चौकटीतही स्वत्वाचे आभाळ मांडताना...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Sep-2021   
Total Views |

mangla  final_1 &nbs

आयुष्याच्या पारंपरिक चौकटीत समरस होताना स्वत:चे अस्तित्वही विलीन झारले. मात्र, तरीही आयुष्यात नवनिर्मितीची सर्जनता जोपासणार्‍या मंगला रानडे-देर्देकर यांची ही जीवनकथा...

गुहागरच्या परचुरी गावातले ‘आजोळ कृषी पर्यटन केंद्र.’ अत्यंत दुर्गम गाव. पण, तरीही ‘आजोळ कृषी पर्यटन केंद्रा’त गुहागरबाहेरील हौशी प्रवाशांची रीघ लागलेली. या पर्यटन केंद्राच्या निर्मितीची कहाणी म्हणजे स्त्री कर्तृत्व आणि जीवनाचे स्वत्व त्यागून केवळ कष्टच करणार्‍या अस्तित्वाची एक कहाणी. मंगला रानडे-देर्देकर यांच्या निरलस कष्टातून आणि भारतीय संस्कृतीच्या आदरातिथ्यशील निःस्पृह वर्तनातूनच हे पर्यटन केंद्र उभे राहिले. असो. ‘रांधा, वाढा, उष्टी-खरकटी काढा, यातच आयुष्य गेले. आम्ही काय करणार?’ असा प्रश्न पडणार्‍या कितीतरी आयाबाया आपल्याला दिसतात, भेटतात. या सगळ्यांची कहाणी वेगवेगळी असू शकते. मात्र, या सगळ्यांसारखीच एक असूनही आयुष्यात सकारात्मक विचार करून कुटुंब, समाजाला सकारात्मक प्रेरणा देणार्‍या मंगला रानडे-देर्देकर यांची जीवनकहाणी आणि यश खूप वेगळे आणि निर्भेळ आहे.

नारायण रानडे आणि उषा रानडे हे कराडचे दाम्पत्य. यांची सुकन्या मंगला. नारायण पडेल ते कष्ट करायचे. कधी भिक्षुकी, गोळ्या-बिस्कीट विकणे, वाचनालयात काम करणे, अशी विविध कामे. मात्र, या सगळ्या कामांतून तुटपुंजे उत्पन्न मिळत असे. मग, उषाबाईही कुणाच्या घरी स्वयंपाक कर, कुणाचे लाडू बनवून दे, शिवण-टिपण कर, असे काम करत. मंगलाही सकाळी उठून शेजारच्या दवाखान्यात झाडू मारीत. दवाखान्यातली भांडी घासायच्या. घरची अशी गरिबी. पण, जगणे मात्र स्वाभिमानी. घरातल्या कुणीही व्यक्तीने एक वस्तू किंवा एक पैही फुकटची कुणाकडून घेऊ नये, असा नारायण यांचा कटाक्ष असे. दररोजच्या घरखर्चाचा ते हिशोब घेत. एकेदिवशी उषा यांच्याकडे दीड रुपया जास्त उरला. उषा यांनी सांगितले की, सुटे पैसे नसल्याने दुकानदाराने ‘उद्या द्या’ असे सांगितले आहे. मात्र, नारायण यांनी रात्रीच्या रात्री तो दुकानदाराला परत करायला लावला. कारण हेच की, आपल्याकडे कष्टाशिवाय कुणाचाही एक रुपयाही फुकटचा असू नये. हे सगळे संस्कार मंगला यांच्यावर होत होते. पुढे सहावीत शिकत असताना वयाच्या १४ व्या वर्षीच मंगल यांचा विवाह सुधाकर यांच्याशी झाला. नकळते वय, माहेर घाटावरचे कराड आणि सासर कोकणातले दुर्गम खेडे परचुरी. दोन्हींच्या वातावरणात जमीन अस्मानाचा फरक. गावात बोटीने यावे लागे. गावात बाजारही नाही. वीज नव्हती की रस्ते नव्हते. मात्र, परचुरीची ग्रामदेवता ही गुहागर आणि परिसरातील अनेक कुटुंबांची कुलदेवता. त्यामुळे गावात देवी दर्शनासाठी लोकं यायची. त्यांचे चहापान आणि जेवणखाण नित्यनियमाने देर्देकर कुटुंबाच्या घरीच! शासकीय अधिकारी ते अपरिचित प्रवासी ते अगदी फेरीवालेही चहापान आणि जेवणासाठी देर्देकरांच्या घरी यायचे. कारण, मंगला यांचे सासरे गावचे एक मोठे प्रस्थ. अतिथींचे स्वागत करायलाच हवे, असा त्यांचा दंडक. मात्र, मंगला यांचे वय लहान आणि स्वयंपाक काहीच यायचा नाही. त्यामुळे त्यांना खूप त्रास व्हायचा. या सगळ्यांना सामोरे जाणे अटळ होते. या सगळ्यात मंगला यांना आधार होता तो त्यांच्या पती सुधाकर यांचा. त्यांनी मंगला यांना स्वयंपाक शिकवला, गाई-म्हशीचे दूध काढायला शिकवले, शेणाने घर, अंगण सारवायलाही शिकवले. गावचे, घरचे वातावरण तर असे की, गावातल्या महिला महिनोन्महिने अंगणाच्याही बाहेर पडत नसत. या सगळ्या काळात मंगला यांनी कोकणच्या सर्व रीतिभाती शिकून घेतल्या. पारंपरिक खाद्यपदार्थही त्या शिकल्या. त्यात त्या इतक्या निपुण झाल्या की, उकडीचा मोदक, भाजणीचे वडे किंवा बरक्या फणसाचे सांदण बनवावे ते मंगलानेच असे घरचे आणि नातेवाईक म्हणू लागले.


