
गोरेगावकरांचे ऊर्जास्थान पांडुरंगवाडी स्थित मसुराश्रम. प. पू. विनायक महाराज मसुरकर यांच्या निधनानंतर पांडुरंगवाडी, गोरेगाव येथे सन १९५५ साली सुंदर समाधी मंदिर उभारण्यात आले. येथूनच संस्थेचे सध्याचे कार्य सुरू आहे. संस्थेच्या सर्वव्यापी कार्याचा घेतलेला हा मागोवा...सायंकाळी नित्यनेमाने ७ वाजता गोरेगावमधील पांडुरंगवाडी परिसरामध्ये घंटानादाचे पवित्र ध्वनी घुमू लागतात आणि त्यामागून प्रभुरामचंद्रांच्या आरतीचे सुस्वर प्रकटतात...जय देव जय देव रघुकुळ टिळका आरती ओवाळू त्रिभुवननायका॥
आरतीच्या त्या पवित्र सुरांचे स्रोत म्हणजे मसुराश्रम. मसुराश्रमाची स्थापना १९२० मधील आहे. मसुराश्रमाच्या स्थापनेमागे, लोकमान्यांच्या हिंदुत्ववादी विचारांची प्रेरणा आहे. लोकमान्य टिळक हयात असताना, टिळक आणि प. पू. विनायक महाराज मसुरकर या दोघांमध्ये याविषयी अनेक चर्चासत्रे घडली. लोकमान्यांच्या मृत्यूदिनी म्हणजे दि. १ ऑगस्ट, १९२०या दिवशी मसुरकर महाराजांनी, मसूर (जि. सातारा) येथे मसुराश्रमाच्या स्थापनेची घोषणा केली. मसुराश्रमाचे कार्य प्रत्यक्षरीत्या सुरू होण्यासाठी मात्र पुढची दहा वर्षे जावी लागली. प. पू. मसुरकर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली (१९३० ते १९५० ) या काळामध्ये मसुराश्रमाचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू होते. परंतु, तत्कालीन ब्रिटिश राजवटीमध्ये आश्रमावरील जप्ती, ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादातून आश्रमीय मालमत्तेची जाळपोळ आणि ब्रिटिश शासनाचा आश्रमकार्यावर असलेला कडवा विरोध यामुळे नंतरच्या काळात मसूर (जि.सातारा) स्थित आश्रमाचे कार्य बरेचसे आक्रसले गेले. मात्र पुढे, पांडुरंगवाडी येथील १९५५ साली उभारलेल्या मसुराश्रमाच्या वास्तूमधून, लोकमान्यांचे अंगीकारलेले विचार आणि प्रखर हिंदुत्वाची ध्वजा घेऊन संस्थेचे कार्य अव्याहत सुरू आहे.प. पू. मसुरकर महाराजांच्या पश्चात आश्रमकार्याची धुरा त्यांच्या अधिकारी शिष्यांनी मोठ्या हिमतीने सावरली. या शिष्यांमध्ये स्व. ब्रह्मचारी दत्तमूर्ती, शिवराम स्वामी, ब्र. हरिहर महाराज, भालचंद्र शिवराम तथा काका जोशी आणि नंतरच्या काळात धर्माचार्य ब्र. विश्वनाथजी यांचा अंतर्भाव प्रामुख्याने होतो. मसुराश्रमाचे काम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने चालते. धार्मिक विधी अत्यंत काटेकोरपणे पार पाडणे, संस्थेचे विविध उपक्रम सुरू असताना वेळेचे बंधन पाळणे, नित्योपासना, सातत्य आणि अखंड अविरत कार्य, हे मसुराश्रमाचे वैशिष्ट्य आणि वैभव आहे. प. पू. मसुरकर महाराज यांच्या शिकवणीनुसार मसुराश्रमामध्ये काही महत्त्वाची कामे नेमाने होणे अपेक्षित आहे.१. बलोपासना- सूर्यनमस्कार व योगप्रसार, लहान मुले व तरूणांकरिता शिबिरे आयोजित करणे. २ . दासबोध व ज्ञानेश्वरी ग्रंथांचे सूर्यनमस्कार उपासनेच्या नेमून दिलेल्या अटीनुसार तरूणांना या ग्रंथाचे विनामूल्य वितरण. 3. प्रवचने, कीर्तने, सभा-संमेलन यातून राष्ट्रीय व विशेषत: हिंदू विचारांचा प्रसार व प्रचार करणे. 