हिंदू वारसा मास : अमेरिकेतच का?
29-Sep-2021
Total Views |

आता अमेरिकेतील फ्लोरिडा, टेक्साससारख्या राज्यांमध्ये येणारा ऑक्टोबर महिना ‘हिंदू हेरिटेज मंथ’ म्हणून साजरा केला जाणार आहे. एखाद्या वाईट गोष्टीतून चांगले घडते ते हे असे.
अमेरिकेतही अपयशी ठरलेल्या ‘डिस्मँटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या परिषदेचे एक यश मात्र मान्य करावेच लागेल. ते यश म्हणजे या परिषदेमुळे अमेरिकेतील भारतीयांना आणि प्रामुख्याने हिंदूंना ‘हिंदू हेरिटेज मंथ’ म्हणजेच ‘हिंदू वारसा मास’ साजरा करण्याची कल्पना सुचली. आता अमेरिकेतील फ्लोरिडा, टेक्साससारख्या राज्यांमध्ये येणारा ऑक्टोबर महिना ‘हिंदू हेरिटेज मंथ’ म्हणून साजरा केला जाणार आहे. एखाद्या वाईट गोष्टीतून चांगले घडते ते हे असे. आता अमेरिकेतील हिंदूंना, अमेरिकन लोकांसमोर विविध कार्यक्रमांद्वारे हिंदू वारसा, हिंदू धर्म, हिंदू चालीरीती, हिंदू परंपरा, हिंदू धर्मामागील वैज्ञानिक विचार, हिंदू तत्त्वज्ञान, हिंदूमूल्य अधिक प्रकर्षाने मांडता येतील. संगोपन करणं हे विध्वंस करण्यापेक्षा कठीण कार्य असते. संगोपनासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागत असतात. त्याचवेळी संगोपन, संवर्धन करण्याची संधी मिळणं, ते करावेसे वाटणे हेही तितकेच महत्त्वपूर्ण असते.
खरं तर हिंदू परंपरा, चालीरीती, हिंदू सणवार वा ‘हेरिटेज’ फक्त अमेरिकेतच साजरा करणं पुरेसे नाही. ‘हिंदू हेरिटेज मंथ’ सर्व जगात जिथे जिथे हिंदू माणूस पोहोचला आहे, अशा सर्व देशांमध्ये साजरा होणं आवश्यक आहे. जगाला आज कधी नव्हे, इतकी हिंदू तत्त्वज्ञानाची गरज आहे आणि हिंदू तत्त्वज्ञानाची, वारशाची जपणूक, संगोपन, संवर्धन करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हिंदू धर्माचं संगोपन, संवर्धन करणे होय.
अद्वितीय हिंदू धर्म वारसा
हिंदू वारसा, हिंदू धर्माच्या माध्यमातून सहजपणाने संवर्धित करता येऊ शकतो. कारण धर्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग ही साधी संकल्पनादेखील, फक्त हिंदू धर्म, हिंदू तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून हजारो वर्षांपासून जगाला सांगतो आहे. पाश्चात्त्य लोकांसाठी धर्म म्हणजे उपासना पद्धती. त्यामुळे त्यांच्यासाठी उपासना आणि जगण्याची धडपड किंवा जगण्याचा मार्ग, या दोन वेगवेगळ्या गोष्टी ठरतात. भारतीयांसाठी धर्म म्हणजे जीवन पद्धती ज्यात उपासना पद्धती, प्रथा यांचा अंतर्भाव होतो. ‘धर्म’ या विस्तृत संकल्पनेत जीवन कसं जगावं, हे सांगणारे तत्त्वज्ञान हे उपासना पद्धतीपेक्षा अधिक महत्त्वाचे असते, असे हिंदू धर्मात मानले आहे. त्यामुळे अत्याचारी, जुलमी माणूसदेखील जर दर रविवारी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करणारा किंवा दिवसाला पाचदा नमाज पढणारा असेल, तर त्या धर्मानुसार धार्मिक असू शकतो. परंतु, हिंदू धर्मानुसार इतरांवर अत्याचार करणारा माणूस धार्मिक असूच शकत नाही.
