‘हिंदू हेरिटेज मंथ’चा षट्कार!

जॉर्जियाचीही मंजुरी; अमेरिकेत मंजुरी देणारे सहावे राज्य

    27-Sep-2021
Total Views |

hindu_1  H x W:
वॉशिंग्टन : पुढील महिन्यात अमेरिकेमध्ये साजऱ्या होणाऱ्या ‘हिंदू हेरिटेज मंथ’ला (हिंदू वारसा महिना) मिळणारा वाढता प्रतिसाद कायम आहे. जॉर्जिया राज्यानेही ‘हिंदू हेरिटेज मंथ’ला मंजुरी दिली आहे. ‘हिंदू हेरिटेज मंथ’ला मंजुरी देणारे अमेरिका हे सलग सहावे राज्य ठरले आहे. जॉर्जियाचे राज्यपाल ब्रायन पी. केम्प यांनी याबाबत लेखी निवेदन नुकतेच जारी करत ‘हिंदू हेरिटेज मंथ’ आपल्या राज्यातही साजरा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
 
हिंदू समाजातील नागरिकांनी अमेरिकेच्या विविध क्षेत्रांच्या विकासात बहुमूल्य योगदान दिले आहे. विज्ञान, शिक्षण, कायदा, राजकारण, व्यवसाय, संस्कृती, क्रीडा आणि अन्य विविध क्षेत्रांतील हिंदू समाजातील नागरिकांचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे. हिंदू समाजातील वारसा, परंपरा आणि संस्कृती आदींमुळे अमेरिकेतील राज्ये समृद्ध झाले असून, याच कारणात्सव ऑक्टोबर हा संपूर्ण महिना ‘हिंदू हेरिटेज मंथ’म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचे जॉर्जियाचे राज्यपाल ब्रायन पी. केम्प यांनी लेखी निवेदनाद्वारे म्हटले आहे.
 
फ्लोरिडानंतर टेक्सास, न्यू जर्सी, ओहयो, ‘दि कॉमनवेल्थ ऑफ मॅसेच्युसेट्स’ आणि त्यानंतर आता जॉर्जिया अशा सहा राज्यांनी ‘हिंदू हेरिटेज मंथ’ला आपला पाठिंबा जाहीर केला असल्याने अमेरिकेतील हिंदू धर्मीयांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याची माहिती अमेरिकेतील हिंदू स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते विकास देशपांडे यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिली.
 
हिंदू परंपरांच्या बदनामीचा कट रचत काही हिंदुत्वद्वेष्ट्यांनी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेमध्ये ‘डिस्मँटलिंग ग्लोबल हिंदुत्व कॉन्फरन्स’ आयोजित केली होती. मात्र, याच अमेरिकेत आता ऑक्टोबर हा संपूर्ण महिना ‘हिंदू हेरिटेज मंथ’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. विविध राज्यांच्या राज्यपालांनी याबाबत लेखी निवेदन प्रसिद्ध करत तशी घोषणाही केली आहे. सप्टेंबरमध्ये ‘डिस्मँटलिंग ग्लोबल हिंदुत्व कॉन्फरन्स’चे आयोजन झाल्यानंतर दुसऱ्याच महिन्यात अमेरिकेमध्ये ‘हिंदू हेरिटेज मंथ’ साजरा होणे आणि त्याला अमेरिकेतील विविध राज्यांमध्ये दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळणे म्हणजे ही हिंदुत्वद्वेष्ट्यांसाठी ही मोठी चपराकच असल्याचे मत विकास देशपांडे यांनी व्यक्त केले.
 
अमेरिकेत ‘हिंदू हेरिटेज मंथ’साठी जय्यत तयारी
 
अमेरिकेत साजऱ्या करण्यात येणाऱ्या ‘हिंदू हेरिटेज मंथ’साठी सध्या जय्यत तयारी सुरू झाली आहे. विश्व हिंदू परिषद, अमेरिकेसह अनेक हिंदुत्ववादी संघटना यासाठी पुढे आल्या आहेत. हिंदुत्ववादी संघटनांसोबतच काही सामाजिक संस्था आणि धार्मिक ट्रस्टनेदेखील यासाठी पुढाकार घेतला आहे. हिंदू संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि तज्ज्ञ मंडळींसोबत परिसंवाद, चर्चासत्रे आदींचेदेखील आयोजन करण्यात येणार आहे. संगीत, नृत्य आदी कार्यक्रमांचीही रेलचेल या ‘हिंदू हेरिटेज मंथ’मध्ये असून रक्तदान, योग आदी शिबिरांद्वारे सामाजिक उपक्रमदेखील आयोजित करण्यात येणार आहेत, असे विकास देशपांडे म्हणाले.