मुंबई - भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (सीपीआय) विद्यार्थी नेता कन्हैया कुमार मंगळवारी काँग्रेसमध्ये सामील झाला. त्याचवेळी, सीपीआयचे सरचिटणीस डी.राजा यांनी म्हणाले की, कन्हैया कुमारने स्वत:ला सीपीआयमधून हद्दपार केले आहे.
कन्हैया कुमारेने काॅंग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांनी त्याच्यावर हल्लाबोल केला आहे. कुमार हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाशी एकनिष्ठ नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राजा म्हणाले की, त्याने स्वतःला पक्षातून हद्दपार केले. कन्हैया पक्षात सामील होण्याच्या खूप आधी सीपीआय पक्ष सक्षम होता आणि तो गेल्यानंतरही तसाच राहील. कन्हैयाने राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली असून पक्षाला विश्वास आहे की कन्हैया काँग्रेसचा हात मजबूत करेल.मात्र, काॅंग्रेसमध्येच त्याला अप्रत्यक्ष विरोध होऊ लागला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी यांनी दोन ट्विटमध्ये विरोधात्मक संदेश दिला आहे. एका ट्विटमध्ये त्यांनी लिहिले - एक कम्युनिस्ट नेता काँग्रेसमध्ये सामील होत असल्याची अटकळ आहे. जितक्या जास्त गोष्टी बदलतील तितक्याच त्या तशाच राहतील. तर दुसऱ्या ट्विटमध्ये पंजाबी लोककथांची उदाहरणे देत अप्रत्यक्षपणे त्यांनी नेतृत्वाला सतर्क केले.
औपचारिकपणे पक्षात सामील झाल्यानंतर कन्हैयाने लोकशाही वाचवण्याची कैफियत मांडली. तो म्हणाला की, जर काँग्रेस टिकली नाही तर लोकशाही टिकणार नाही. तो काँग्रेसमध्ये सामील झाला आहे, कारण काँग्रेस महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, सरोजिनी नायडू यांचा वारसा चालवत आहे. काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी कन्हैयाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे योद्धा म्हणून संबोधले आणि त्याच्या आगमनाने काँग्रेस कार्यकर्ते उत्साहित होतील असा विश्वास व्यक्त केला.