प्रागतिक धर्म विचार
हिंदू धर्म मुळातच प्रागतिक आहे. लवचिकता हे हिंदू धर्माचे एक वैशिष्ट्य आहे. त्याचवेळी हिंदू देवता या नेहमीच शस्त्रधारी आहेत. जीवन जगणं हे सोपं करणारं प्रत्येक आयुधं, यंत्र हे हिंदू जगण्याच्या पद्धतीत अंगीकारलेले तत्त्व आहे. तसेच प्रत्येक देवतेची विविध यंत्रे, शस्त्रे हाताळण्याचे प्राधान्य व कौशल्य आहे. जसे महादेवाचं त्रिशूळ. यंत्र, शस्त्र हाताळणारी देवता हा विचारच मुळात प्रागतिक आहे. मानवाला असलेल्या निसर्गदत्त मर्यादा लक्षात घेऊन ही प्रतीकं आखली गेली आहेत. अर्थात, शस्त्र हातात आहे म्हणून वाटेल तो विध्वंस करणे या तत्त्वज्ञानाला, या धर्माला मान्य नाही. तसेच दुसर्याच्या श्रद्धांना तुच्छ समजणे, त्यांना अपमानित करणे, शस्त्रबळावर इतरांवर अत्याचार करणे, हेही हिंदू धर्मात बसत नाही. अकारण केलेली हिंसा, अथवा ज्यातून काहीही निष्पन्न निघणारे नाही अशी हिंसा किंवा संघर्ष, या धर्मात मान्य नाही. जीवन जगण्याकरिता, जीवनाचे संगोपन करण्यासाठी केलेली हिंसा मात्र अपवाद म्हणून मान्य आहे. त्यामुळेच, ‘अहिंसा परमो धर्म: धर्म हिंसा तथैवच’ असं वचन हिंदू धर्मातच आढळते.
इथे शस्त्रांचं, यंत्रांचं जसं महत्त्व आहे, तसेच महत्त्व निसर्गाचेदेखील आहे. पंचमहाभूतांचे अस्तित्व आणि महत्त्वदेखील हिंदू धर्मातच विशेषत्वाने सांगितलेले दिसते. माणसाचे जीवनच निसर्गावर अवलंबून आहे, त्यामुळे पृथ्वी, आकाश, वायू, अग्नी, जल यांची उपासना सांगितली आहे. निसर्गाचे महत्त्व समजून हिंदू धर्मातील सगळे सण, सगळे उत्सव, सगळ्या प्रथा या निसर्गाशी तादात्म्य पावायला सांगणार्या आहेत. निसर्गाचा विध्वंस करून मानव सुखी होऊ शकत नाही, त्यामुळे निसर्गाचं संवर्धन करणे म्हणजेच ‘धर्म’ ही संकल्पना आहे. ज्ञानेश्वर माऊलीदेखील ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे’ असं आपल्या अभंगात सांगतात. ‘सर्वेत्र सुखीन: संतू, सर्वे संतू निरामया:’ अशी जगाच्या कल्याणाची हाक आणि ग्वाही देणारा हा जीवन मार्ग आहे.
सर्वसमावेशक हिंदू धर्म वारसा
हिंदू धर्माची शिकवण सहजीवनाचा स्वीकार करणारी आहे. आपल्या उपासना पद्धती वेगळ्या असतीलही; पण तरीही सहजीवन सहज शक्य आहे हे सांगणारा हा धर्म आहे. सहजीवनाची पुढली पायरी म्हणजे सर्वसमावेशकता!हिंदू धर्म सर्वसमावेशक आहे. अनेक पंथ, उपासना पद्धती, अनेक वाद, अनेक देवता, अनेक मार्ग या हिंदू धर्मात सामावलेले आहेत. आस्तिक असो किंवा नास्तिक, सगळे माझे आहेत आणि सगळ्यांना मोक्षप्राप्ती होणार आहे. सगळ्यांची उत्क्रांती होणार आहे. आधी किंवा उशिरा. पण, तो परमात्मा सगळ्या प्रयत्न करणार्यांना प्राप्त होणारच आहे. असा सगळ्यांच्या कल्याणाचा सर्वसमावेशक, अत्यंत उदार, सहिष्णू, इतर धर्मांचा सन्मान करणारा, धर्म म्हणजे हिंदू धर्म होय. हिंदू वारसा म्हणजेच हिंदू धर्म होय. अध्यात्म, वेदांत, योगशास्त्र, आयुर्वेद ही आमची धरोहर आहे. प्राणायाम, ध्यान धारणा हे स्वतःला उत्क्रांत करण्याचे तंत्र आहे. प्रचंड मोठा पसारा असणार्या या धर्माविषयी सर्वसाधारण माणसाला फक्त माहिती घ्यावीशी वाटली, तरी एक जन्म पुरणार नाही.
