सध्याच्या भौतिकव्यवस्थेत सारे जग बाह्य झगमगाटात वावरत आहे. सकाळपासून रात्रीपर्यंतचे सर्वांचे प्रयत्न केवळ शारीरिक भरण-पोषण, गृहसजावट आणि सांसारिक सुविधा वाढविण्याच्या कामी खर्च होत आहेत. आत्मशक्ती व ब्रह्मशक्ती या दोन चैतन्यतत्त्वांच्या प्राप्तीसाठी कोणीही प्रयत्न करीत नाही. म्हणूनच वेदांमध्ये म्हटल्याप्रमाणे केवळ बाह्य भौतिक सुविधांमध्ये न गुरफटता शाश्वत सुख व आनंदासाठी प्रयत्न करावयास हवेत.
मो षु वरुण मृन्मयं गृहं राजन्नहं गमम्।
मृला सुक्षत्र मृलय॥
(ऋग्वेद-७.८९.१)
अन्वयार्थ
(हे राजन्!) हे सर्वज्ञानप्रकाशक देवा! राजा! (वरुण) वरणीय देवा! (अहम्) मी (मृन्मयम्) मातीपासून बनलेल्या या (गृहम्) घराला, शरीराला, जड प्रकृतीला (उ) खरेच (सुगमम्) सुखकारक असे जीवनाचे ध्येय (मा) मानणार नाही. (मृला) हे सुखस्वरूपा! (सुक्षत्र) सर्व प्रकारची संकटे दूर करणार्या देवा! (मृलय) आम्हा सर्वांना सुख आणि शांतता प्रदान कर.
विवेचन
अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, असे आपण मानतो. म्हणूनच की काय यांच्या प्राप्तीसाठी जगात मोठे संघर्ष व युद्धेदेखील झाली आहेत. त्याचबरोबर या गरजा पूर्ण झाल्या की, माणूस सर्वदृष्टीने सुखी होतो, अशीदेखील आपल्याकडे धारणादेखील आहे. पण, या मूलभूत गरजा मिळूनसुद्धा खरोखरच माणूस सुखी झाला आहे का, याचे उत्तर निश्चितच नकारार्थी मिळेल. कारण, भौतिक सुविधा मिळूनदेखील तो नेहमीच अशांत, दु:खी व त्रस्त झाल्याचेच दृष्टीस पडते. हा आजचाच नव्हे, तर अगदी पूर्वीपासूनचा इतिहास आहे. वरील तिन्ही गरजा या मानवाच्या जगण्याची साधने आहेत, हे खरे आहे. पण, साध्य कदापि नव्हेत! दुर्दैवाने माणसाने साधनांनाच ’साध्य’ मानत त्यांना आपल्या जीवनाचे अंतिम उद्दिष्ट बनवले आहे. खरेतर या साधनांच्या माध्यमाने शाश्वत सुख आणि शांतता हे जीवनाचे अंतिम साध्य मिळवावयाचे आहे, हे मात्र माणूस विसरला आहे.
प्रस्तुत मंत्रात भगवंतासाठी राजन् (राजा), वरुण (वरणीय देव ), मृला (सुखस्वरूप ईश्वर) व सुक्षत्र (संकट निवारक) अशी चार विशेषणे आली आहेत. या चार विशेषणांद्वारे परमेश्वराची स्तुती व विनवणी करीत भक्त म्हणतो- हे परमेश्वरा, अहम् मृन्मयं गृहं उ मा (सु)गम्। अर्थात, मी या मातीच्या घराला माझ्या जीवनाचे अंतिम लक्ष मानणार नाही. माझ्यासाठी हे घर जीवनाचे उद्दिष्ट कदापि नव्हे.घर म्हणजेच निवार्याची जागा किंवा विश्रांतीचे स्थळ. घर हे असलेच पाहिजे. कारण, घरात राहूनच तर माणूस आपले कुटुंब आणि आपले जीवन व्यवस्थितपणे व्यतित करू शकतो; अन्यथा आपली दैनंदिन कामे होणार तरी कशी? खाणे-पिणे, झोपणे, आदरातिथ्य, मुलाबाळांची जडणघडण इत्यादी सर्व क्रियाकलाप कसे साध्य होणार? म्हणूनच तर सर्वांना घर हवे. चिखल, माती, सिमेंट, विटा, वाळू व इतरही आधुनिक साहित्यांचा उपयोग करीत वास्तुविशारदांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमाने आम्ही घरे बांधतो आणि तीही सर्व प्रकारच्या सुखसुविधांनी युक्त! आजकाल तर मोठ्या प्रमाणात सुंदर आलिशान अशी घरे बांधण्याची एक प्रकारे स्पर्धाच लागली आहे. गरीब असो की श्रीमंत त्याला छानसे घर हवे. हो, घर तर असायलाच हवे, पण सर्व काही घरच नाही. वेदादी शास्त्रांनी घरांची निंदा अजिबात केली नाही. अथर्ववेदात गृहनिर्माण कला प्रतिपादिली आहे. त्यात घरे कशी बांधावीत, यासंदर्भात मंत्रोद्धरणे आली आहेत. त्याचबरोबर घरांची रचना सुंदर, नीटनेटकी, सुव्यवस्थित असावी, असाही संकेत केला आहे. सहा वेदांगांपैकी ’कल्प’ या वेदांगात चार भागांत सूत्रग्रंथ विभागले आहेत. यातील ’गृह्यसूत्र’ विभागात ‘गृहनिर्मिती’ हा विषय वर्णिला आहे. यावरून आपणांस लक्षात येते की, भारतीय वास्तुकला कितीतरी विकसित स्वरूपाची होती. भारताचे प्राचीन गृहविज्ञान अतिशय प्रगत व उच्च पातळीचे होते, हे यावरून आपणांस निदर्शनास येते.
