भय इथले संपत नाही... सांस्कृतिकतेकडून विकृतीकडे!

कल्याण-डोंबिवली शहरामध्ये महिला अत्याचारांचे सत्र सुरूच

    28-Sep-2021
Total Views |

KDMC_1  H x W:
 
 
डोंबिवली (जान्हवी मोर्ये) : डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर ३३ आरोपींनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आणखी दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याची घटना सोमवार, दि. २७ सप्टेंबर रोजी उघडकीस आली आहे. शिकवणी घेणाऱ्या १५ वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची घटना टिळकनगर पोलीस ठाण्यात, तर १३ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत घडल्याने कल्याण-डोंबिवलीत महिला अत्याचारांच्या घटनेचे सत्र अद्याप सुरूच असल्याचे दिसत आहे. या सर्व घटनांमुळे डोंबिवली या सांस्कृतिक नगरीला आता विकृतीचे ग्रहण लागले आहे का, असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.
 
 
Chart_1  H x W:
 
 
डोंबिवली पश्चिमेत १३ वर्षीय मुलगी हरवल्याची तक्रार विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या तक्रारीनुसार विष्णुनगर पोलिसांनी तपासाची सूत्रे हलविली. त्यांनी मोबाईल ‘लोकेशन’ आणि गुप्त बातमीदारांकडून माहिती काढत आरोपीला ठाण्यातून अटक केली. तसेच पोलिसांनी अपहरणकर्त्याच्या तावडीतून मुलीला सोडवत तिच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. अक्षय तुकाराम महाडिक (२१) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या चौकशीकरिता त्याने या मुलीला भिवंडीतील एका घरात कोंडून ठेवल्याची माहिती दिली. आरोपीला कल्याण न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
 
विनयभंग, छेडछाड किंबहुना बलात्कार यांच्या तक्रारीमध्ये वाढ होत असली, तरी त्यांच्यावर अंकुश आणण्यासाठी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाला यश येत नसल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून होत आहे. मुंबई साकीनाकानंतर डोंबिवलीत घडलेल्या बलात्काराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले. या गुन्ह्यात तब्बल ३३ आरोपींचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे. कल्याण परिमंडळ-३ या क्षेत्रामधील अशा प्रकारच्या घटनेचा आढावा घेता ही दोन्ही शहरे अशा घडणाऱ्या घटनेने बदनाम होत असल्याचे पाहायला मिळते. डोंबिवलीला ‘सांस्कृतिक उपराजधानी’ म्हणून ओळख आहे. मात्र, महिला अत्याचारांच्या घटनेने या प्रतिमेलाच काळे फसल्याचे बोलले जात आहे.
 
महिलांवर हल्लेही झाल्याच्या घटना
 
काही दिवसांपूर्वी मोबाईल चोरणाऱ्यांच्या मागे धावण्याच्या प्रयत्नात असताना डोंबिवलीतील एका महिलेचा बळी गेला होता. लोकल प्रवासादरम्यानही महिलांवर अनेकदा हल्ले घडल्याचा इतिहास आहे. गेल्या काही वर्षांतील घटनांचा आढावा घेतला असता लग्नाचे आमिष दाखवून काही महिलांवर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे.
 
प्रभावी उपाययोजनांची गरज
 
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण-डोंबिवलीत अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास नुकतेच आणून दिले आहे. “गुन्हे घडण्यामागे अमली पदार्थांचा वापर हीदेखील एक महत्त्वाची बाब आहे. अमली पदार्थांच्या सेवनामुळे नशेमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना घडतात. मुलांच्या आणि मुलींच्या दोघांच्या ही आई-वडिलांनी सजग राहिले पाहिजे. आपले पाल्य वेळेत घरी येते की नाही, ते पाहिले पाहिजे. वेळेत घरी येत नसल्यास त्यांच्यावर बंधने आणली पाहिजे. मुलींना फसवून अनेकदा एखाद्या रुमवर नेले जाते, त्या ठिकाणच्या मालकांनी घर भाड्याने देताना संबंधित व्यक्तीची योग्य प्रकारे तपासणी केली पाहिजे. त्या व्यक्तीची माहिती पोलीस ठाण्याला दिली पाहिजे,” असे ते म्हणाले.
 
सरकारचे नियंत्रण नाही
 
भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले की, “सध्या महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वर्तमानपत्रे उघडली की याच घटना वाचायला मिळत आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. महिला असुरक्षित असल्याने त्यांच्यामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. सरकार या विषयावर बोलायला तयार नाही. सरकारकडून केवळ सत्ता वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकारचे कशावरही नियंत्रण नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यावर अंमलबजावणी झाली पाहिजे. व्यसनाधीनतादेखील समाजात वाढत आहे. महिला अत्याचार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना झाल्या पाहिजेत,” असे मत त्यांनी व्यक्त केले.