हे सगळे याहूनही विस्तृत स्वरूपात जगाला सांगणे आज आवश्यक ठरते आहे. आधीच इस्लामच्या आक्रमकतेने जगापुढील आव्हानांमध्ये मोठी वाढ केलेली आहे. ख्रिस्ती आणि इस्लामच्या विस्तारवादी धोरणामुळे जागतिक शांतता व सलोखा संपल्यात जमा आहे. याही स्थितीत, हिंदू धर्म इतर धर्मांचा सन्मान करायला शिकवतो. जगात ‘इतर धर्मांप्रति सहनशीलता’ हा शब्द वापरला जातो. हिंदू धर्म इतर धर्मांचा सन्मान करायला शिकवतो, हे प्रकर्षाने जगापुढे पुनःपुन्हा मांडण्याची गरज आहे. इतर धर्मांचा सन्मान करतो, याचा अर्थ हे दुबळ्यांचं, नेभळ्यांचं तत्त्वज्ञान नाही, हे यातूनच जगाला दिसून येईल.दुर्दैवाने आज हिंदू धर्माविषयी हिंदूच अज्ञानी आहेत. त्यांनाच या धर्माच्या थोरवीची जाणीव राहिलेली नाही. जातीपातीच्या आणि आत्मश्लाघेच्या नशेत हिंदू माणूसच स्वधर्म निंदा करण्यात धन्यता मानतो आहे. ही निंदा जर समाजसुधारणेसाठी किंवा धर्मसुधारणेसाठी असेल तर तीही हिंदू धर्मात स्वीकारल्याची अनेक उदाहरणे आहेत.
दुर्दैवाने हिंदू धर्मातील अनेक पंथ आज स्वतःला वेगळा धर्म मानत आहेत. वास्तविक पाहता बौद्ध, जैन, शीख हे हिंदू धर्माचेच पंथ आहेत. पण, साम्यवादी वैचारिक दिवाळखोरीने ग्रस्त इतिहास लेखक, पाठ्यक्रम व क्रमिक पुस्तके ठरवणारे तथाकथित शिक्षणतज्ज्ञ, आणि स्वार्थ प्रेरित काँग्रेस शासनाने अवघ्या चार दशकांत हा देश आणि महान हिंदू धर्म संपवण्यात अजिबात कसर सोडलेली नाही. राम मंदिरासाठी हिंदू समाजाने देशात दिलेला दीर्घकालीन लढा आपल्याला माहीत आहे. अशी अनेक मंदिरे आणि श्रद्धास्थाने आजही उपेक्षित आहेत. यावर आज जरी सरकार काही उपाययोजना करताना दिसत असले, तरी त्या सुधारणांचा वेग अतिशय धीमा आहे. सरकारला उपजत असलेल्या मर्यादा लक्षात घेता याकामी जनतेनेच पुढाकार घेतला पाहिजे. या देशातदेखील हिंदू धर्म जागृती होणे, आपल्या ‘हेरिटेज’विषयी जागृती होणे आवश्यक आहे. ‘हिंदू हेरिटेज मंथ’ किंवा ‘हिंदू वारसा मास’ यामुळेच या देशातदेखील साजरा केला पाहिजे.
- डॉ. विवेक राजे