भिंतींनी युक्त घरांबरोबरच त्यात राहणारी आणखीही घरे आहेत. ती म्हणजे माणसाची शरीरे! भवनात राहणार्या या शरीररूप घरांची काळजी घेणे मोलाचे ठरते. भवन खूपच छान आहे, पण त्यात राहणार्या सदस्यांच्या भावना मलीन, कुत्सित, दोषयुक्त आणि विवेकहीन असतील, तर ती भवने काय कामांची? घर सुंदर आहे, पण घरात निवास करणारे मानवरूप ’घर’ जर काय शारीरिक व मानसिकदृष्ट्या विविध रोगांनी ग्रस्त असतील, तर बाह्य घरांचा काय उपयोग? म्हणूनच घर व शरीर हे दोन्हीही महत्त्वाचे ठरतात. शास्त्रीय दृष्टिकोनातून मानवी पिंडाबरोबरच ब्रह्मांड हेदेखील एक महान घर आहे. या विशाल ब्रह्मांडालाच आपण ‘सृष्टी’ किंवा ‘प्रकृती’ म्हणतो. या समग्र सृष्टीरूप घरात आपण सर्व प्राणिमात्र जीवन जगतो. असंख्य जीवात्मे निरनिराळी शरीरे धारण करून या सृष्टीगृहात आवागमन करीत असतात. इथे काही दिवस राहतात आणि आपली यात्रा संपूर्ण परत निघून जातात.घर कोणतेही घ्या, मग ते शरीररुप असो की निवासरुप असो अथवा सृष्टीरूप असो, या तिन्ही घरांची निर्मिती पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांनीच होते. या महाभूतांमध्ये पृथ्वी म्हणजेच ’माती’ हिचा क्रम सुरुवातीला आहे. म्हणूनच कदाचित मंत्रात या तिन्ही घरांना ‘मृन्मयं गृहम्’ असे विशेषण आले आहे. मातीपासून निर्माण झालेले घर चेतन नसते, ते तर जड असते. चेतन असतो तो आत्मा! शरीर धारण केलेला आत्मा जर अज्ञान, अविद्या आणि नानाविध दुर्गुणांनी ग्रासला आणि या तिन्ही शरीरांच्या बाह्य मोहात गुरफटला, तर तो दुःखसागरात सापडेल. शाश्वत सुखापासून वंचित राहील. जन्मोजन्मीच्या पुण्याईने मानव शरीर धारण करून जर या मातीपासून बनलेल्या तिन्ही घरांच्या जडावस्थेत अडकून राहिला, तर त्याचे जीवनदेखील जडवतच बनेल. चेतन आत्मतत्त्व आणि महाचेतन परमात्मतत्त्व यांच्यापासून मिळणार्या शाश्वत सुखापासून तो निश्चितच वंचित राहील. आज वेदमंत्रात स्पष्ट म्हटले आहे - या मातीच्या घरात राहण्याचा मोह मला नको! मला तर सुख व शांतता प्रदान करणारे चैतन्यदायी ज्ञान हवे आहे. समग्र विश्वात व्यापलेली चेतन महासत्ता म्हणजेच परब्रह्म! या परब्रह्माच्या शाश्वत आनंदात मला राहावयाचे आहे. याकरिता भौतिक सुख-सुविधा आणि ऐश्वर्याने भरलेल्या या तिन्ही घरांना आपले अंतिम उद्दिष्ट न समजता किंवा साध्य न मानता त्यांना केवळ साधन समजून त्यांचा उपयोग या जीवनरूपी प्रवासाची इतिश्री करण्यासाठीच करावयास हवा.
सध्याच्या भौतिकव्यवस्थेत सारे जग बाह्य झगमगाटात वावरत आहे. सकाळपासून रात्रीपर्यंतचे सर्वांचे प्रयत्न केवळ शारीरिक भरण-पोषण, गृहसजावट आणि सांसारिक सुविधा वाढविण्याच्या कामी खर्च होत आहेत. आत्मशक्ती व ब्रह्मशक्ती या दोन चैतन्यतत्त्वांच्या प्राप्तीसाठी कोणीही प्रयत्न करीत नाही. म्हणूनच वेदांमध्ये म्हटल्याप्रमाणे केवळ बाह्य भौतिक सुविधांमध्ये न गुरफटता शाश्वत सुख व आनंदासाठी प्रयत्न करावयास हवेत. कारण, आजपर्यंत धनैश्वर्याने किंवा भौतिक साधनांच्या हव्यासाने कोणीही सर्वदृष्टीने सुखी व शांतपणे झाला नाही आणि भविष्यातही होणार नाही.
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य