4. नियतकालिके प्रसिद्ध करून त्याद्वारे हिंदू विचारांचा प्रसार व प्रचार करणे. 5. परधर्मीय आक्रमणापासून हिंदू समाजास जागृत करणे व अशा आक्रमणांना प्रतिबंध करणे. ६ . परधर्मात छळाने, बळाने वा आमिषाने बळी पडलेल्या, परधर्मात गेलेल्या आपल्या हिंदू धर्मबांधवांना पुन्हा हिंदू धर्माची भिक्षा देणे व हिंदू धर्मांमध्ये सन्मानाने समाविष्ट करणे इत्यादी.मसुराश्रम या धर्मादाय संस्थेचे विश्वस्त मंडळ अतिशय कार्यशील आहे. डॉ रामकृष्ण पाटील, अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आ. अतुल भातखळकर संस्थेच्या अनेक उपक्रमांमध्ये जातीने लक्ष घालले असतात. विश्वस्त-कोषाध्यक्ष आणि सचिव दिलीप येरूणकर यांच्या सहभागाने आणि मार्गदर्शनानुसार संस्थेचे नित्यकार्य सुरळीतपणे सुरू आहे. विश्वस्त आणि निवासी कार्यकर्ते भाऊराव पाटील यांची संस्थेच्या कार्यावरील देखरेख आणि करडी नजर असते.मसुराश्रमामध्ये नित्यनेमाने विविध कार्ये केली जातात.१. योगप्रसार- सकाळी ६.३० ते ७.३० सर्वांसाठी नियमितपणे योगप्रसार वर्गांचे आयोजन केले जाते. याअंतर्गत विविध शिबिरांचे आयोजन केले जाते. २. राष्ट्रीय व धार्मिक प्रवचनांचे आयोजन केले जाते. ३. हिंदू धर्मीयांसाठी नित्य व नैमितीक उपासना. ४. परधर्मात गेलेल्या आपल्या हिंदू धर्मबांधवांना परत हिंदू. धर्मात आणण्यासाठी प्रयत्न करणे त्यासाठी आवश्यक विधी व शासकीय कार्यवाही करणे. सन १९२८ ते १९३२ या चार वर्षांमध्ये गोव्यामध्ये जवळपास दहा हजार परावर्तित ख्रिश्चन, जे मुळात हिंदू होते, अशांचे शुद्धीकरण करून पुन्हा हिंदू धर्मामध्ये आणण्यात आले. आता वर्तमान काळामध्ये दरवर्षी जवळपास १५० ते २०० वैयक्तिक अथवा कौटुंबिक शुद्धीकरणाची कार्य होत असतात. या कार्यामध्ये मसुराश्रमाबरोबरच बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि संघ यांचा सक्रिय सहभाग असतो. ५ . लहान मुलांसाठी रोज सायंकाळी संस्कार वर्ग चालविले जातात. ६. मसुरकर महाराजांच्या समाधीस्थळी जयंती उत्सव, पुण्यतिथी महोत्सव, गुरूपौर्णिमा आदी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ७. इतर राष्ट्रीय पुरूषांच्या जन्म/स्मृतिदिनी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ८. यज्ञ उत्थापानार्थ वेळोवेळी यज्ञांचे आयोजन केले जाते.रोज सकाळी प. पू. मसुरकर महाराजांच्या पादुकांची विधिवत पूजा केली जाते. दुपारी देवांना महाप्रसाद अर्पण केला जातो. संध्याकाळी कलावती आईंचे भजन म्हणण्यासाठी रोज ३०-३५ स्त्रिया सहभागी होतात. हा उपक्रम गेले ३५ वर्षे अखंड सुरू आहे, हे विशेष. सायंकाळी ७ वाजता आरती, प्रसादाचे वाटप आणि त्यानंतर कराटे क्लासेसचा लाभ अनेक जण घेत आहेत. काही वर्षांपूर्वी ’मसुराश्रम पत्रिका’ नावाच्या इंग्रजी नियतकालिकाचे प्रकाशन केले जात असे. त्या मासिकाचे जगभर वर्गणीदार होते आणि जगभर ते वितरित केले जाई. या