तपस्वी स्वयंसेवक

    28-Sep-2021
Total Views |

rss 2_1  H x W:
मुलुंड येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामचंद्र दत्तात्रय आचार्य उपाख्य राजाभाऊ यांचे दि. २२ सप्टेंबर रोजी निधन झाले.
१९५२ ते १९८० या कालावधीत त्यांचे वास्तव्य चेंबूर परिसरात होते. संघ स्वयंसेवक ते भाग कार्यवाह पदापर्यंत त्यांनी संघकार्य केले. सन १९८१ पासून राजाभाऊंचे वास्तव्य मुलुंड येथे होते. संघाच्या वेगवेगळ्या स्तरावरच्या जबाबदार्‍या त्यांनी पार पाडल्या. १६ वर्षांहून अधिक काळ त्यांनी मुलुंड भागाच्या कार्यालयाची कार्यालय प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या संमिश्र असणार्‍या या भागात आपल्या स्वभाववैशिष्ट्यातून आदराचे स्थान मिळवले. मुलुंड-भांडुपमधील प्रत्येक स्वयंसेवकाच्या कुटुंबाशी त्यांची नाळ जुळली हेाती. संघपूरक कामाच्या दृष्टीने ‘विवेक’ या परिवाराच्या साप्ताहिकाचा प्रचार-प्रसार व ग्राहक नोंदणी व सेवा हा त्यांच्या कार्याचा वेगळा आयाम होता. त्यांना ’विवेक’तर्फे विशेष पुरस्कारही देण्यात आला होता.

संघशिक्षा वर्ग व हिवाळी शिबिरे यशस्वी होण्यासाठी विविध प्रकारच्या व्यवस्था असतात. राजाभाऊंनी सुमारे १२ संघशिक्षा वर्ग व २२ हिवाळी शिबिरांमध्ये उपस्थिती राखून विविध प्रकारच्या व्यवस्थांची प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली होती. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघसेवकाची जबाबदारी राजाभाऊंनी पार पाडली.

‘चरैवति! चरैवति! यही तो मंत्र हैं। नही रुकना, नही थकना, सतत चलना सतत चलना।’ हा मंत्र जपत राजाभाऊ आचार्य संघपथावर चालत राहिले. राजाभाऊंच्या संघकामात त्यांच्या पत्नीचीही त्यांनी तेवढीच सोबत होती. राजाभाऊंच्या तीन विवाहित मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.राजाभाऊंच्या कार्याची जाणीव प्रत्येक संघ स्वयंसेवकाच्या मनात घर करुन राहील. अशा वंदनीय, संघ तपस्वी राजाभाऊंना शत शत नमन!


- संतोष कुलकर्णी