रस घ्यावा. एकांतवासात (ङेपशश्रळपशीी) कदापि, राहू नये, यासाठी आपापल्या मित्रांमध्ये राहून विचारांची आदानप्रदान करावी. देहदान, नेत्रदान, स्वच्छता अभियान अशा तत्सम सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घ्यावा. त्यामुळे मन प्रसन्न, तर शरीर चपळ राहते. घरात एकाकी जीवन जगणार्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्या त्या पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकार्याने प्रत्येक सप्ताहात संबंधित एकाकी राहणार्या ज्येष्ठाच्या घरी जाऊन विचारपूस करावी, यासंबंधीची गृह विभागाच्या कायद्यात तरतूद आहे. यासंबंधी तेथील ज्येष्ठ नागरिक संघाने आपल्या क्षेत्रातील पोलीस ठाण्याला अशा एकाकी राहणार्या ज्येष्ठांची नावे दाखल करावीत, म्हणजे त्यांना सदर सुविधा मिळू शकेल.
राज्य सरकारचे हॉस्पिटल्स आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिपत्याखालील हॉस्पिटल्समध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केले आहेत, त्याचा आपल्या आरोग्याच्या रुटीन चेकअपसाठी उपयोग करून घ्यावा. सदर उपचार ज्येष्ठांसाठी अल्पशा दरात वा मोफत असतात, याची नोंद घ्यावी. त्याप्रमाणेच खासकरून ज्येष्ठांसाठी अल्पशा दरात मोठमोठे महागडे ऑपरेशन्स करण्याची व्यवस्था सरकारी व मोठमोठ्या नावाजलेल्या खासगी हॉस्पिटल्समध्ये करण्यात आली आहे. त्याचा अल्प उत्पन्न गटातील ज्येष्ठांनी अवश्य लाभ घ्यावा. केशरी रेशन कार्ड, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला हे दस्तावेज त्यासाठी आवश्यक असतात. राज्य सरकारच्या ‘ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने’खाली हे ऑपरेशन्स होत असतात. त्यासंबंधीचा अर्ज प्राप्त करून तो भरून हॉस्पिटलमध्ये सादर करावा, असे आवाहन करण्यात येते. महत्त्वाचे म्हणजे, आरोग्य हीच खरी संपत्ती असते, हे लक्षात ठेवून ज्येष्ठांनी आपली दुसरी इनिंग आरोग्यदायी जगावी, हेच प्रेमाचं सांगणं आहे.
‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे,’ या कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या अर्थपूर्ण संदेशाचे मर्म लक्षात घेऊन, ज्येष्ठ स्त्री-पुरुषांनी आपल्या उर्वरित आयुष्याची मार्गक्रमणा करावी, जेणेकरून तुमचे-आमचे जीवन सुखी, आनंदी व आरोग्यदायी होईल, हे निश्चित. ‘आम्ही म्हातारे नव्हे तर, ‘महा तारे’ आहोत’, याची मनात गाठ बांधून कोणाच्या सहार्यावर विसंबून न राहता, तुम्ही दुसर्यांचे आधारवड बना. कारण, आपण सर्व जण वृद्ध नव्हे, तर ज्येष्ठ आहोत. जय महाराष्ट्र!
- रणवीर राजपूत