मासिकाच्या माध्यमातून प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा प्रसार आणि प्रचार केला जात असे. ’धर्मभास्कर’ या मराठी मासिकाचे प्रकाशन करून, त्याद्वारे हिंदू विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्याचे अखंड कार्य सुरू आहे. गेल्या दोन वर्षातील ‘कोविड’ प्रतिबंधात्मक नियमावलीमुळे या कार्यामध्ये थोडा खंड पडला आहे, परंतु ’धर्मभास्कर’ चे प्रकाशन लवकरच पुन्हा सुरळीतपणे सुरू होईल. मसुराश्रमामध्ये दरवर्षी दासनवमीचे औचित्य साधून दासबोधाचे सामूहिक वाचन केले जाते. अनेक उपासक सात्विकतेने यामध्ये सहभागी होत असतात. सज्जनगडाहून आलेल्या रामदास स्वामींच्या पादुकांचा प्रसार व प्रचार दौरा मसुराश्रमाकडून आयोजित केला जातो. हिंदू धर्माच्या प्रसार-प्रचारासाठी काही विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मसुराश्रमातर्फे करण्यात येते. यामध्ये २ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर २०१७ यादिवसांमध्ये ’भागवत सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आले होते. पश्चिम उपनगरांमध्ये भव्यस्वरूपात हा सप्ताह आयोजित व्हावा, हे मसुराश्रमाचे उद्दिष्ट होते. गोरेगावमधील अनेक हिंदूभक्त, सहृदय दाते एकत्र येऊन भव्यस्वरूपात आयोजन केले गेले. मसुराश्रमासमोरील पटांगणात भव्य मंडप उभारला गेला. पहिल्याच दिवसापासून उत्तम प्रतिसाद मिळत गेला. सज्जनगडाहून आलेल्या मकरंदबुवा रामदासी यांचे प्रवचन ऐकणे हा मोठा पुण्यसोहळा होता. पहिल्याच दिवशी ७०० रसिक भक्तांनी लाभ घेतला आणि उत्तरोत्तर दिवसागणिक ही संख्या वाढत जाऊन जवळपास १२०० भक्तांपर्यंत पोहोचली. दररोज मुंबईच्या उपनगरांमधून शेकडोंच्या संख्येने भक्त सायंकाळी ५वाजता येत असत आणि रात्री ८.३० पर्यंत प्रवचनाचा लाभ घेत असत. एवढ्या संख्येने उपस्थित असलेल्या भक्तांसाठी चहा-पाण्याची मोफत व्यवस्था करण्यात येत असे. सप्ताहाला उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना प्रसाद मिळायलाच हवा, असा मकरंद बुवांचा शिरस्ता होता आणि ते तसे घडावे, याकडे आयोजकांचे जातीने लक्ष असे. असे अनेक अविस्मरणीय धार्मिक सोहळे मसुराश्रमामुळे हिंदू धर्मीयांनी अनुभवले आहेत. प. पू. मसुरकर महाराजांनी १९२० साली योजिलेले हिंदू धर्म प्रसार-प्रचाराचे कार्य अजूनही अव्याहत सुरू आहे आणि या कार्याची व्याप्ती वाढावी, यासाठी विश्वस्त मंडळ विशेष प्रयत्नशील आहे. उत्कृष्ट पुरोहितांची निर्मिती व्हावी यासाठी पुरोहित वर्ग भरवावे, संस्थेचे स्वतःचे भव्य आध्यात्मिक ग्रंथालय असावे, मोठ्या स्वरूपात योगवर्गांचे आयोजन करण्यात यावे, मुलांसाठी मोठ्या प्रमाणावर संस्कार वर्ग भरवता यावेत, शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या जागेवरच मसुराश्रमाच्या नवीन भव्यवास्तूची निर्मिती व्हावी, ही भावी योजना आहे. धर्म एव हतो हन्ति
धर्मो रक्षति रक्षितः।
तस्माद्धर्मो न हन्तव्यो
मा नो धर्मो हतोऽवधीत् ॥
- वीणा सामंत