पुढे मंगला यांच्या सासर्‍यांचे निधन झाले. मात्र, घरी येणार्‍या माणसांची गर्दी कमी झाली नाही. पूर्वापार परंपरा म्हणून मंगलाही गावात येणार्‍या सगळ्यांचे चहापान आणि जेवणखान अगत्याने करत असत. याच काळात मंगला यांची मुले शिक्षणासाठी शहरात गेली. गावातले वातावरणही असेच. सगळ्यांची मुले शिक्षणासाठी किंवा कामाधंद्यानिमित्त शहरात. गावात केवळ घरचे आईबाबा आणि ज्येष्ठ. मंगला यांनी ठरवले की, आपली मुले शिकतील, मोठी होतील. मात्र, गावच्या घरचं, शेतीचं, सुपारी बागेचे करायला एक तरी मुलगा गावातच राहायला हवा. मंगला यांनी मुलांना तसे संस्कार दिले. त्यामुळेच त्यांचा मुलगा सत्यवान यांनी शहरातून उच्चशिक्षण घेतले. मात्र, ते गावाकडे परतले. गावात आईच्या मदतीने ‘आजोळ कृषी पर्यटन केंद्र’ उभारले. या पर्यटन केंद्रामुळे आज परचुरीतल्या कित्येक कुटुंबांना राजेगार मिळाला आहे.


गेली ४० वर्षे मंगला यांना स्वयंपाकाचा अनुभव आहे. गावात येणार्‍या अतिथींना कधीही रीत्या हस्ते किंवा उपाशीपोटी पाठवू नये, असे सासर्‍यांचे संस्कार आणि त्या नियमांची पूर्तता करताना मंगला यांनी वयाच्या १४व्या वर्षापासून केलेले कष्ट. या सगळ्यांमुळे मंगला यांच्या आयुष्याला थकणे, हारणे जणू माहितीच नाही. आधुनिक यशस्वी उद्योगिनींच्या यशोगाथेत मंगला यांचे यश कदाचित चमकदार नसेल. पण, “आमचे आयुष्य काय मेलं रांधा, वाढा, उष्टी-खरकटी काढा, करण्यात गेले,” असे म्हणणार्‍या आणि मानणार्‍या करोडो माताभगिनींसाठी भावनात्मक बंध निर्माण करणारे नक्कीच आहे. मंगला म्हणतात की, “पुढच्या काळात कृषी पर्यटनाच्या व्यवसायात ग्रामीण भागातील बंधू-भगिनींनी पुढे यावे, यासाठी काम करणार आहे. चांगला स्वंयपाक येणे हेसुद्धा एक मोठे भांडवल आहे. समाजात घराघरांतील महिला यात निपुण असतात. तसेच कोकणातल्या निसर्ग साधनांचा वापर संयमित आणि यथायोग्यपणे करण्याचे कौशल्य घराघरांतील बापेमाणसाकडे असते. या सगळ्या गुणांचा उपयोग पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी होऊ शकतो.”

मंगला यांना. दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.















@@AUTHORINFO_V1@@