काबूल ते टेक्सास : ‘ती’चा आवाज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2021   
Total Views |
women_1  H x W: 
 
 
 
स्थळ अफगाणिस्तान आणि स्थळ टेक्सास अमेरिका. दोघांमध्ये ना भौतिक साम्य, ना सांस्कृतिक साम्य, ना ऐतिहासिक साम्य. मात्र, सध्या इथे दोन घटना घडल्या. जागतिक पटलाचा आयाम पाहता या घटना छोट्या आहेत. पण, या दोन घटनांचा परस्पर संबंध परावर्तन आणि आवर्तन पाहता वाटते की, खरेच जग खूप मोठे असले तरी जग हे एक खेडे आहे. माणूस वरवर सगळीकडे वेगळाच आहे. पण, त्याच्या आतल्या मुक्तीचा आवाज एकच आहे.
  
 
 
 त्या घटना आहेत महिलांसंदर्भातल्या. तालिबान्यांनी जगाला त्यांची नकोशी असलेली सत्ता अफगाणवर लादली. ती लादेपर्यंत त्यांचा आव तर असा होता की, अफगाण आणि त्यातही जगभरातील मुस्लिमांना त्यांची सत्ता आलेली आवडणार. मात्र, त्यानंतर जगाने पाहिले की, त्यांच्या सत्ताकारणानंतर अफगाणिस्तानातले नागरिकही तिथून जीव मुठीत घेऊन पळू लागले. बिचार्‍या मुलीबाळी, महिलांचे काय? त्यात तालिबान्यांनी साळसूदपणे सांगितले की, महिलांनी आपल्या घराबाहेर येऊ नये, आमचे लोक अजून शिकले नाहीत की, महिलांशी सभ्यतेने कसे वागावे!या सगळ्या गदारोळात मात्र अफगाणिस्तानातील काही महिलांनी मात्र आपल्या हक्कासाठी आवाज उठवला आहे. त्यांनी काबूलमधील गव्हर्नरच्या कार्यालयासमोर शांततेत रॅली काढली. तालिबानी नियमानुसार त्यांनी बुरखा घातला. मात्र, त्यांनी आवाज उठवला आहे की, येणार्‍या तालिबानी सत्तेत महिलांनाही सहभागी करा. या रॅलीचे आयोजन फ्रीबा काबरजानी या महिलेने केले.
 
 
 
ती म्हणते की, “२० वर्षांत शैक्षणिक, सामाजिक आणि सर्वच क्षेत्रात महिलांनी प्रगती केली आहे. आताही महिलांना संरक्षणात्मक संधी हवी. अर्थात, या रॅलीत महिलांची संख्या कमी होती. पण, त्यांनी आवाज उठवला. जिथे तालिबानी आले पाहून, अफगाणचे राष्ट्राध्यक्षही राष्ट्र सोडण्याची तयारी करू लागले, तिथे या महिलांचे हक्कासाठीचे हे धाडस कौतुकास्पद आहे. दुसरी घटना आहे टेक्सासची. जेव्हा अफगाणिस्तानमध्ये या महिलांची रॅली सुरू होती, त्यावेळी टेक्सासमध्येही महिलांची रॅली सुरू होती. ती रॅली राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अधिकार हक्कांसाठी नव्हती बरं; तर या महिला जमल्या होत्या टेक्सासच्या नव्या कायद्याविरोधात. अमेरिकेमध्ये बहुतेक सर्वच राज्यात गर्भाच्या सहा आठवड्यांनंतरच्या वाढीनंतर गर्भपात करण्यास बंदी आहे.
 
 
 
टेक्सास येथे मे महिन्यात हा कायदा पारित करण्यात आला. मात्र, या कायद्याच्या समर्थनार्थ आणि विरोधात भरपूर वाद रंगले. कोर्टात केसही गेली. हा कायदा कार्यान्वित व्हायला वेळ लागेल, असे जनतेला वाटले. मात्र, केवळ काही दिवसांपूर्वीच टेक्सास सरकारने नवा कायदा जाहीर केला की, सप्टेंबरपासून सहा आठवड्यांनंतर गर्भपात करण्यास कायद्याने बंदी आहे. या निर्णयामुळे टेक्सासचे सामाजिक जीवन ढवळून निघाले. टेक्सासची गर्भपात केंद्रे ही ३0 आणि ३१ या दोन दिवसांत गर्दीने भरून गेली. इतकी की, इथले गर्भपाताचे साहित्य संपले, औषधे संपली. केंद्रामध्ये दोन दिवसांत अभूतपूर्व पैसा गोळा झाला. कारण काय तर, गर्भाची वाढ सहा महिन्यांपेक्षा जास्त झाली तर १ सप्टेंबरनंतर टेक्सासमध्ये गर्भपात करता येणार नाही. आपल्या भारतामध्ये हे सगळे ऐकणे, वाचणे, विचित्र आणि क्लेशकारकही वाटते; पण असो. हे सत्य आहे. टेक्सासमध्ये आता महिला रस्त्यावर उतरल्या आहेत की, गर्भपाताच्या कालावधीवर पुनर्विचार करावा, तर दुसरीकडे ख्रिस्ती मान्यतेनुसार गर्भपात पापच आहे. त्यामुळे एक मत आहे की, गर्भपातास कायद्याने मान्यताच देऊ नये,
 
 
 
मग सहा आठवडे की आणखी आठवडे, हा प्रश्नच नाही. अफगाणिस्तानात काबूल आणि अमेरिकेत टेक्सास दोन्हीचे अक्षांश आणि रेखांश वेगळेच! तिथल्या स्त्रिया त्यांचे वैयक्तिक हक्क म्हणून रस्त्यावर उतरल्या, ते विषयही परस्पर अतिशय भिन्न. पण, या दोन्ही घटनांतला अंत:प्रवाह पाहिला, तर एक समानता मात्र दिसते. ती समानता म्हणजे काबूलच्या महिलेसाठी किंवा टेक्सासच्या महिलेसाठीही काय चांगले हे ठरवणारी तिथली तिथली धर्मसंबंधित कायदेशीर कठोर व्यवस्था. त्या व्यवस्थांनी ठरवले आहे की, ते ठरवतील तेच महिलांसाठी चांगले. त्यानुसार महिलांनी आपले जगणे त्यात चांगले बनवावे. काहीही असो. हे सगळे पाहून मात्र एक नक्की वाटते की, जगभरात सर्वत्र कितीही दडपशाही माजली तरी जोपर्यंत जग आहे, तोपर्यंत न्याय्य हक्कांसाठी लढणे, हा माणसाचा आतला आवाज मात्र कायम राहणार आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@