स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे
28-Sep-2021
Total Views |

नुकताच स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचा जन्मदिन संपन्न झाला. ज्येष्ठ गायिका म्हणून त्यांनी संगीतक्षेत्रात अढळ स्थान प्राप्त केले आहे. त्यांच्या संगीतक्षेत्रातील योगदान शब्दातीत. त्यांच्या संगीतसाधनेला माझे नमन!भारतीय संगीताच्या परंपरेत अनेक विद्वान आणि गुणी लोकांनी आपापल्या पद्धतीने योगदान दिलेले आहे. अशा विचारशील कलाकारांमध्ये ‘किराणा’ घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचे स्वत:चे असे वेगळे स्थान आहे. सतत चिंतन आणि मनन करून, त्याचे लेखन करून स्वत:चे विचार त्यांनी जतन केले. संगीतशास्त्र, प्रस्तुती, त्यांचे चिंतन, रचना याविषयांवर त्यांनी व्याख्यानशृंखला दिलेली आहे. त्यातील काही मुद्दे मी या त्यांच्यावरील लेखात सांगणार आहे.डॉ. प्रभाताईंकडे संगीतशिक्षण घेण्याचे भाग्य मला लाभले. त्यात त्यांनी मला त्यांच्या सुंदर बंदिशी, ‘किराणा’ गायकी, विचारशीलता व सर्जनशीलतेचे उत्तम ज्ञान दिले. ‘आलाप’, ‘बोलआलाप’, ‘तान’, ‘बोलतान’, ‘सरगम’ यांचा प्रयोग गाताना कसा करायचा, संगीताच्या विविध घाटात तो कसा वापरायचा, याचे ज्ञान त्यांनी मला दिले. शास्त्रीय संगीताबरोबरच ‘ठुमरी’, ‘दादरा’, ‘चैती’, ‘कजरी’, ‘होरी’, ‘सावनी’ हे उपशास्त्रीय संगीत प्रकार आणि गजल, भजन, भावगीत या त्यांच्या बंदिशी अतिशय श्रवणीय आहेत. ‘जिया मोरी ना लागे’, ‘रंग डार गयो मोपे’, ‘बसंती चुनरियाला वो मोरे सैया’ इ. ‘दादरा’ प्रकार, ‘होरी’ प्रकार अनेक प्रथितयश कलाकार आणि त्यांचा विद्यार्थिनी वर्ग अतिशय ताकदीने मंचावर सादर करतात. अलीकडच्या माझ्या एका कार्यकमात मला त्यांच्या ‘रंजल्या गांजल्या’ या गीताची फर्माइश आली. त्यातून अजूनही त्यांची जुनी गाजलेली गाणी रसिकांच्या मनात रूंजी घालतात, हे खरं. संगीत हे परिवर्तनशील आहे. १०० वर्षांपूर्वी असलेलं संगीत आज राहिलेले नाही. परंतु, शास्त्र मात्र अजूनही १०० वर्षांपूर्वीचंच आहे. त्यात बदल झालेला नाही. यावर प्रभाताईंचा आक्षेप आहे. त्यांचे म्हणणे आहे, प्रस्तुतीप्रमाणे शास्त्र बनायला हवे. त्याप्रमाणे त्यांनी स्व-चिंतन आणि तर्क, शुद्ध अभ्यास करून स्वत:च्या ‘स्वरांगिनी’, ‘स्वरंजनी’, ‘स्वररंगी’ या पुस्तकांतून संगीतशास्त्राबद्दलदेखील त्यांनी लेखन केले आहे. संगीतप्रस्तुती करण्यात आता समयानुसार राग प्रस्तुतीकरण व ‘वादी’, ‘संवादी’, ‘थाटां’चे महत्त्व पूर्वी इतके राहिले आहे का, यावर विचार व्हायला हवा.रागांचे नाव आणि त्या रागात असलेले स्वर यांचा काही संबंध आहे का, हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे. जसे ‘संततुखारी’ रागाचे नाव आहे, पण त्या रागात ‘वसंतराग’ कुठेही दिसत नाही. त्यांचं नाव ‘मुखारीभैरव’ का ठेवू नये? ‘श्यामकल्याण’ला ‘सारंगकल्याण’ का म्हणन नये? हे प्रश्न त्यांना पडतात. प्रभाताईंनी जवळजवळ 55 बंदिशी विविध रागांतून बांधल्या आहेत. सर्व बंदिशी अत्यंत भावपूर्ण आणि कलात्मक आहेत. त्यातील शब्द अत्यंत सहज, सरळ, मधुर आहे. ढ,ण,फ, इ. कठोर वर्णाचा वापर तुरळकच! त्यांच्या बंदिशीत कर्नाटक शैलीचा प्रभावही दिसून येतो.डॉ. प्रभाताई म्हणतात, “गेली जवळजवळ ५०वर्षे मी गुरूपदाची जबाबदारी सांभाळते आहे. पण, त्याचबरोबर माझी विद्यार्थीदशाही चालू आहे. विद्यार्थीदशेत ज्ञान मिळवत राहणं आणि त्याचा योग्य उपयोग करून मानवी जीवन समृद्ध, आनंददायी करणं एवढीच जबाबदारी असते.” गुरुंची जागा कुठलंही उपकरण घेऊ शकत नाही. आज संगीत विकत घ्यायची गोष्ट झाली आहे. पूर्वी चांगल्या गुरूंच्या शोधात राहावं लागायचं. आज चांगल्या शिष्याच्या शोधात राहावं लागतं. का तर एकंदरीतच गुरूही बदलले आहेत आणि शिष्यही!प्रभाताई म्हणतात, “संगीताच्या नियमांच्या चौकटीत राहूनच मुक्त होता आले पाहिजे. तीच सर्जनशीलतेची वाट असते. सर्जनशीलता म्हणजे मनमानी नव्हे. स्वरांच्या वाटेवर थांबता येत नाही. पुढे चालावेच लागते. संगीताच्या वारसा जबाबदारीने आणि जाणिवेतून पुढे न्यायला हवा.” आज सामाजिक व राजकीय अस्थिरता, सांस्कृतिक आकृमण(अतिक्रमण), तंत्रज्ञानाचा अतिरेक झाला आहे. अशा काळात कला जतन करणे, हे मोठे आव्हान झाले आहे. प्रभाताईंचे गायन, बुद्धिनिष्ठ आणि आजच्या पिढीसाठी पथदर्शक आहे. रसिकांच्या मनावर ज्या स्वरयोगिनीने अखंड राज्य केले, तिला वाढदिवसानिमित्त शतश: प्रणाम!
-वीणा शुक्ल